*सोळावं वरीस धोक्याच* असे म्हटल्या जाते कारण याच वयाच्या आसपास आपल्या शरीरात हार्मोन्सचा केमिकल लोच्या उसळी मारत असतो. याच वयात नवनवीन स्वप्नांना धुमारे फुटतात तर वेडेवाकडे साहस करण्याची उर्मी दाटून येते. *हम भी कुछ कम नहीं* म्हणत षोडषवयीन अकल्पनीय कामगिरी करायला धजावतात. मात्र ही उर्मी, ही ताकद एखाद्या विधायक कार्यासाठी अथवा चांगल्या उद्देशाने वापरली गेली तर संधीचे सोने होते अन्यथा कपाळमोक्ष अटळ असतो. बरेचदा काही बाळांचे पाय पाळण्यात न दिसता या वयात दिसायला लागतात आणि खरेतर इथेच पालकांची कसोटी असते की ते आपल्या पाल्यांना कशाप्रकारे हाताळतात, त्यांच्या स्वप्नांना कसे सुखकर करतात अथवा भविष्यातील आव्हानांना पेलण्यास कशाप्रकारे सुसज्ज करतात.
साधारणतः आपल्याकडे मुलं १६ वर्षांची झाली की बोर्ड परिक्षेच संपूर्ण कुटुंबाला टेंशन असतं आणि यामुळेच मुलांच्या अंगिभुत, उपजत गुणांकडे दुर्लक्ष होऊन बोर्डाच्या मार्कलिस्टमधल्या गुणांचे कोडकौतुक सुरु होते. मात्र यासोबतच मुलांच्या स्वप्नांना आधार देत जर पालकांनी मुलांच्या इतरही अंगिभुत गुणांना चालना दिली तर मुलं काय करु शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताची सुवर्णकन्या हिमा दास ही होय. आसामच्या धिंग शहराजवळ एका खेडेगावात साधारण कुटुंबात जन्मलेल्या या मुलीने असाधारण कामगिरी करत मैदानी खेळात देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पटलावर चमकवले आहे. फ्लाईंग शिख मिल्खासिंग आणि ट्रॅक अॅंड फिल्डची राणी पी.टी. उषा यांना जी कामगिरी जमली नाही ती हिमा दासने करुन दाखवली आहे. आपल्या स्वप्नांना सर्वतोपरी मानत, स्वप्नपुर्तीसाठी सर्वस्व झोकून देत वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी आई-वडील, नातेवाईक आणि घरादाराला सोडत हिमा दासने अतुलनीय पराक्रम गाजवत सर्वांना आश्चर्याने तोंडांत बोटे घालायला लावले आहे. चला तर मग आज आपण ओळख करून घेऊया भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू हिमा दासची.
१७ जणांच्या एकत्रित कुटुंबात, पाच भावंडात सर्वात छोटी असल्याने सहाजिकच सर्वांची लाडकी असलेल्या हिमा दासची छोटी पाऊले नेहमीच अभ्यासापेक्षा खेळाच्या मैदानाकडे जास्त वळायची. आई-वडील आणि भातशेती करण्यात मग्न असतांना ही मात्र आपल्या सवंगड्यांसोबत चिखलात फुटबॉल खेळण्यात रमून जायची. शाळेत असतांना तिच्या शिक्षकांनी तिच्यातल्या एका एथलिटला बरोबर ओळखले आणि तिला फुटबॉल पासून धावण्याच्या शर्यतीकडे वळवले. अर्थातच या हिऱ्याकडे निपुण दास या जौहरीची नजर पडली आणि त्यांनी या हिऱ्याला पैलू पाडण्याचे आव्हान स्विकारले. मात्र परिस्थिती एवढी सोपी नव्हती. एकतर एथलेटिक्स करता तिला गुवाहाटीला दररोज येणे जाणे करावे लागायचे जे तिच्या घरापासून १५० किमी अंतरावर होते शिवाय शालेय शिक्षण सुरू असल्याने शिक्षण की खेळ या कात्रीत ती सापडली होती. अखेर तिच्या वडिलांनी, जे एक फुटबॉलपटू होते, हिमा दासच्या पाठीशी उभे राहिले आणि पुढील प्रशिक्षणाकरीता तिला निपुण दास यांच्या देखरेखीखाली गुवाहाटीला पाठवण्यास तयार झाले.
वयाच्या १६ व्या वर्षी, पुरेसे ट्रेनिंग, सराव अथवा सुखसुविधा नसतांनाही हिमा दासने राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. हाच धडाडा कायम ठेवत तिने राष्ट्रीय स्तरावर, आशियाई युवा स्पर्धा आणि जागतिक युवा स्पर्धेत आपले खणखणीत नाणे वाजवायला सुरुवात केली. भलेही तिला या स्पर्धांमध्ये पदक जिंकता आले नाही मात्र सर्वत्र आपली ओळख निर्माण करण्यात ती नक्कीच यशस्वी ठरली. २०१८ साल खऱ्या अर्थानं तिच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यासारखे ठरले. २०१८ ऑस्ट्रेलियाच्या गोल्डकोस्ट इथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने ४०० मिटर तसेच ४×४०० रिले स्पर्धेत भाग घेतला आणि पहिल्यांदा जागतिक स्पर्धा काय असते, किती परिश्रम घ्यावे लागते याचा धडा घेतला. इथेही तिच्या पदरी निराशाच पडली आणि पदकाविना तिला मायभुमीत परतावे लागले होते. वास्तविकत: अशा प्रसंगी कुणीही निराश होणे स्वाभाविक होते मात्र हिमा दासने पदक मिळवण्यापेक्षा धावण्यात आपले टायमिंग सुधारण्यावर भर दिला आणि इथेच तिला तिच्या यशाचा मुलमंत्र सापडला होता.
एप्रिल २०१८, स्थळ होते टॅम्पीअर, फिनलंडचे आणि निमित्त होते जागतिक एथलेटिक्स अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिप स्पर्धेचे. हिमा दास भारतातर्फे ४०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाली होती आणि सहाजिकच ती हॉट फेवरेट नसल्याने काहीशी दुर्लक्षित होती. मात्र हिमा दास जरी चौथ्या लेनमधुन धावणार असली तरी तिची नजर स्पर्धा जिंकण्यासाठी पहिला क्रमांक गाठण्याकडे होती आणि झालेही तसेच. एव्हाना इकडे आपला देश दिवसभराचे कामधाम आटोपून झोपायच्या तयारीत होता तर तिकडे हिमा दास आपल्या देशाला एथलेटिक्स मध्ये सुवर्णपहाट करुन द्यायच्या तयारीत होती. स्पर्धेला सुरुवात होताच इतर खेळाडूंनी त्वेषाने धावणे सुरू केले आणि ३०० मिटर अंतरापर्यंत हिमा दास पिछाडीवर असल्याचे भासत होते. मात्र शेवटचे १०० मिटर अंतर दृष्टीक्षेपात येताच *हिमा दास अर्थातच धिंग एक्सप्रेस* आपला टॉप गिअर टाकत सुसाट वेगाने निघाली आणि उर्वरित खेळाडूंना बरेच मागे टाकत अंतिम रेषा ओलांडली.
खरेतर स्पर्धेतील शेवटचे १०० मिटर अंतर ती धावली म्हणण्यापेक्षा पंख लाऊन उडत गेली असे म्हणने जास्त संयुक्तिक ठरेल इतक्या झपाट्याने तिने ते अंतर कापलेले होते. ४०० मिटर अंतर ५१.४६ सेकंदात पुर्ण करत तिने सुवर्णपदक हस्तगत केले होते सोबतच मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू बनली होती. हिमा दासच्या पहिले सिमा पुनिया (थाळीफेक, कांस्यपदक,२००२), नवनीत कौर धिल्लन (थाळीफेक, कांस्यपदक,२०१४) आणि निरज चोप्रा (भालाफेक,सुवर्णपदक,२०१६) यांनी मैदानी खेळात आपली चमक दाखवली होती.ऑगस्ट २०१८ ला इंडोनेशियात झालेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेत तिची कामगिरी भरभराटीला आली आणि २ सुवर्ण, १ रौप्यपदकाची तिने कमाई केली. ४०० मिटर मध्ये रौप्यपदक तर ४×४०० मिटर रिले आणि ४×४०० संयुक्त प्रकारात सुवर्णपदक पटकावले. २०१९ ला तर हिमा दासने सुवर्णपदकाची लयलुटच केली. पहिले पोलंड आणि नंतर झेक रिपब्लिकला झालेल्या स्पर्धांत १९ दिवसांत तब्बल ५ सुवर्णपदक मिळवून तिने आपल्या कामगिरीला सोनेरी मुलामा चढवला. मात्र असे असले तरी आगामी जागतिक एथलेटिक्स स्पर्धा आणि ऑलिम्पिकमध्ये तिची खरी कसोटी लागेल. सध्या ४०० मिटरमध्ये तिची सर्वोत्तम वेळ ५०.७९ सेकंद इतकी असली तरी तिला यात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे.
५ फुट ६ इंच उंचीची हिमा दासने इतक्या कमी वयात आभाळाएवढी उंची गाठली असून यापुढे आपले टायमिंग कसे सुधारता येईल यावर तिचा भर आहे. फेमिना, अॅले इंडीया, वोग्स सारख्या प्रख्यात मासिकांच्या कव्हरपेजवर सौंदर्याच्या सर्व निकषांना धुडकावून आपल्या मैदानी कामगिरीने जागा मिळवून देणारी हिमा दास उदयोन्मुख खेळाडूंसाठी आदर्श ठरलेली आहे. आपल्या दैदिप्यमान कामगिरीने तिने भारतीयांची मान जगात उंचावलेली आहे. फिनलंडला सुवर्णपदक घेतांना राष्ट्रगिताच्या वेळी तिच्या चेहऱ्यावर ओघळलेले आनंदाश्रू तिची राष्ट्रभक्ती, संस्कृती, संस्कार याची मुक साक्ष देते. राष्ट्रगिताच्या वेळी उभे रहायलाच पाहिजे काय असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी हिमा दासचा कित्ता गिरवायला हरकत नाही.
खरेतर आपल्याकडे क्रिकेटला जी प्रसिद्धी आणि पाठबळ मिळते त्या तुलनेत इतर खेळ दुर्लक्षित झालेले आहेत. आपल्याकडील नैसर्गिक, भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता एखादी खेळाडू जागतिक स्तरावर डंका वाजवतो हे एकप्रकारचे आश्चर्यच आहे. मैदानांची कमतरता, अपुऱ्या सोयीसुविधा, दर्जेदार प्रशिक्षकांची कमतरता, सामाजिक प्रोत्साहन, आर्थिक राजकीय पाठबळ या सर्व बाबींचा विचार करता हिमा दासने मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. हिमा दासच्या कर्तृत्वाची दखल घेत तिला २०१८ ला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २०१८ ला ती युनिसेफची युवा अॅम्बॅसेडर म्हणून कार्यरत होती. आसाम सरकारनेही तिला क्रिडा क्षेत्राची अॅम्बॅसेडर म्हणून जबाबदारी दिली होती. हिमा दासची कारकिर्द नुकतीच सुरू झाली असून भविष्यात तिच्याकडून आपल्या देशाला अशाच सुवर्ण कामगिरीची अपेक्षा असणार आहे. अशावेळी गरज आहे ती अशाच अनेक हिमा दासला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय पाठबळ देण्याची. तेंव्हाच कुठे जागतिक एथलेटिक्स आणि आॉलिम्पिकमध्ये आपला पदकांचा दुष्काळ संपू शकतो.