कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो.शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जूनपर्यंत (सूर्य रोहिणी नक्षत्रात यायचा दिवस) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला 'भद्रेचा होम ' असे म्हणतात.

फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. याला 'होम' लागणे असा शब्दप्रयोग वापरतात. काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा दिसते.

पौर्णिमेला रात्री उशिरा होम लावला जातो. काही ठिकाणी त्यावर जिवंत कोंबडे लावतात. अशा वेळी तो होम रात्री बारापूर्वी लावतात. या कोंबड्याचा प्रसाद घरी नेऊन त्याचा प्रसाद घेतात, याला तिखटाचा सण म्हणतात. काही ठिकाणी रात्री बारा ते पहाते पाच या वेळात होम लावतात, यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, याला गोडाचा सण असे म्हटले जाते.

ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो. हा होम झाल्यावर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात व त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी पेटवतात.

होल्टा होम-
कोकणात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो. होळीच्या-होमाच्या आदल्या दिवशी, नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी हा प्रकार खेळतात. श्री केदारनाथ देवस्थानचे मानकरी हातात जळती लाकडे घेऊन, उघडबंब आणि पायात चप्पल न घालता मैदानात दोन बाजूला उभे राहतात. दोन बाजूला उभे असलेले मानकरी एकमेकांवर ही जळती लाकडे फेकतात. असा खेळ काही वेळ खेळला जातो. यामध्ये कोणाला इजा होत नाही हा याचा विशेष म्हणावा लागेल.

कोकणात आसूद येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटतात. होळी अतिशय सुंदररीत्या सजवतात. रांगोळ्या काढतात. पताका लावतात. फुलांची सजावट करतात.. होळीची पूजा करून होळी भोवती फेर धरून लोकगीते म्हणतात. होळीच्या दिवशी बाहुला बाहुलीचे लग्न लावण्याची प्रथा आहे. त्यात संपूर्ण गाव सामील होते. वरात, मंगलाष्टके, आहेर, अल्पोपहार अशी धमाल असते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel