गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रासह भारतातील अनेक प्रदेशांत साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
या दिवशी गौतमऋषि जयंती असते.
या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.