"आई,आज खूप कंटाळा येतोय ग काहीही करण्याचा" असं लग्नाआधी म्हणणारी मुलगी लग्नानंतर कितीही कंटाळा आला, थकवा आला तरीही मन लावून ते काम पूर्ण करत असते.सोपा नसतो तिचा हा प्रवास.... लहानपणीची आई-बाबाची लाडकी परी राणी, राजकन्या मोठी झाल्यावर कुण्या अनोळखी व्यक्तीच्या हातात हात देते, जन्मोजन्मीची गाठ बांधते, त्याच्या मनाची राणी होते आणि बदलत जाते एका परिपुर्ण स्त्री मध्ये!! जोपर्यंत ती लहान असते तोपर्यंत तिचे आयुष्य एका फुलाच्या कळीप्रमाणे असते. लग्न झाल्यानंतर फुलाच्या पाकळ्या प्रमाणे तिचे वेगवेगळे नाते फुलू लागतात. पत्नी, सून, आई, वहिनी, काकू आणि कितीतरी! प्रसंगी काही झालं तर केविलपणे रडणारी ती खंबीर व्हायला शिकते, कठीण वेळी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करते. लग्नानंतर स्वतःचे घर,नाते मागे ठेवून ती नवीन घरात प्रवेश करते त्यामुळे तडजोड हा नैसर्गिक गुण तिच्यामध्ये असतोच असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नवीन नात्यामध्ये सगळ्यांची मन जिंकून घेण्याची जबाबदारी ही तिची असते. जमेल का मला सगळं अशी धाकधूक तिच्या मनात असते. मग हळूहळू नवीन लावलेल्या रोपट्याप्रमाणे तिच्या आपुलकीची मुळे सासरच्या घरामध्ये खोलवर रुजू लागतात अन् तिचे स्वतंत्र असे अस्तित्व तयार होऊ लागते. मग तीसुद्धा आपली मतं मांडायला शिकते,चूक-बरोबर गोष्टींची पारख करून व्यक्त करायला शिकते. बऱ्याच वेळा परिस्थिती अशी येते की तिला राग येतो ,स्वाभाविक आहे ते मात्र तेंव्हाही ती राग नियंत्रित करून शांत राहते. नवीन घरचे रीति-रिवाज, संस्कृती, व्रतवैकल्ये सगळं कसं समरसून करते. कलह, मतभेद हे घरामध्ये होतातच मात्र त्यातूनही जी ते कुशलतेने हाताळते ती निश्चितच लाडकी होऊन राहते. घर एकसंध ठेवण्यात यश आले की मिळणारे समाधान निराळेच! निसर्गाने मातृत्व बहाल केल्यावर तर ती अजून उजळते, तिच्यातील सुप्त गुण, स्वभावाचा निराळा पैलू बाहेर येतो. तोपर्यंत असणारी राणी आता समजदार झाली असते किंबहुना राणीपेक्षा पूर्णवेळेची माता झालेली असते. वयानुसार अनुभवाची शिदोरी वाढत जाते, स्थैर्यता येत जाते .घरातील सगळे नकळत तिच्यावर विसंबून राहू लागतात. छोटी छोटी कामही मग तिच्यावाचून अडायला लागतात. घरात जणू काही जादूची कांडी फिरवल्यागत तिचे कार्य सुरू असते. कधी नवीन खाण्याचा पदार्थ करायचा असो वा कधी घरात नवीन प्रकारची सजावट करायची असो ती ते करण्यास उत्सुक असते ,तत्पर असते. वर्षे सरत गेली की घरच्यांशी ती खूप एकरुप झालेली असते. संसाररूपी मुकुटावर समाधानाचा, सुखाचा हिरा विराजमान झालेला असतो.अन् एके दिवशी तो सहज म्हणतो, काय आजीबाईसारखी वागतेस ग!!! मग ती खुदकन गालातल्या गालात हसते कारण ती आता परिपुर्ण स्त्री झालेली असते.️