- रमणराज गड्डम
प्रिय लोकहो, धावपळीच्या दुनियेत कधी असं वाटलं ही नव्हतं की काही दिवस संपूर्ण जग असं एकदम थांबेल म्हणून. होय, आत्ता फक्त पृथ्वी गोल फिरतीये पण जग थांबलेलं आहे. चीन मध्ये जन्म घेतलेल्या कोरोना या विषाणूमुळे अख्खे जग बंद आहे. शाळेत असताना आपण डिक्शनरी चाळली पण कधी आपल्याला लॉकडाऊन या शब्दाशी संबंध आला नव्हता. हां तेच ज्या देशात कोरोना प्रादुर्भाव पसरलाय ते सगळे देश लॉकडाऊन केलेत म्हणजे आपल्या भाषेत संचारबंदी. कोरोना या रोगामुळे काही देशच नव्हे मोठया, प्रगतशील, सुंदर अशी इटली, जपान, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि सर्वात मोठी लोकशाही देश असलेली आपल्या भारतातील मुंबई, दिल्ली या सगळ्यांना फटका बसलेला आहे. मंदिर, मस्जिद, पार्क, सिनेमगृह, शाळा, महाविद्यालये आदी सर्व या कोरोना मुळे बंद आहेत.
संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था या घडीला ठप्प झालेली आहे. या सर्व घटकांचा विचार केला तर आपला देश, जग पुन्हा सुरळीत कधी होईल असा प्रश्न पडला असेल आपल्याला..? नक्की याचे उत्तरही आपल्याकडेच आहे. याआधी जगाने भरपूर युद्ध पाहिलेत. प्लेग, स्वाईन फ्लू, चिकन गुनिया सारखी भरपूर रोग ही जगाने अनुभवलेत. पण कोरोना या रोगामुळे युद्ध काळापेक्षाही वाईट दिवस आत्ता जग अनुभवताना दिसतंय. भारतात ही 1975ला ही आणीबाणी होती. पण त्यापेक्षाही आत्ताची परिस्थिती भयंकर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आत्ताची कोरोना सदृश्य परिस्थिती जगाला खूप काही सांगते ती अशी की इथं माणसापासून माणूसच पळून जातोय. बिचाऱ्या त्या मुक्या प्राण्यांचं कसं त्यापासून ही माणसं लांब आहेत. अशी भयावह स्थिती निर्माण झालेली सगळीकडे दिसत आहे. कदाचित यापेक्षा युद्ध झालं तरी बरं झालं असतं असंही काही जणांना वाटतं कारण अशीही सगळी अर्थ व्यवस्था बिकट, विस्कळीत झाली आहे.
दिवसेंदिवस वाढत्या कोरोना रुग्णामुळे कोरोनाला थांबवायचं कसं, रोखायच कसं, याच्याशी लढा कसा द्यायचं, कधी एकदा हा रोग संपेल, कधी नोकरीला जाऊ, कधी आपला व्यवसाय पुन्हा चालू होईल, मुलांचे शाळा, महाविद्यालये कधी चालू होईल असे विविध प्रश्न आपल्या मनाला भेडसावत असेल, कारण सध्या घरात आपल्याला काही काम नसल्यामुळे सहाजिकच आहे हे आपल्या डोक्यात या प्रश्नाचं भडीमार होत आहे. घरात टीव्ही लावा कोरोना, हातात मोबाईल पकडा कोरोना, बाहेर कुठे कट्ट्यावर बसा कोरोना च्यायला हा रोग कुठून येऊन ठेपलंय रे असं वाटायला लागतं.
जर कोरोनाला आपल्याला खरंच संपवायचं असेल किंवा त्याच्याशी सामना करायचं असेल तर आपल्याला माणुस म्हणून आपल्या स्वतःवर काही निर्बंध घालायला हवंय. मग ते निर्बंध कसले...? तर ते सरकार घालून दिलेल्या बंधन, आदेश, सूचना याचे काटेकोरपणे पालन करत सरकार, प्रशासनाला सर्वतोपरी मदत करणं हा एकच पर्याय सध्या कोरोनाला हरवण्यासाठीचा आहे.वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा विचार करता कधी आपल्या दाराजवळ येईल काय सांगता येत नाही.संचारबंदी लॉकडाऊन ही एक सर्व कुटुंब एकमेकांसोबत मिळून मिसळून राहण्यासाठी सुवर्णसंधी समजा आणि घरातच थांबून बाहेर विनाकारण न फिरता कुटुंबासमावेत वेळ घालवा.कोरोनाला हरवण्यासाठी आपण प्रत्येकाने सर्वतोपरी काळजी घ्या.लवकरच आपण या कोरोनाला हरवू ही लढाई आपण जिंकून पुन्हा एकमेकांना नक्की भेटूया.
धन्यवाद.