साल १९८३, स्थळ हेलसिंकी फिनलंड आणि प्रसंग होता आयएएएफ जागतिक स्पर्धेचा. यात फारसा चर्चेत नसलेल्या १९ वर्षीय रशियन तरुणाने बांबूउडी स्पर्धेत भाग घेतला आणि सर्व दिग्गजांना लिलया हरवत स्वर्णपदक पटकावले. एवढ्यावरच हा नवयुवक थांबला नाही तर बांबूउडीत स्वत:चेच विक्रम तब्बल ३५ वेळा तोडत बांबूउडीत तो दंतकथा बनला. बांबूउडीत एथलेटिक्सचे मैदान १९८१ ते २००१ पर्यंत गाजवणाऱ्या या खेळाडूला सर्गेई बुब्का या नावाने ओळखले जाते.

सोव्हिएत रशिया, उक्रेनच्या या खेळाडूने बांबूउडीत अशक्यप्राय वाटणारी ६ मिटरची उंच झेप घेत नवा इतिहास रचला. आपल्या यशस्वी कारकिर्दीत ६ मिटर किंवा त्यापेक्षा जास्त उडी तब्बल ४५ वेळा पार करणाऱ्या या गुणी खेळाडूला "बर्ड" या टोपणनावाने सुद्धा ओळखले जाते.हाडाचा एथलिट असलेल्या सर्गेई बुब्काचे पहिले प्रेम ट्रॅक अॅंड फिल्ड होते. १०० मिटर धावण्याची स्पर्धा असो की उंच उडीची स्पर्धा अथवा आईस हॉकी,,,या पठ्ठ्याने सर्वत्र नशिब आजमावून पाहिले. मात्र त्याला अभिप्रेत असलेली गगणभरारी घेता आली ती बांबू उडी स्पर्धेत. अखेर आपल्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करून त्याने आपले आयुष्य बांबूउडीसाठी वाहून घेतले आणि इथेच जगाला एका अद्वितीय खेळाडू बघायला मिळाला.

१९८३ पासून सर्गेई बुब्काने आपली सुवर्ण घोडदौड सुरु केली. आयएएएफ जागतिक स्पर्धेत लागोपाठ सहावेळा विश्वजेतेपद मिळवले. यासोबतच जागतिक इनडोअर स्पर्धा  ४ वेळा, युरोपियन स्पर्धा, युरोपियन इनडोअर स्पर्धा आणि गुडविल स्पर्धा प्रत्येकी एकदा जिंकताना एकूण १४ सुवर्णपदकांची लयलूट केली. यांत त्याने आऊटडोअर स्पर्धेत स्वत:चाच विक्रम १७ वेळा तर इनडोअर स्पर्धेत १८ वेळा मोडून सर्वांना चकित केले. एवढे सर्व पराक्रम या खेळाडूच्या नावावर असले तरी त्याला ऑलिम्पिक स्पर्धेचा मात्र शाप मिळाला होता. *कभी किसिको मुकम्मल जहाँ नहीं मिलता* हे बांबूउडीत विक्रमांच्या राशी रचणाऱ्या सर्गेई बुब्काच्या बाबतीत तंतोतंत लागू होते.

दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या दोन गटात विभागणी झाली होती आणि यांच्यातल्या शितयुद्धाच्या झळा ऑलिम्पिक स्पर्धांनाही पोहोचल्या होत्या. १९८० रशियात माॅस्को ला झालेल्या ऑलिम्पिकवर अमेरिका आणि त्याच्या मित्रराष्ट्रांनी बहिष्कार टाकला होता तर १९८४ ला अमेरिकेच्या लॉसएंजेलीसला झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सोव्हिएत युनियन आणि मित्रराष्ट्रांनी बहिष्कार घालून हिशोब चुकता केला होता. खरेतर १९८४ मध्ये सर्गेई बुब्काची कारकिर्द भरभराटीला येण्यास नुकतीच सुरूवात झाली होती आणि १९८४ ऑलिम्पिकच्या पुर्वी रोमच्या जागतिक आयएएएफ स्पर्धेत बुब्काने बांबूउडीत ५.८५ मिटरची उंची गाठून आपले ऑलिम्पिक पदक जवळपास निश्चित केले होते. मात्र सोव्हिएत युनियनच्या बहिष्काराने त्याचे स्वप्न भंगले आणि त्याच्यापेक्षा जवळपास १० सेमी कमी उंची गाठणाऱ्या खेळाडूला ऑलिम्पिकचे सुवर्णपदक मिळाले होते.

वास्तविकत: या धक्क्यातून सावरायला सर्गेई बुब्काला थोडा वेळ लागला परंतु हार न मानता त्याने १९८५ ला पॅरीस फ्रान्सला झालेल्या स्पर्धेत अशक्यप्राय वाटणारी ६ मिटरची बांबू उडी घेत आपल्या अद्भुत कौशल्याने जगाला स्तिमीत केले. अशाप्रकारे बांबूउडीत ६ मिटरपेक्षा जास्त उंच उडी घेणारा जगातला तो पहिला खेळाडू ठरला. १९८४ मध्ये त्याच्या ऑलिम्पिक पदकाच्या स्वप्नाचा चुराडा झाला तरी त्याने जिद्दीने आपले प्रयत्न सुरू ठेवले आणि १९८८ च्या सेऊल, द.कोरीयाच्या ऑलिम्पिकमध्ये आपला जलवा दाखवून दिला.

खरेतर चार वर्षांची जिवघेणी प्रतिक्षा, शारिरीक तंदुरूस्ती, मानसिक कणखरतेचा कस लावत त्याने सेऊल ऑलिम्पिक गाजवण्याचा मनोमन निर्धार केला. स्पर्धेला तोंड फुटताच मनात देवाचा धावा करत हजारदा मनाशी पुटपुटत होता. मी सर्गेई बुब्का आहे, मी अजेय आहे, आज मी जिंकणारच आणि झालेही तसेच. भलेही त्याने सेऊल ऑलिम्पिकमध्ये आपला विक्रम मोडला नाही परंतु सुवर्णपदक हस्तगत करण्यात तो यशस्वी ठरला.

यानंतरच्या १९९२, १९९६ आणि २००० ऑलिम्पिकमध्ये दुखापती आणि इतर कारणांमुळे बुब्काला माघार घ्यावी लागली असली तरी त्याने १९९४ उक्रेनला बांबूउडीत तब्बल ६.१४ मिटर उंच झेप घेत जगाला थक्क करून सोडले. त्याचा हा विक्रम जवळजवळ २१ वर्षे अबाधित राहीला. अखेर २०१४ ला फ्रान्सच्या रेनॉड लॅव्हिलीनीने बांबूउडीत ६.१६ मिटर उंची गाठत त्याचा हा विक्रम मोडीत काढला.

१९८१ ते १९९१ पर्यंत सोव्हिएत युनियन आणि १९९१ ते २००१ पर्यंत युक्रेनचे प्रतिनिधित्व करणारा सर्गेई बुब्का बांबूउडीत आपल्या भीमपराक्रमाने एक जिवंत दंतकथा बनलेला आहे. त्याचा बांबूउडीतला प्रवास अचंबित करणारा आहे. जिंकण्यासाठी दोन तर विश्वविक्रमा करीता तिन प्रयत्न गरजेचे असल्याचे तो वारंवार नमूद करतो. कारकिर्द ऐन भरात असतांना ऑलिम्पिक पदक हुकल्याने निराश न होता त्याने जिद्द सोडली नाही आणि स्वत:शीच स्पर्धा करत नवनवे विक्रम नोंदवले. पारंपरिक खेळपद्धतीला फाटा देत त्याने आपल्या आगळ्यावेगळ्या पद्धतीने बांबूची पकड उंच धरत तो आकाशी उंच झेपावला आणि त्याने अनेक विक्रमांना पायाशी लोळण घालायला लावले.

सामर्थ्य, वेग आणि जिमनॅस्टिकच्या कलेचे अफलातून मिश्रण असलेला हा खेळाडू २००१ ला निवृत्त झाला असला तरी खेळाप्रती असलेली त्याची ओढ जराही कमी झाली नाही. नवोदित खेळाडूंसाठी त्याने डोनेट्स्क युक्रेनला सर्गेई बुब्का स्पोर्ट्स क्लब उभारला असून इथे तो नवोदितांना बांबूउडीचे धडे देतो. त्याच्या कारकीर्दीवर १९८७ ला *सर्गेई बुब्का, अॅन अटेम्प्ट इज रिव्हर्स्ड* ही ग्रंथसुची तयार झालेली आहे. २००७ पासून तो आयएएएफ या संघटनेच्या उपाध्यक्षपदी आहे तर २००५ पासून  युक्रेनच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक कमीटीच्या अध्यक्षपदी आहे. आयएएएफ च्या हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट या खेळाडूला ट्रॅक अॅंड फिल्डतर्फे  दोनदा *एथलिट ऑफ दी इयर* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोबतच त्याने सोव्हिएत युनियनचा *स्पोर्ट्समन ऑफ दी इयर* हा पुरस्कार तिन वेळा पटकावला आहे.

दि‌. ०७ जुलै २०२०

डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel