@doctorforbeggars

सर्वजण मला विचारतात, कोरोनाचा प्रभाव भिक्षेक-यांवर काय पडला आहे, ते कसे वाचतील यांतुन, ते कसे जगताहेत सध्या ....?

सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी भारतात कोरोनाचा रुग्ण सापडला त्याचदिवशी हे ध्यानात आलं, जो विषाणु चीन मधुन प्रवास करत भारताच्या एका भागात येवु शकतो, त्याला  महाराष्ट्र किती दूर आहे ? तो आल्यावाचुन राहणार नाही.... !

आणि सर्वात दुर्बल घटक म्हणजे भिक्षेकरी, निराधार, निराश्रीत !

हा विषाणु या घटकाला चट्कन् हाताला धरुन महाराष्ट्रात / भारतात थैमान घालु शकतो !

कारण स्वतःची पुरेपुर काळजी घेण्यास हा घटक असमर्थ आहे... !

तेव्हापासुन अनेक तज्ञांशी चर्चा करुन आणि WHO ची साइट पाहुन भिक्षेकरी समाजाबाबत काय करता येईल त्याचा आराखडा तयार केला आणि त्यांच्यापुरती खालील उपाययोजना त्वरीत अमलात आणली.

1. माझ्या संपर्कात असणाऱ्या जवळपास 1000 भिक्षेक-यांना एकत्र करुन, वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावरच मिटींग घेवुन या आजाराची पार्श्वभूमी, घ्यायची काळजी आणि काळजी न घेतल्यास होणारे परिणाम त्यांना समजतील अशा भाषेत सांगितले, डोक्यात भिनवले... !

मला अभिमान आहे, एका सर्वसामान्य माणसाला आज कोरोनाविषयी जी माहिती आहे, ती त्यांनाही आहे.

2. सर्वांना भरपुर रुमाल / मास्क्स / सॕनीटायझर / साबण आणि हात पाय तोंड धुवायला महिनाभर पुरेल इतकी तुरटी दिली आहे.

या व्यतिरिक्त प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधं, रक्तवाढीच्या गोळ्या व इतर आजारांत लागणारी सर्व औषधं दिली आहेत.

3. ज्यांची घरे झोपडपट्टीत का असेनात; अशांना त्याच ठिकाणी थांबुन, भीक मागण्यास बाहेर पडु नये असं बजावलं आहे. बाहेर आलात तर हा विषाणु एक तर कुणालातरी "द्याल" तरी नाहीतर कुणाकडुन "घ्याल" तरी, यामुळं तुम्ही तरी "जाल" नाहीतर दुस-याला तरी "घालवाल" याच निर्वाणीच्या भाषेत त्यांना समज दिली आहे.

जे त्यांना मनापासुन पटलं आहे...!

4. जे रस्त्यावरच आहेत, डोक्यावर अजिबातच कसले छप्पर नाही, त्यांना रस्त्यांवर राहुनही काय आणि कशी काळजी घेता येईल हे त्यांच्यासोबत बसुन त्यांना सांगितलं आहे. रस्त्यांवर लागणारे सर्व साहित्य त्यांना  पुरवले आहे.

(इतक्या सर्व लोकांना एकाचवेळी कुठेतरी स्थलांतरीत करणे, हलवणे, निवारा देणे याबाबतीत मी असमर्थ आहे, कारण माझ्या स्वतःकडे अशा सोयी नाहीत, ज्यांच्याकडे अशा सोयी आहेत, त्यावर माझा कंट्रोल नाही... इथे मी हतबल आहे हे प्रामाणिकपणे कबुल करतो.)

5. भीक नसल्यामुळे अन्न नाही ! पर्यायाने उपासमार !

हि उपासमार टाळावी, यासाठी शक्य त्यांना किराणा माल घेण्यासाठी आर्थिक मदत दिली आहे, काहींना किराणा माल  दिला आहे. ज्यांच्यापर्यंत मी पोचु शकलो नाही, अशापर्यंत सध्या अन्न स्वरुपात मदत देणाऱ्या संस्थांना मदत करण्याची विनंती केली आहे.  

(कुणालाही पैसे  व अन्न स्वरुपात भीक देवु नये हे माझ्या कामाचे पहिले तत्व आहे. परंतु जीवन की मरण अशा संकटात जे  सापडले आहेत त्यांना या काळात जमेल त्या स्वरुपात जगण्यासाठी मदत करणे ही माणुसकी आहे. याला जागुन सध्याच्या काळात अशाप्रकारे तात्पुरत्या स्वरुपात मदत करत आहे.)

लाॕकडाउन मुळे सध्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे, त्यामुळे कामाचा वेग सध्या मंद असला तरी, त्यांना लागणा-या सर्व बाबींची तरतुद माझ्या कुवतीप्रमाणे अगोदरच केली आहे.

आपण केलेल्या कोणत्या न् कोणत्या मदतीमुळेच, मी हे करु पावलो. यांतीलच एका आजीनं दिलेले हे आशिर्वाद, या माध्यमांतुन आपणांपर्यंत पोचवत आहे !

यात काहीही त्रुटी राहिल्या असतील, तर तो दोष माझा... !

सद्सद्विवेक बुद्धीला जे पटलंय ते केलंय...या सर्वात चुक काय बरोबर काय हे येणारा काळ ठरवेल !

हा विषाणु नामशेष होईल, आणि आपल्या आजुबाजुला असणारी प्रत्येक व्यक्ती, हसत खेळत आपल्या आयुष्यात पुन्हा पुर्वीसारखीच येईल, या दिवसाची वाट बघतोय... नव्हे डाॕक्टर म्हणुन प्रयत्न करतोय... !

ज्या दिवशी हा दिवस उगवेल, त्याच दिवशी माझ्या घरावर पताका असेल !

शुभं भवतु !

डाॕ. अभिजीत सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स
सोहम ट्रस्ट, पुणे
9822267357
abhisoham17@gmail.com
www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel