संत नामदेव आद्य मराठी चरित्रकार व आत्मचरित्रकार... इ.स.१२७० ( शके ११९२ ) - इ.स. १३५० (शके १२७२) नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत...सगुण, साक्षात्कारी संत, आद्य मराठी आख्यान कवी, कीर्तनकार, संत ज्ञानदेवांच्या कालखंडात होऊन गेलेले एकमेव समकालीन चरित्रकार, भक्तिमार्गाचे प्रचारक , आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारे अशा अनेक पैलूंनी दिसणारे भक्तशिरोमणी संत नामदेव..!! . वारकरी कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक म्हणून संत नामदेव प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत कीर्तनाद्वारे पंढरीच्या भागवत धर्माची पताका घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी भावनिक एकात्मता साधली. भविष्यकाळातही त्यांच्या भगवद्गभक्तीचा खोल ठसा अनेकानेक पिढ्यांवर मुद्रित होऊन राहील इतका तो समर्थ आहे. संत नामदेवांचा जन्म सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी गावी प्रभव नाम संवत्सर, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. दामाशेटी हे संत नामदेवांच्या वडीलांचे तर गोणाई हे त्यांच्या आईचे नाव होते. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. नामदेवांचे आई-वडील दोघेही विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. असे म्हणतात की गर्भात असताना नामदेव विठ्ठलनामाचा जप करत असल्यामुळें त्याच्या मातेलाहि विठ्ठलनामाचेच डोहाळे होत होते. त्यांचे बालपण हे भूवैकुंठी, पंढरीमध्ये गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली. 11 वर्षाचे असताना त्यांच लग्न झालं व त्यांना चार आपत्य होती. त्यांच्या वडिलांच नाव दामाशेट्टी व आईचं नाव गोणाई होतं. त्यांना दिवसनरात्र विट्ठलभक्तीचाच छंद होता. नामदेवांसाठी प्रत्येक गोष्टीची सुरुवात व अंत म्हणजे फक्त विठोबा. एकदा नामदेवांची आई काही कामात होती, तीने नामदेवाला विठोबाला नैवेद्य दाखवून यायला सांगितलं. नामदेव मंदिरात गेले, विठोबा समोर त्यांनी नैवेद्याच ताट ठेवले व त्यांना नैवेद्य खाण्यासाठी प्रार्थना केली. काही वेळा पर्यंत तो नैवेद्य स्वीकार केल्याची त्यांना काही खूण दिसली नाही, तर ते एवढ्या काकूळतेनी रडले की विठोबांनी माणसाच्या रूपात खरोखर येऊन नैवेद्य ग्रहण केला. लहान वयातच श्री नामदेव कीर्तने करीत, पण त्यांनी गुरुपदेश घेतला नसल्यामुळे ज्ञानेश्वरांनी त्याला सांगितले की नामदेवा, तू गुरुपदेश घेतल्याशिवाय तुला पूर्ण ज्ञान प्राप्त होणार नाही. संत गोरोबांकडे, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतमंडळी ब्रह्मज्ञान विषयक चर्चा करीत असताना ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबांनी उपस्थितांची आध्यात्मिक तयारीविषयी परीक्षा करविली असताना श्री नामदेव एकटेच कच्चे ठरले, तेव्हा श्री नामदेवाना गुरूचे खरे महत्व कळाले व त्यांनी विठोबा खेचरांना आपले गुरू केले. श्री नामदेवांच्या जीवनात एक घटना घडली. एक दिवशी श्री नामदेव बाजारात काही कापडं विकायला निघाले. ते एका दगडावर भजन करत बसले, व आपण कापड विकायला आलो होतो या गोष्टीचा त्यांना अगदीच विसर पडला. काही घटकांनंतर सूर्यास्त झाला व त्यांना आठवण झाली की आपण कापड विकण्या करिता आलो होतो व आता ते विकले गेले नाही म्हणून घरी वडिलांचा ओरडा खावा लागेल. त्यांनी काय केले की ते सर्व कापडं ते ज्या दगडावर बसले होते त्यालाच विकून दिले, म्हणजे की त्या दगडा वरच सोडून दिले, व दूसर्‍या एक दगडाला हमी द्यायला म्हणून नेमलं की पहिला दगड दूसर्‍या दिवशी त्यांना पैसे देईल, आणि ते मंदिरात जाऊन बसले. नामदेवांचे वडिल त्यांच्या मुलाचे हे अद्भुत कार्य ऐकून संतापले व त्यांनी त्या धोंड्याला (अर्थात् त्या दगडाला, महाराष्ट्राच्या काही लोकांमधे धोंड्या हे नाव पण असतं) आणायला सांगितले ज्याने पैसा देण्याची बहादारी दिली होती. दूसर्‍या दिवशी नामदेव परत बाजारात गेले आणि बघितलं की रात्रभरात सर्वे कापडं तेथून नाहीसे झाले होते, दूसर्‍या दगडाला (धोंड्या) त्यांनी घरी आणलं, जसे काही त्याने पैसे द्यायला नकारा दिला होता असे समजून त्याला एका खोलीत बंद करून ठेवले. त्या नंतर ते मंदिरात गेले व विठोबाला सर्व हकीकत सांगितली व आपली अडचण पण सांगितली. नामदेवांच्या वडिलांनी त्यांना तो पैसे देण्याची हामी देणारा धोंड्या दाखविण्यास सांगितले, नामदेवांनी उत्तर दिले की त्याला घरात एका खोलीत बंद केलं आहे व स्वतः पुन्हा मंदिराकडे निघून गेले. वडिलांनी जसेच पैसे मागण्या करिता खोलीचं दार उघडलं, समोर सोन्याची एक लगडी बघून ते आश्चर्यचकित झाले. वडिलांना अतिआनंद झाला; पण नामदेवांना याचा लेशमात्र लोभ वाटला नाही. त्यांनी देवाचा फक्त या गोष्टी साठी आभार मानला की त्यांना देवानी मार खाण्यापासून वाचवलं. श्री नामदेव वीस वर्षाचे होते तेव्हां त्यांची भेट महान संत ज्ञानेश्वरांशी पंढरपुरला झाली. ज्ञानदेव सहजपणे विठोबाच्या या महान भक्ताला भेटून खूब आनंदित झाले. त्यांनी नामदेवांना आपल्यासोबत विविध भक्तीस्थानांची यात्रा करण्यास घेतले. नामदेवाच्या जीवनाचा हा खूप महत्वपूर्ण काल होता. या काळापासून व्यावहारिक दृष्ट्या, दोन महान संत मृत्युपर्यंत बरोबर राहिले. त्यांची तीर्थयात्रा भारताच्या सगळ्या भागांपर्यंत व जवळजवळ सगळ्या पवित्र तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोचली. रस्त्यात, नामदेव व ज्ञानदेवांनी कित्येक चमत्कार दाखविल्याचा उल्लेख आहे. जसे की – नामदेव आणि ज्ञानदेव नागनाथपुरीला आले. नामदेवांनी मंदिरात भजनाला सुरुवात केली. तेथे विशाळ गर्दी जमली. मंदिराचे मुख्य पुजारी मंदिरात प्रवेश करू शकत नव्हते म्हणून त्यांचा संताप झाला. नामदेव त्या मंदिराच्या पश्चिमद्वारेवर जाऊन बसले व रात्रभर भजनकीर्तन केले. चमत्कार असा झाला की मंदिरातील प्रतिमा आपल्याआप त्यांच्या कडे वळून गेली. अशीच एक घटना कर्णाटकाच्या उडुपी मंदिराची पण आहे. तिथलचे देव श्री कृष्ण, यांच तोंड इतर मंदिराच्या मुर्तीसारखे नसून, पश्चिमेकडे आहे. उडुपीचे तीर्थयात्री संत कनकदासाविषयी एक कहाणी प्रसिद्ध आहे. ते खालच्या जातीचे असून, परंपरेनुसार त्यांना मंदिरात प्रवेशण्यास नकार करण्यात आला व दर्शन घेऊ दिले नाहीत. कृष्ण कनकदासाच्या भक्तीने आनंदित झाले व त्यांची प्रतिमा मंदिराच्या पश्चिमीभागी वळून गेली कारण कनकदास मंदिराच्या पृष्ठभागी भजन गात होते. मागून पश्चिम भागाच्या भींतीशी एक लहानशी खिडकी बनवण्यात आली जेथून कनकदास कृष्णाचे दर्शन बाहेरूनच, या खिडकीतून (नवग्रह कितिकी) करु शकतो, ज्यावर कलात्मक कोरीव काम केलेल्या चांदीच्या पतर्‍याचे आवरण आहे. कृष्णाच्या प्रतिमेजवळ एक दिवा जळत असतो, हा दिवा श्री माधवचार्यांनी लावला होता व तेव्हांपासून आजपर्यंत तो तेवत आहे. संत ज्ञानेश्र्वरांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेवांचे आयुष्य पालटले. सर्व संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्गग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. नामदेव महाराजांनां वारी आणि वारकऱ्यांचे विलक्षण प्रेम होते त्यासाठीच नामदेव म्हणतात कि वैकुंठापेक्षाही माझे पंढरपूर श्रेष्ठ आहे. वैकुंठात काय आहे ? ती तर जुनाट झोपडी! पंढरी आधी आणि मग वैकुंठ नगरी! श्री नामदेवांची वाणी स्वभावतःच मृदू, प्रेमळ व अंतर्मुख वृत्तीची आहे. नामदेव वारीचे महात्म्य भावस्पर्शी शब्दात खालील अभंगात व्यक्त करतात... पंढरीची वारी जयाचिये कुळी ।त्याची पायधुळी लागो मज ||१|| तेणे त्रिभुवनी होईन सरता ।नलगे पुरुषार्था मुक्तीचारी॥२॥ नामाची आवडी प्र्माचा जिव्हाळा । क्षण जीवावेगळा न करी ॥३॥ नाम म्हणे माझा सोयरा जिवलगा । सदा पांडुरंग तया जवळी ॥४॥ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनंतर संत नामदेवांच्या मनाला उदासीनता आली. त्यामुळे नाममहात्म्य आणि हरिभक्ती प्रसार व प्रचाराच्या कार्यासाठी नामदेव महाराष्ट्र बाहेर पडले. भेदाभेदीत मानवतावादी भूमिका घेऊन ते महाराष्ट्रातील पददलितांना भक्ती-छत्राखाली संघटीत केले तर गुजरात,राजस्थान,पंजाब, हरियाणा आदी परदेशांतही वारकरी पंथ आणि भगवद्भक्ती रुजविली. पंजाब, राजस्थान अशी जागोजागी आढळणारी त्यांची. ते शीख पंथीयांमध्ये विलक्षण लोकप्रिय तर होतेच परंतु त्यांच्या अभंगाचा अंतर्भाव शिखांच्या उपासनेत असलेल्या गुरुग्रंथासाहीबात ‘नामादेवबानी’ नावाने केला आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी तसेच राजस्थानातील शीख बांधवांनी त्यांचे उभारली मंदिरे याची साक्ष देतात. बहोरदास, लध्धा, विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. त्यांच्या असामान्य कार्यामुळेच त्यांना `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते. नामदेवांचे लिखाण प्रांजल आहेच, पण त्याला नम्र विनोदाची डूब आहे. स्वतःची खिल्ली उडवत आपली पहिली अज्ञ अवस्था ते चित्रित करतात नंतर गुरु विसोबांच्या यांच्यामुळे त्यांच्या अध्यात्मिक जीवनात घडून आलेले परिवर्तन, 'गुरु केला पाहिजे ' हे सांगणारी मुक्ताबाई आणि इतर भावंडान बद्दल वाटणारी अपार कृतज्ञता नामदेव व्यक्त करतात तसेच आपला जन्म ‘प्रसवली माता मज माळमुत्री’ असे सांगून सामान्यांसारखाच झाला आहे, कुठलाही चमत्कार नाही हे ही सांगतात. बहुजन समाजातील शिंपी जातीत जन्मूनही त्याबद्दल खंतावत नाहीत. नामदेवांच्या विठ्ठलाच्या अनंत नामांमध्ये विशेष आवडीचे नाव म्हणजे केशव. त्यामुळे नामदेवांनी अनेक अभंगामध्ये आपली नाममुद्राही 'नाम म्हणे केशवा' अशी घेतली आहे. संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे साठ अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपित घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्र्वरांचे चरित्र सांगितले आहे. नामदेवांच्या हिंदी अभंग रचनाही अतिशय मधुर आहेत. नामदेवांनी भागावत धर्माचा आवर वाढविण्यासाठी भाषाभेद सोडून अभंग रचना केली. त्यांचे मराठी वळणाचे हिंदी अभंगही फार सुंदर आहेत. खालील अभंग त्याचाच एक नमुना आहे..... मन मेरे गज जिव्हा मेरी काती। माप माप काटो जमकी फासी१॥ कहा करू जाती कहा करू पाती। रामको नाम जपो दिन ओर राती ॥२॥ रागाबीन रागो सिवबीन सिवो। रामनाम बिन काही न जीवो ॥३॥ हम तो भागति करू हरीके गुण गाऊ। आठ प्रहर आपना खासमाकू त्यागु ॥४॥ सोनेकी सुई रुपेका धागा। नामक चित्त हरसू लागा ॥५॥ सुमारे ५० वर्षे त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर भागवत धर्माचा प्रसार करणारे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम करणारे संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये ( शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी ) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नामादेवांचे, संतसज्जन वारकऱ्यांचे प्रेम, नामदेव पायरीच्या रुपाने विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारावर मूर्तिमंत विराजले आहे. संतचरण हिरे या नामदेव पायरीच्या चिरे स्पर्शतात आणि मगच विठुरायाच्या दर्शनाला जातात. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बा न घे ॥१॥ सांग पंढरीराया काय करु यांसी का रूप ध्यानासी न ये तुझे॥२॥ किर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥ हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती नये माझ्या चित्ती नामा म्हणे॥४॥ -संत नामदेव
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel