ते म्हणणे विचार करण्याच्या लायकीचे नाही का ? या विश्वाकडे शास्त्रीय दृष्टीने पाहूनही आस्तिकता राहते. शास्त्रीय दृष्टी नास्तिकच करते असे नाही. सत्यार्थाने पाहिले तर जगाचे शेवटी काय होणार आहे ह्या मुलभूत प्रश्नाशी शास्त्राला काहीएक कर्तव्य नाही. शास्त्र जीवनातील काही स्वरुपांचा विचार करते आणि इतर प्रश्न धर्म व तत्त्वज्ञान यांच्यावर सोपविते. या विश्वाच्या विकासासंबंधी दोन तुल्यबल अशा विचारप्रक्रिया जर समोर मांडण्यात येत असतील, त्या दोन्हीही दृष्टी जर सत्य वाटत असतील, तर ज्या विचारप्रक्रियेमुळे, जी दृष्टी घेतल्यामुळे मनुष्यांचा परमोच्च विकास होण्याची शक्यता दिसेल ती प्रक्रिया, ती दृष्टी आपण का मान्य करु नये? शास्त्रीय दृष्टीशी जर निष्ठावंत राहावयाचे असेल, तर आपणास असे कबूल करावे लागते की या विश्वाच्या भौतिक पसा-याच्या पाठीमागे काही तरी आध्यात्मिक सत्यता आहे. त्या सत्यतेचे यथार्थ आकलन होणे कठीण आहे. त्या सत्यतेची व्याख्या नाही करता येणार. परंतु ती सत्यता आहे हे मात्र खास. वस्तुला चैतन्याची जोड मिळाली व मन, बुद्धी, आत्मा अशा प्रकारे त्यांतून वाढते गुणधर्म प्रकट होऊ लागले. मधून मधून प्रगती खुंटते, अधःपात होतो, निर्दयता व मूर्खता उत्कटत्वाने प्रतीत होतात, तरीही पुढे पाऊल पडत आहे. चैतन्ययुक्त प्रकृतीच्या प्रगतीची दिशा सदैव वाढत्या परिपूर्णतेकडे आहे. मनोधर्माची सुधारणा, सामुदायिक वृत्तीची वाढ, सहन करण्याची शक्ती, निरनिराळ्या भागांचा मेळ घालणे वगैरे जे मौलवान सदगुण, ते उत्तरोत्तर वाढत आहेत. प्रकृतीत मुळचीच नैतिक गती आहे, असे वाटते. विश्वाच्या विकासाकडे अशा नैतिक व आध्यात्मिक दृष्टीने बघणे म्हणजे केवळ कल्पना नव्हे. ही एखाद्या व्यक्तीची आवड किंवा लहर नाही. व्हाइटहेड, थॉम्सन, ऑलिव्हर लॉज, लॉइड मॉर्गन अशा शास्त्रीय तत्त्वज्ञान्यांच्याही लेखांतून ही दृष्टी मांडली गेली आहे.
त्या अज्ञात चिरंतन सत्याकडे आपण इतके दिवस आंधळेपणाने धडपडत जात होतो. परंतु शास्त्रीय ज्ञानाने आज नवीन दृष्टी दिली आहे. प्राचीन धर्मातील सत्यतेवर जरी शास्त्र हल्ला करीत नसले, तरी त्या जुन्या जरठ हटवादीपणाला ते धक्के दिल्याशिवाय राहत नाही. विश्वरचनेच्या पाठीमागे काही तरी शक्ती, ज्ञानमय शक्ती असली पाहिजे, असे शास्त्र म्हणते. परंतु त्याचबरोबर मनुष्याने आजपर्यंत ईश्वरासंबंधी ज्या इतर नाना कल्पना उभारल्या आहेत, जे भारुड निर्माण केले आहे, त्या सर्वांचा शास्त्र उच्छेद करते. ईश्वर म्हणजे मातीची मडकी घडविणारा कुंभार, स्वर्गात बसणारा देवाधिदेव, आपल्या लेकरांचे कौतुक करणारा बाप, वगैरे ईश्वरासंबंधी ज्या कल्पना आहेत, त्या कल्पनांशी विश्वाच्या पाठीमागे असणा-या त्या अनंत शक्तीला काहीएक करावयाचे नाही. ते सारे काव्य आहे. प्रत्येकाच्या त्या त्या कुलदैवताशी, त्या नाना मूर्तींशी व आकारांशी त्या विच्छक्तीचा संबंध नाही. मग ईश्वर म्हणजे काय? ईश्वर म्हणजे विश्वव्यापक चैतन्य, विश्वव्यापक जीवन-तत्त्व. ते आपल्यात आहे, या सर्व चराचरात आहे. ते तत्त्व या सर्व विश्वाला आधार देते, या विश्वात ओतप्रोत भरुन राहते, विश्वाच्या पलीकडेही ते सत्ता चालविते. समुद्रात मीठ मिसळलेले आहे, फुलात सुगंध भरलेला आहे, तसे ते तत्त्व या चराचरात भरुन राहिले आहे. या विश्वाचा कारभार शाश्वत व निश्चित अशा योजनेनुसार चालला आहे. विश्वविकासाचे नियम आहेत. या किंवा त्या व्यक्तीसाठी ते नियम थांबणार नाहीत. आपण चूक केली व खड्ड्यात पडलो तर कोणीही हात धरुन काढायला येणार नाही. मोडलेल्या कायद्याबद्दल तेथे दयामाया नाही. जे बोलला ते बोलला, जे पाऊल टाकले ते टाकले जे पेरले ते पेरले. भूतकाळ निश्चित झाला, भविष्याचे काय ते पाहा.