आरंभ : मार्च २०२०

आमची माती, आमची मिसळ - नवनीत सोनार

देश विदेशातील मराठी वाचकांत लोकप्रिय असलेले असे नव्या साहित्य युगाचा आरंभ करणारे हे आरंभ ई-मासिक आता तरुण विचारांचे त्रैमासिक झाले आहे आणि वाचकांना साद घालत आहे आणि घालत राहणार आहे की - "लिहिते व्हा आणि लिखाणातून वैचारिक बदल घडवा!" कारण जगातील कोणताही बदल हा आधी मनांतील विचारांत होतो आणि मग तो दृश्य स्वरूपात उमटतो!! निमिष सोनार, संपादक

आमची माती, आमची मिसळ - नवनीत सोनार

जीवनातल्या काही गोष्टी आणि प्रसंग हे अविस्मरणीय ठरतात आणि असे प्रसंग बहुतेक वेळेस योगायोगाने घडतात. असाच एक प्रसंग जो आम्ही कधीच विसरू शकत नाही.

आमच्या कुटुंबातील आम्ही सहा सदस्य कधीकधी संसाराच्या रहाट गाडग्याचा कंटाळा आल्यानंतर बाहेर जेवायला जात असतो. असेच एकदा सुट्टीच्या दिवशी सार्वजन बाहेर जेवायला निघालो. जरा संध्याकाळी उशिरा आणि पायी निघालो.

मी: कोणत्या हॉटेलात जायचे?
मुलगा: इथून सरळ पुढे गेल्यावर एक छान हॉटेल आहे.

पत्नी, सून आणि नातवंडे अशा सर्वांच्या संमतीने आम्ही पुढे चालू लागलो. पण तेच हॉटेल नेमके त्या दिवशी बंद निघाले. रांगेने पुढे त्या रस्त्यावर अनेक हॉटेल होती मग आम्ही पुढे पुढे चालत राहिलो. एक पर्याय सापडला आपण तिथे मेनू बघितल्यावर बहुतेक पदार्थ नॉनव्हेज असल्याने ते टाळून पुढे गेलो. मग इथे जाऊ तिथे जाऊ करत करत अर्धा तास निघून गेला.

हिरमोड होऊ नये म्हणून पुन्हा घरी जाण्याऐवजी सर्वानुमते एका छोट्याशा उपहारगृहात जाण्याचे ठरवले. छोटे होते तरी छान उपहारगृह होते. गोल टेबलाभोवती छान खुर्च्या मांडलेल्या होत्या. पायी फिरून थकवा आल्याने बसल्यावर बरे वाटले. वेटरने थंडगार पाणी आणून दिले ते पिले आणि बरे वाटले.

मी वेटरला हाक मारली.

मी: जरा इकडे या बरं!

वेटर: काय साहेब?

मी: खायला काय काय आहे?

वेटर: पावभाजी, मिसळपाव, बटाटेवडे, सामोसे, दहीवडे, मेदूवडे ...

आणखी त्याने बऱ्याच पदार्थांची नावे सांगितली. क्जेवान करण्याऐवजी आम्ही नाश्याचेच पदार्थ पोटभर खाण्याचे ठरवले आणि सर्वांनी मिसळपाववर शिक्कामोर्तब केले आणि मी धान्य झालो!

मी: वेटर, पाच मिसळपाव आण

वेटर: आणतो सर थोडा वेळ लागेल

मिसळपाव बनत असतांना जो वास आला त्यात मला काहीतरी आठवले आणि हा वास आधी अनुभवल्यासारखा वाटला. त्याने थोड्या वेळाने मिसळ आणून दिली. दोन घास खाल्ल्यानंतर मी वेटरला बोलावून घेतले आणि विचारले, "मिसळची चव कशी खानदेशी वाटते!

वेटर: होय, सर!

मी: या उपाहारगृहाचे मालक कोण आहेत? त्यांना बोलावता का?

मालकाला बोलावल्यावर ते आले.

मी: आपण राहणारे कोठले? तुम्हाला यासाठी विचारले की मिसळची चव खानदेशी वाटते!

मालक: मी भुसावळचा! आणि माझ्या हाताखालची माणसंही तिकडचीच!

मी: म्हणूनच! कारण मला ही चव तिकडची वाटली, ओळखीची आणि आवडीची वाटली! माझे आयुष्य तिकडेच गेले त्यामुळे मिसळची अशी तिखट चव मी ओळखली!

मग मालकाशी भरपूर गप्पा झाल्या. संवादातून कशी आपली माणसे बरोबर जवळ येतात, याची प्रचीती आली. खूप बरे वाटले. हा योगायोग होता. त्या दिवशी जेवणापेक्षा छान मिसळपाववर ताव मारला. मला वाटले खरंच ज्ञानेंद्रिये सुद्धा एखाद्या पदार्थाची चव ओळखून साक्ष देतात. तेव्हापासून तो उपहारगृहाचा मालक आमचा मित्र झाला. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. जीवनातील काही आठवणी चवीच्या रुपात ताज्या होऊन मनाला आनंद देऊन गेल्या.