महात्मा बसवेश्वर महाराष्ट्राच्या सन्त परंपरेतील वीरशैव मराठी संतांचं वाड्मयीन, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य लक्षणीय आहेमराठी संस्कृतीच्या अभिवृद्धीत त्यांनी मोलाचं योगदान दिल आहे. या सर्व वीरशैव मराठी संतांचं प्रेरणास्थान महात्मा बसवेश्वर हे आहेत. बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाचा विचारसरणीचा व कार्याचा फार मोठा प्रभाव विविध महाराष्ट्रीय धर्म सम्प्रदायांवरही तेराव्या शतकापासूनच पडला. हा इतिहास लक्षात घेतल्यावर महात्मा बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाची प्रभावकक्षा किती दूरगामी होती, याची कल्पना येते. महात्मा बसवेश्वरांच्या क्रान्तिकारक, द्रष्टय़ा, सामाजिक न्याय देणार्‍या, बुरसटलेल्या सनातनी/कर्मठ/ अन्यायमूलक/स्वार्थपरायण मानसिकतेला प्रखर विरोध करणार्‍या निर्भय विचारसरणीचा प्रभाव कर्नाटकावर जसा पडला, तसाच महाराष्ट्रावरही पडला. वारकरी आणि महानुभाव सम्प्रदायांच्या विचारसरणीचा, तत्त्वज्ञानाचा व आचार धर्माचा सूक्ष्म विचार केल्यास या प्रभावाची प्रचीती आल्यावाचून राहत नाही. धर्म प्रबोधन, धर्माचा पुनर्विचार व समाज प्रबोधन यांचा अपूर्व समन्वय महात्मा बसवेश्वर म्हणजे महात्मा बसवेश्वर यांचं जीवन व त्यांचं कार्य होय. यातून भारतीय संस्कृतीत आगळ्या बसवयुगाचा उदय व विकास झाला. भक्तिचळवळीला एक नवं वळण मिळालं, एक वेगळं अधिष्ठान प्राप्त झालं. महात्मा बसवेश्वरांचं जीवनचरित्र लक्षात घेतलं की, महाराष्ट्राशीही त्यांचा किती घनिष्ट संबंध होता, याची कल्पना येते. ते महापुरुष होते. इ.स.नाच्या दहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत मंगळवेढय़ाला कळचूर्य (कळचुरी) घराण्यांचं राज्य होतं, त्यात करहाटर (कराड), परंडा (उस्मानाबाद जिल्हा) पासून मंगळवेढय़ापर्यंतचा भागही समाविष्ट होता. या घराण्यातील बिज्जल राजाचे पुरव राधिश्वर महात्मा बसवेश्वरांचे वडील मादिराज हे होते. इ.स. ११०५ हा महात्मा बसवेश्वरांचा जन्म - सन. बालपणापासूनच ते धर्मचिन्तन व समाजचिन्तन करीत. स्त्री, शुद्रांना आपल्या उद्धाराचा नाकारलेला अधिकार कर्मकांडाचं अनावश्यक प्राबल्य व चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील विषमता यामुळं ते अस्वस्थ व अंतर्मुख होत. मुंजीसारखे विधी/कर्मकांड अनावश्यक आहेत, असं त्यांचं मत असल्यानं त्यांनी मुंज करुन घेण्यास विरोध केला. यांच्यातील श्रेष्ठकनिष्ठता, कर्मकांड हा त्यांना मान्यच नव्हतं. त्याला विरोध करुन त्यांनी नवसमाजनिर्मिती केली. सनातनी कर्मठांचा विरोध पत्करुन आचार्य जातवेदमुनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केला. प्रथम करणिक असलेले महात्मा बसवेश्वर पुढे कोषागार मंत्री झाले. पण प्रचाराचं कार्य त्यांनी लोकाभिमुख केलं व त्याला समताधिष्ठित, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना न्याय देणारी प्रशासन-व्यवस्था निर्मिली. इष्टलिंग हेच शिवस्वरुप आहे, ते धारण करावं, परमेश्वर हा एकच आहे त्याची भक्ती करावी, कोणतही कर्म उच्च वा नीच नाही, कर्म हेच कैलास (काय कवे कैलास ) या विचाराचा विचाराचा प्रसार करुन त्यांनी सर्व व्यावसायिक व जातीच्या लोकांना समपातळीवर आणलं. त्यांच्या पुरुष अनुयाना शिवशरण व स्त्री अनुयायांना शिवशरणी म्हणतात. असे ७०० शिवशरण व सत्तर शिवशरणी होत्या. आपल्या विचाराच्या प्रसारासाठी त्यांनी अनुभव मंटप या विचारपीठाची स्थापना केली व त्यांच्या या कार्याला मोठा प्रतिसाद मिळाला. चांभार ब्राम्हण-विवाहासारखे उपक्रम सुरु करुन त्यांनी समाजाची मानसिकता बदलली. त्यांच्या विचारांना 'वचन' म्हणतात. त्यातून वीरशैवांचं 'वचनसाहित्य' निर्माण झालं. वीरशैव धर्माच्या तत्त्वज्ञ नाचा गाभा म्हणजे षट्स्थलसिध्दान्त होय. वीस वर्ष शासनाच्या महत्त्वाचा पदावर राहून त्यांनी कार्य केलं नंतर पूर्णतया धर्मप्रबोधन व समाजप्रबोधनाच्या कार्याला राहून घेतलं. कायक, दोह, सदाचार, समता व धर्मभावना ही त्यांच्या कार्याची 'पंचसूची' होती . महात्मा बसवेश्वरांमुळं नवचैतन्य लाभलेला वीरशैव धर्म हा भारतातला एक प्रमुख धर्म आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel