आशियातील संस्कृती टिकल्या यावरुनच मानवी व आध्यात्मिक मूल्ये जीवनदायी आहेत ही गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. आशियातही युद्धे होती, युद्धप्रिय राजे-महाराजे होते. परंतु युरोपियन राष्ट्रांत युद्धातील साहसांबद्दल व पराक्रमाबद्दल जी एक गौरवाची भावना आजही दिसून येते. तशी इकडच्या लोकांत फारशी नव्हती. य़ुरोपने युद्धाभोवती तेजोवलय निर्मिले आहे, तसे आशियाने कधी केले नाही. असीरियाने लष्करी सत्तेच्या जोरावर सारे जग जिंकण्याचे ठरविले. आणखी पुढे, आणखी पुढे, अशा महत्त्वाकांक्षेने असीरिया बेहोष झाला. आणि शेवटी त्याचा चुराडा उडाला. अतीमुळे माती झाली. प्राचीन ग्रीक लोकांना तर युद्धाचा कायमचाच जीर्णज्वर जडला होता आणि त्यानेच ग्रीस मेला. रोमने सर्व ज्ञात जग जिंकले. पूर्वेकडून व पश्चिनेकडून रोमला अप्रतिहत खंडणी मिळत होती. रोमने सारे जग मिळविले, परंतु आत्मा मात्र नेमका गमावला ! ऐषाआरामात रोम लोळू लागले, वैवाहिक नीती भ्रष्ट झाली. रोमचा अधःपात म्हणजे वैषयिक पराकाष्ठा. एका पुरुषाने तेविसावी बायको मिळविली, तर एका स्त्रीने एकविसावा पती मिळविला असे नमुद आहे. विवाह म्हणजे करार. हे करार वाटेल तेव्हा रद्द केले जात, वाटेल तेव्हा पुन्हा मुक्रर केले जात. जणू बाजारातील देवघेवच ती ! उच्चतर जीवनाचे रोममध्ये दिवाळे उडत आहे, आध्यात्मिक जीवन संपुष्टात येत चालले आहे, अशी धोक्याची सूचना काही विचारवंत देत होते. इतिहासकार लिव्ही म्हणाला, “आमचे दुर्गुण आम्हाला झेपणार नाहीत. त्या दुर्गुणांवर उपाय करणेही आता शक्य नाही. दुर्गुणांचा रोग आता बरा होण्याच्या पलीकडे गेला आहे.” टॅसिटसने तर त्या वेळच्या हत-पतित संसाराचे फारच भेसूर चित्र रेखाटले आहे. जुव्हेनालने अत्यंत बोचक व खोचक उपहास केला आहे. परंतु लोकांनी ही वाणी ऐकिली नाही. आणि रोमचे ते वैभव अस्तंगत झाले. जगावर सत्ता गाजविण्याच्या अमर्याद महत्त्वाकांक्षेने पछाडलेली अशी साम्राज्ये एकामागून एक धुळीत गेली. आध्यात्मिक दिवाळखोरीमुळे संस्कृतीपाठीमागून संस्कृती नष्ट झाल्या. हिंदूंच्या विष्णुपुराणाचा कर्ता एके ठिकाणी म्हणतो, “विचार करा. लवकरच नवा अवतार येईल. कल्कीचा अवतार होईल. आणि मग काय होईल ? ज्याच्याजवळ संपत्ती तोच मोठा मानला जाईल, तोच अभिजनवान, तोच खरा सदगुणी. स्त्री-पुरुषात कामविकार हेच एक बंधन राहील. अमृत हाच व्यवहारहेतू होईल. विषयसुखाहून अन्य आनंद राहणार नाही. विषयसेवण हाच एक आनंद. गळ्यात जानवे म्हणजेच ब्राह्मणत्व. रतिसुख म्हणजेच जणू गृहस्थाश्रम. बाह्य टिळेमाळा हेच धर्माचे स्वरुप होईल, धर्माचा आत्मा नष्ट होईल.” असे हे वर्णन आहे. जर रानटीपणाचे क्षुद्र ध्येय अद्यापही आपण सोडणार नाही, त्यालाच चिकटून बसू तर आपल्या जीवनाचा विकास थांबेल. ते सडेल, झडेल. आपली संस्कृती स्वतःच्या पापाच्या वजनाचे ढासळून पडेल; ती नाहीशी होईल. सर्व गोष्टी उघड आहेत. इतिहासाचा कायदा निर्दय आहे. जे पेराल ते उगवेल. तेथे पसंती-नापसंती मग नाही. जे हाती तलवार घेतील ते तलवारीने होत नसून तिच्यात जी काही आध्यात्मिक शक्ती असते, तिचा तो प्रभाव असतो, आणि जेव्हा तिच्यातील ही शक्ती असते, तिचा तो प्रभाव असतो आणि जेव्हा तिच्यातील ही शक्ती संपते, ही जीवनदायी- प्राणदायी वस्तू नाहीशी होते, तत्क्षणी त्या संस्कृतीचे प्रेत होऊन पडते. जोपर्यंत तलवारीवर हात आहे व तलवार हीच आशा आहे, तोपर्यंत भविष्य भयाण आहे, अंधारमय आहे. जोपर्यंत आत्म्याच्या आधाराने कारभार चालवावयास आपण तयार होत नाही, तोपर्यंत भविष्याची आशा नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel