दुसऱ्या दिवशी सकाळीच रजत आणि निशा भेटले. दोघेही रजतच्या काकांच्या राहत्या घरी पुण्याला गेले. रजतने आधीच काकांना तो आणि निशा घरी भेटायला येण्याची कल्पना दिली होती. निशा काकांचे घरावरचे नाव 'जयराम सरपोतदार' वाचताच भारावून गेली. काकांनी दोघांचे स्वागत केले.
औपचारिक ओळख झाल्यानंतर काकांनी दोघांना येण्याचे कारण विचारले. तेव्हा निशाने आतापर्यंत घडलेली सगळी हकीकत काकांना सांगायला सुरवात केली. हे सगळं ऐकताना काकांचा चेहऱ्याचे भाव बदलले.
नंतर रजतने काकांना लोणावळ्याच्या बंगल्यात मिळालेला फोटो दाखवला. काकांचा तो फोटो बघताच चेहऱ्यावरचा रंगच उडाला.
हे निशाने टिपले.
'काका, तुम्ही ह्या दोघांना ओळखता का? हे कोण आहेत? तुम्हाला याबाबत काही माहीत आहे का?', निशा म्हणाली.
यावर काकांनी उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. मला नाही माहीत. मी यांना ओळखत नाही. अशी अनेक.
निशाला काकांच वागणं थोडं खटकलं. पण तिने ते चेहऱ्यावर दाखवू दिले नाही. ती दोघे काकांचा निरोप घेऊन निघाली.
'रजत मला वाटतं की, काकांना त्या बंगल्याबद्दल नक्कीच काहीतरी माहीत आहे. पण ते सांगत नाही आहेत. कुठेतरी नक्की पाणी मुरतंय.' निशा म्हणाली.
'हे बघ निशा काका कशाला खोटं बोलतील किंवा लपवतील. त्यांना काय मिळणार हे सगळं करून. तसं पण तो बंगला त्यांचा आहे हे विसरून चालणार नाही. त्यांना जर हे कळलं की, आपण त्यांच्याबद्दल असा विचार करतोय तर ते आपल्याला त्या बंगल्यात पण जायला देणार नाहीत. हे लक्षात ठेव', रजत म्हणाला.
'मला माहित आहे, तरीपण......असो, चल आपल्याला गुरुजींना भेटायला जायचंय. त्यांना हे सगळं सांगायला हवं. आता यावर तेच मार्ग काढतील.' असे म्हणून निशा आणि रजत गुरुजींच्या मठात जायला निघाले.
गुरुजी त्यांचीच वाट बघत होते. रजत पहिल्यांदाच गुरुजींच्या मठात येत होता. तिकडचे शांत, प्रसन्न वातावरण त्याला खूपच आवडले. तो त्या वातावरणाशी एकरूप झाला. तो सगळं काही विसरला. इतक्यात तिथे गुरुजी आले आणि रजत भानावर आला. निशाने गुरुजींना रजतच्या काकांच्या भेटीबद्दल सांगितले. गुरुजी जे समजायचं ते समजले. त्यांना आता रिमाला तिथे नेण्यावाचून काहीच उपाय दिसत नव्हता.
त्यांनी रजत आणि निशाला आपण आज रात्री रिमाला तिथे घेऊन जाऊया असे सुचविले आणि ह्या प्रकरणाचा छडा लावू असे निशाला आश्वासन दिले. त्यासाठी त्यांनी एक धागा रिमाच्या दंडावर बांधावयास दिला आणि रजत आणि निशाला ही त्यांनी मंत्र सिद्धीने धागा बांधला. रिमाला सुरक्षितपणे बंगल्यावर आणण्यासाठी गुरुजींनी रजत आणि निशाला ही सुरक्षित केले होते.त्यांना माहीत होते की, ती जी कोणी आहे ती रिमामध्ये परत नक्कीच प्रवेश करेल. म्हणून त्यांनी तात्पुरता उपाय करून रिमाला सुरक्षित केले होते. पण तिचा कायमचा बंदोबस्त करणे खूपच जरुरी होते. त्यासाठी त्यांनी आजची रात्र निवडली होती. त्याप्रमाणे त्यांनी तयारी करायला ही सुरुवात केली आणि ते ध्यानधारणेत मग्न झाले. कारण तिचं ऊर्जा त्यांना कामी येणार होती.
गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे रजत आणि निशा रात्री रिमाच्या घरी पोहोचले. निशाने लगेच तिच्या दंडावर गुरुजींनी दिलेला धागा बांधला व तिला घेऊन ते बंगल्यावर जायला निघाले. निशाला गुरुजींवर पूर्ण विश्वास होता.
इथे गुरुजी ते तिघे यायच्या आधीच बंगल्यावर पोहोचले. त्यांनी बंगल्यात प्रवेश करण्याआधी त्या बंगल्याभोवती सुरक्षा कवच बनविण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या जवळची उदी घेऊन ती मंत्रोच्चाराने बंगल्याच्या बाहेरील प्रत्येक कोपऱ्यात ठेवायला सुरुवात केली. हे काम इतके सोपे नव्हते. जसे त्यांनी पहिली उदी ठेवली. तर अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला. वारा काय वादळच होते ते. घराच्या आतून वेगवेगळे आवाज येऊ लागले. पण त्यांनी त्याला न जुमानता पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. काही वेळानंतर एक पूर्ण फेरा झाल्यावर ते परत येऊन दरवाजात उभे राहिले.
इतक्यात रजत, निशा आणि रीमा तिथे आले. रीमा अजूनही पूर्ण शुद्धीत नव्हती. पण तिला इथे आणणे भागच होते. गुरुजींनी आत जाण्याआधी सर्वांना सूचना केली की, त्यांना दिलेल्या धाग्याचा प्रभाव इथपर्यंतच होता. आत काहीही होऊ शकते. पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी असेपर्यंत तुम्हाला कसलाही धोका नाही. पण तरीही तुम्हा सर्वांना सावध राहावे लागेल. असे बोलत बोलत त्यांनी बंगल्यात प्रवेश केला.
रजतने दिवे लावण्याचा प्रयत्न केला पण दिवे लागलेच नाही. इतका काळाकुट्ट अंधार होता की, समोरचे काहीच दिसत नव्हते. गुरुजींना याची कल्पना आधीच होती. त्यांनी स्वतः जवळची मेणबत्ती पेटविली आणि अजून २ मेणबत्या पेटवून त्यांनी रजत आणि निशाला दिल्या. घरात बऱ्यापैकी उजेड झाला होता.
पण रीमा..ती तर तिथे नव्हतीच....ती अचानक कुठे गायब झाली?
निशा जोरजोरात हाका मारू लागली. 'रीमा...रीमा तू कुठे आहेस?'
इतक्यात जोराचा किंचाळण्याचा आवाज आला. तो रिमाचा होता. रजत आणि निशा आवाजाच्या दिशेने निघणार इतक्यात गुरुजींनी त्यांना थांबविले. गुरुजींनी एकदा घरभर नजर फिरवली. तो आवाज अडगळीच्या खोलीतून आला होता. त्या आत्म्याने रिमाला पुन्हा वश केले होते. तो दरवाजा उघडण्यासाठी.
गुरुजींनी मंत्रोच्चाराने एक मोठं वर्तुळ आखले आणि त्यामध्ये रजत आणि निशाला बसावयास सांगितले आणि ते म्हणाले, 'मी आता इथे त्या आत्म्याला बोलावणार आहे. तेव्हाच आपल्याला तिचा इथे असण्याचा आणि रिमाला वश करण्याचा उद्देश समजेल. तोपर्यंत तुम्ही ह्या वर्तुळातून बाहेर येऊ नये. या वर्तुळात तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात. बाहेर काहीही झालं तरी तुम्ही लक्ष देऊ नका. कदाचित रीमा दिसेल किंवा अजून काही गोष्टी तुम्हाला ह्या वर्तुळातून बाहेर यायला विवश करतील.. पण तुम्ही स्वतःवर संयम ठेवा.'
असे बोलून गुरुजींनी मंत्रोच्चाराला सुरवात केली. त्याबरोबर वातावरण बदलू लागले. अचानक वीजा कडकडण्याचा आवाज झाला. जणू घरातच वादळ सुरू झालं होत. एखाद्याच्या मनाविरुद्ध घडत असेल असं वातावरण निर्माण झालं. घरातील सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकल्या जात होत्या. तरी गुरुजी न थांबता मंत्र बोलतच होते..त्यांनी एक, दोन आणि जेव्हा तिसरी आहुती टाकली तेव्हा रीमा त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. पण ती रीमा नव्हती. ती तीच होती जी निशाला अडगळीच्या खोलीत दिसली होती. फक्त ती रीमाच्या शरीराचा वापर करत होती. तिला परत पाहून निशा जोरात किंचाळली.
आता रीमा अगदी गुरुजींच्या समोर उभी होती. मोकळे केस, विद्रुप चेहरा, पांढरी बुबुळे ती घोगऱ्या आवाजात विचारात होती,'मला का बोलावलयस. तू काहीही कर मी हिला सोडणार नाही. घेऊनच जाणार आणि ती विचित्र पणे हसायला लागली.'
गुरुजींनी पुन्हा आहुती दिली. तसा तिला त्रास होऊ लागला. ती किंचाळू लागली. गुरुजी म्हणाले,'बोल कोण आहेस तू? का ह्या निष्पाप जीवाशी खेळतेयस. काय बिघडलं आहे तिने तुझं. सांग नाहीतर माझ्याशिवाय वाईट कोणी नाही.' असे बोलून ते पुन्हा आहुती देणार...
इतक्यात ती बोलू लागली,'सांगते... सांगते.... सगळं सांगते. माझं नाव रमा. हा बंगला माझाच होता. मी आणि माझा नवरा माधव. आम्ही दोघे खूप खुश होतो इथे. पण तो नीच जयराम सरपोतदार आमच्या आयुष्यात आला आणि त्याने आमच्या आयुष्याची राखरांगोळी केली.'
हे नाव ऐकताच निशा आणि रजत एकमेकांकडे बघू लागले.
ती पुढे बोलू लागली,'तो माझ्या नवऱ्याचा शाळेतला मित्र म्हणून त्याच्यावर माधवने खूप विश्वास ठेवला. पण त्याने माधवला व्यसनाधीन केले आणि त्यामुळे माधवचा कामातून लक्ष उडाला आणि तो दिवाळखोर झाला. आमचं सगळं वैभव देऊन पण तोटा भरून येणार नव्हता म्हणून माधवने हा बंगला जयराम कडे गहाण ठेवला..पण तोटा खूपच जास्त होता म्हणून माझा माधव हा धक्का सहन करू शकला नाही आणि तो हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. एका झटक्यात माझं विश्व बदललं. याचा फायदा जयरामने पूर्णपणे घेतला. त्याने मला खोटं सांत्वन दाखवून माझा विश्वास संपादन केला आणि तो माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. त्याचा माझ्यावर डोळा होता. तो माझ्या सौंदर्यावर भाळला होता. मी पण त्याच्या कपटी प्रेमात ओढले गेले. पण मला काय माहीत होतं की, त्याला फक्त माझं शरीर हवं होत. त्यातच मी गरोदर राहिले आणि म्हणून मी त्याच्यापाठी लग्नाचा तगादा सुरू केला. आज नको उद्या असं करता करता खूप दिवस गेले. एक दिवस अचानक त्याने माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून माझ्याशी लग्न केल्याचं नाटक केलं. मी इतकी खुश होते की, मी ह्यात पूर्णपणे फसले. मग त्याने सराईतपणे माझ्या जेवणात विष टाकून माझा आणि माझ्या होणाऱ्या बाळाचा जीव घेतला व अडगळीच्या खोलीच्या भिंतीत मला पुरून टाकले आणि त्यांनतर तो या घराकडे फिरकलाही नाही म्हणून इतके वर्ष माझा आत्मा न्याय मिळवण्यासाठी या घरात तडफडत होता. पण आता जोपर्यंत मी माझा बदला घेणार नाही तोपर्यंत मी हिला सोडणार नाही. मी हिला घेऊनच जाणार' असे बोलून ती विचित्रपणे हसायला लागली.
तिच्या हसण्याने सारं घर दुमदुमून गेलं आणि अचानक सगळ्या मेणबत्त्या विजल्या आणि बंगल्यात पुन्हा काळाकुट्ट अंधार झाला. जेव्हा गुरुजींनी पुन्हा मेणबत्ती पेटवली तर रीमा कुठेच नव्हती. इतक्यात गुरुजींना ती अडगळीच्या खोलीत जाताना दिसली आणि त्या खोलीचा दरवाजा बंद झाला.
इथे रजतला विश्वासच बसत नव्हता की, त्याचे काका खून करू शकतात. गुरुजींनी रजतचे सांत्वन केले. आणि रिमाला वाचविण्यासाठी काकांना इथे बोलावून रमाला न्याय देने जरुरी होते. तेव्हाच रीमा वाचू शकत होती. गुरुजींचे ऐकून रजतने लगेच काकांना फोन लावला आणि 'मला वाचवा. मी इथे अडकलोय' असे खोटं बोलून त्यांना लोणावळ्याच्या बंगल्यावर यायला भाग पाडले. रजत संकटात आहे हे कळल्यावर काका लगेच निघाले.
काका थोड्याच वेळात बंगल्यावर पोहोचले. जसा त्यांनी बंगल्याच्या आत प्रवेश केला. अचानक घराचे वातावरण बदलले. अडगळीच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि काही समजायच्या आत रिमाने काकांचा गळा पकडला. काका ह्या अचानकच्या हल्ल्याने पुरते घाबरले. रिमाने त्यांना गरागरा फिरवून खाली पाडले. काका बोलत होते, 'तू कोण आहेस? काय पाहिजे तुला? मला सोड. मला सोड.'
पण ती ऐकायला ही तयार नव्हती. उलट ती तिच्या मूळ रुपात आली. काकांच्या तोंडून अचानक निघाले 'रमा!!!!'
रमा बोलू लागली,'हो मीच जिचा तू गोड बोलुन काटा काढलास. माझ्या पोटातल्या जीवाचा ही विचार केला नाहीस आणि मला या घरात पुरून तडफडत ठेवलेस. आज तुला मारूनच मला मुक्ती मिळेल. मी तुला सोडणार नाही.'
असे बोलताच काकांनी सगळं कबुल केलं आणि त्याच्यासाठी हवी ती शिक्षा ही ते भोगायला तयार झाले. तरीही रमा त्यांना सोडायला तयार नव्हती आणि ती काकांवर वार करणार.
इतक्यात गुरुजींनी आहुती देऊन रमाला शांत केले.
आणि ते म्हणाले, 'थांब रमा. तू हा गुन्हा करू नकोस. जर तू जयरामला मारलेस. तर ह्या निष्पाप मुलीला शिक्षा होईल. मी तुला वचन देतो की, जयरामला त्याच्या कृत्याची शिक्षा जरूर मिळेल आणि मी तुलाही मुक्ती मिळवून देईन.'
इतक्यात रजतने पोलिसांना फोन करून बोलविले आणि काकांच्या कबुली जवाबनुसार अडगळीच्या खोलीतून रमाचा सांगडा काढण्यात आला व काकांना अटक झाली.
गुरुजींनी रमाच्या सांगाड्याला विधिवत अग्नी देताच इथे रीमा बेशुध्द झाली व रमाला मुक्ती मिळाली आणि थोड्याच दिवसात रीमा पूर्णपणे बरी झाली.
~समाप्त~
©preetisawantdalvi