इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचित लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात. संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई (निर्वाण इ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनांत, गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात "टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥" १६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रूपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं, वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात; पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात.

आणि संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रीय शब्दकोश अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल] म्हणजे विनंती मान्य करणें, संमती देणें, मान्यता देणें आणि गुढी डावी देणें म्हणजे विनंती अमान्य करणें, नापसंत करणें, नाही म्‍हणणें. असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले असल्यास ते तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महत्त्वाचे, कदाचित निर्णायक संदेश साधन (कम्युनिकेशन टूल) असावे. या उपलब्ध संदर्भांचा अभ्यास केल्यानंतर, या गुढीचे अजून एक वैशिष्ट्य दिसून येते. वारी असो अथवा रणांगण असो जाणाऱ्या समूहांतील एखादा चपळ माणूस पाहून त्याकडे ही गुढीची काठी दिली जात असे. तुकाराम गाथेतील संत तुकारामांच्या ४५२९ क्रमांकाच्या अभंगात ते म्हणतात "पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥"

१६व्या शतकातील विष्णुदास नामा यांच्या अभंगात गुढीपाढव्याच्या दिवसाचा उल्लेख 'गुढीयेसी' असा होताना रामाच्या अयोध्येस परत येण्याच्या प्रसंगाशी या अभंगात संगती लावली गेल्याचे दिसते, तो अभंग असा"

आनंदु वो माये नगरी उत्सवो । आजि येईल रामरावो ।।
मोतिया तांदुळ कांडिती बाळा । गाती वेळोवेळा रामचंद्र ।।
अजिंक्य जिंकोनी आले कौसल्यानंदन । धन्य आजि दिन सोनियाचा ।।
कनक दंड चवऱ्या ढळताती रामा । विष्णुदास नामा गुढीयेसी ||

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel