भारतात वेगवेगळ्या दिवशी नव्या वर्षाचा, संवत्सर प्रारंभ करण्याच्या विविध रूढी असल्या तरी महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षाचा प्रारंभ होतो. या शालिवाहन शकाबद्दल आपल्याला विशेष ममत्व वाटण्याचे कारण असे की, हा शक सुरू करणारा राजा शालिवाहन हा एक महाराष्ट्रीय होता. आपले पंचांग तयार करण्याची अनेक कोष्टके या शालिवाहन शकावर आधारित असल्यामुळे इतर काही प्रांतांत कुठे कार्तिक प्रतिपदेला, तर कुठे मेष राशीतील सूर्यप्रवेशाला वर्षारंभ मानीत असले तरी शालिवाहन शक मात्र सर्वदूर रूढ आहे. या विषयातील जाणकारांना शालिवाहन शकाचा आधार आणि संदर्भ घ्यावा लागतो.

जय नावाच्या २८व्या संवत्सरापासून ते प्रमादी नावाच्या ४७व्या संवत्सरापर्यंत २० संवत्सरे संहारकर्त्या महादेव शंकराच्या स्वामित्वाखाली येतात; आणि ४८व्या आनंद नावाच्या संवत्सरापासून श्रीमुख नावाच्या ७च्या संवत्सरापर्यंत सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवाच्या स्वामित्वाखाली येतात. संवत्सरांची विभागणी आणि मांडणी अशा विविध प्रकारांनी केलेली असते. संवत्सर फलात पाऊस-पाणी, नैसर्गिक अनुकूल-प्रतिकूलता, याबद्दलचे जे अंदाज वर्तविले जातात ते बरेच स्थूल असे असतात. पूर्वी एकूणच आयुष्य सुखशांतिमय असे होते. शिवाय प्रमुख व्यवसाय शेती. पाऊस कसा पडेल, नैसर्गिक प्रकोप होईल किंवा नाही ते जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य माणसांनाही होती. पण नव्या वर्षाच्या प्रारंभीचा दिवस आनंदात घालविला की पुढील वर्ष चांगले जाते, अशी आपल्या लोकांची पूर्वापार श्रद्धा आहे. हे संवत्सर फल ज्योतिषाकडून जाणून घ्यावे, असेही सांगितले आहे. 'सस्यं सर्वसुखं च वत्सरफलं संशृण्वतां सिद्धिम्।' अशी धर्मशास्त्राची ग्वाही मानली जाते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel