स्मार्ट सिटी ओस पडल्या,2-3 bhk उदास वाटला
मृत्यू समोर आल्यावर शेवटी गावच कामास आला !
शॉपिंग ऍप्स बंद झाले ऑफर गेल्या उडत,
कोपऱ्यावरचा दुकानदार शेवटी आला धावत,
पैसा प्रतिष्ठा नाही माणूस कामास आला !
डबल ट्रिपल टोन्ड मिल्कचा साठा संपत आला,
फटफटीवरून दूधवाला पहाटेच दूध देऊन गेला,
जात धर्म विसरून त्याने जीव जीवास दिला !
पॅकिंग भाज्या फळे आऊट ऑफ स्टॉक झाली,
नाक्यावरची भाजीवाली घरपोच भाजी देऊन गेली,
पोरांकडे पाहून 2 काकड्या तिने जास्तच टाकल्या !
हॉटेल्स रेस्टॉरंट कधीच कुलूपबंद झाले,
गल्लीबोळातले खानावळवले जेवण घेऊन आले,
रेशन संपलं म्हणून त्यांचा चुला नाही थांबला !
हायफाय हॉस्पिटल हताश होऊन बसली,
सरकारी दवाखान्यात मात्र कुणी सुट्टी नाही घेतली,
जीवावर उदार होऊन प्रत्येक डॉक्टर लढला !
शेवटी एकच सांगेन गड्या पैसा प्रतिष्ठा घडीचा खेळ आहे,
गावाच्या गल्लीत अजूनही माणुसकीला वेळ आहे,
आपला माणूस जगला म्हणून आनंद गावभर दाटला,
तुला पाहून आजही गावाला आपलेपणा वाटला,
मृत्यू समोर आल्यावर गावच कामास आला !