- सचिन आत्माराम होळकर
कोरोना हे नाव देखील देशातील अर्ध्या-अधिक जनतेने या पूर्वी कधी ऐकले नव्हते मात्र आज अगदी अडाणी, अंगठेबहाद्दर देखील कोरोना व्हायरसवर चर्चा करताना दिसतो कोरोना हे संपूर्ण मानव जातीवरील संकट म्हणावे लागेल आपल्या देशात देखील कोरोना चांगला पसरत आहे इतर देशांच्या तुलनेत खूप कमी असला तरी देशातील समाज जीवनावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला आहे. आपल्याकडील संपूर्ण अर्थव्यवस्था राजकीय-सामाजिक व्यवस्था तसेच जनजीवन कोरोना मुळे अक्षरश ढवळून निघाले आहे या कोरोनाच्या काळात सरकारने लाँकडाऊनच्या आणि संचार बंदीच्या रूपात सर्व सामान्यांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे याच काळात अनेकांना किंवा प्रत्येकाला अनेक चांगले वाईट अनुभव आले अर्थात जीवन हे प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी शिकवत असते असं म्हणतात मात्र लॉकडाउनच्या काळात अनेक प्रकारचे धडे जनतेला कोरोनाने शिकवले. डोक्याला उपरणे आणि टोपी सोडून कधीही काहीही न घालणारी आमच्या ग्रामीण भागातील जनतेला मास्क नावाची नवीन वस्तू परिधान करताना खूप विचित्र वाटले वयोवृद्धांच्या त्या पारावरच्या मनमोकळ्या गप्पा सोशल डिस्टनसिंग आणि संचारबंदीमुळे बंद झाल्या दिवस-रात्र मीडिया, सोशल मीडिया आणि डायलरटोन वरील माहितीमुळे खोकला हे प्रमुख लक्षण असल्याचं ग्रामीण जनतेला कळल्यावर अनेक वर्षांपासून खोकला असणाऱ्या किंवा इतर कारणांनी खोकला सुरू झालेल्या लोकांकडे जनता संशयाने बघायला लागली थोडक्यात काय तर कोरोनाचा शरीरापेक्षा मनावर परिणाम झालेल्यांची संख्या जास्त आहे आजच्या काळात मनाने खूप दूर गेलेल्या माणसाला शरीराने सुद्धा अंतर ठेवावे लागते त्यामुळे हात मिळवणे, गळा भेट घेणे तर दुरापास्तच झाले गावातले वातावरण म्हणाल तर संपूर्ण गाव दुखवटा पाळत असल्यासारखं वाटायला लागले यापूर्वी किमान ग्रामीण भागाला तरी अशी सवय नव्हती मात्र करून आणि ते कोरोनाने करून दाखवले शहरी भागातील जनतेला रोज रविवार वाटायला लागला सुरुवातीला फार दिवसांनी सुट्टी मिळत आहे अशा आनंदात ते असताना नंतर मात्र त्यांना आपलं घर पोलीस कोठडीसारखं वाटायला लागलं लॉकडाऊनच्या सुरुवातीचे काही दिवस चांगले वाटत होते मात्र नंतर अनेक घरांमध्ये पती-पत्नीचे वाद देखील वाढले अर्थात अनेकांचे मनोमिलन देखील झाले असावे आता त्या वादाची परिणीती लॉकडाऊन संपल्यावरच कळेल असो मात्र रोज बाहेर असणाऱ्या नवऱ्याचा किंवा बायकोचा स्वभाव ओळखण्याचा हा काळ होता असे म्हणायला हरकत नाही. या फावल्या वेळात मात्र अनेकांच्या सुप्त कला मात्र विकसित झाल्या बच्चे कंपनीचे मात्र सर्वात जास्त हाल झाले आई-बाबा बाहेर जाऊ देत नाही आणि घरी टीव्हीवर कार्टून आणि मोबाईलवर जास्त वेळ गेम खेळू देत नसल्याने काहीशी चिडचिड बच्चे कंपनीची झाली अर्थात काहींनी अभ्यासासाठी ऑनलाईन पद्धत वापरून अभ्यास सुरू ठेवला तर काही घरीच अभ्यास करत आहेत. रोज शॉपिंग करायची सवय असणाऱ्यांचे आणि रोज बाहेर खाण्याची सवय असणारे लॉकडाऊनमुळे खूप त्रस्त झाले मात्र कमी खर्चात जीवन क्रम कसा चालू शकतो याचा त्यांना धडा मिळाला असावा. आयुष्यात अनेक गोष्टींवर आपण विनाकारण खर्च करतो हे निश्चित सिद्ध झाले की परिणाम पुरुषांवर जास्त आणि स्त्रियांवर थोडा कमी झाला हे नक्की ! मात्र त्यात स्वयंपाक घरात अनेक नवीन मेनू बनवायला शिकलेल्या गृहिणींची संख्या कमी नाही.
कोरोनारुपी संकट देशावर आल्याने घराघरात समाजसेवक सापडू लागले यापूर्वी कधीही समाज कार्यात न दिसणारी तरुण मंडळी अनेक राजकीय पक्षांच्या, सामाजिक संस्थांच्या, तसेच मित्र मंडळाच्या माध्यमातून तर काही व्यक्तिगत माध्यमातून विविध प्रकारच्या कार्यामध्ये पुढाकार घेताना दिसली यातून त्यांचा वेळ चांगला जाईल शिवाय पेपरला नाव आणि सोशल मीडियावर अन्नधान्य वाटप करतानाचे फोटो पण येतील हाही काहींचा उद्देश असावा त्यात अनेक ग्रामपंचायत, नगर पंचायत इत्यादी निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे इच्छुक उमेदवार आपण बाबा आमटे असल्यासारखे कार्य करत आहे यात काहींनी गावांमध्ये जंतुनाशक म्हणून पाण्याचे फवारे देखील मारले तर काहींनी दिलेल्या दानापेक्षा त्यावर चिटकवलेले स्वतःचे फोटो जास्त मोठ्या आकाराचे चिकटवलेले होते मात्र ये पब्लिक है, ये सब जानती है !असो त्यात खऱ्या अर्थाने समाज कार्य करणारे तरुण देखील होते हे मात्र निश्चित अशांनी कुठलाही गाजावाजा फोटोसेशन न करता काम केले.
या काळात मात्र संत गाडगे बाबांनी सांगितलेल्या ग्राम स्वच्छतेच्या मार्गावर देखील खुप मोठे काम झाले गाव स्वच्छ झाली मात्र अशाच गावांमधल्या काही दूषित मनाच्या माणसांची देखील समाजाला ओळख पटली त्यात अधिक किमतीने किराणा माल विकणारे काही दुकानदार, एमआरपी पेक्षा जास्त दराने औषध विकणारे दुकानदार, इतर लूट करणारे, तसेच परिस्थिचा फायदा घेणारे महाभाग समाजात सापडले मात्र याच समाजात आपल्या कष्टाचे दाम मागत फिरणारा शेतकरी वर्ग आणि त्यांची होणारी दमछाक ही दुःखद म्हणायला पाहिजे कारण त्यांची उत्पादित माल विकण्याचीदेखील पंचाईत निर्माण झाली त्यातील काहींनी फुकट भाजीपाला व फळे वाटून खऱ्या अर्थाने समाज कार्य केले या संपूर्ण काळात मात्र डॉक्टर्स, पोलीस आणि प्रशासन व्यवस्थेचे महत्त्व जनतेला समजले. यापूर्वी पांडू वाटणारा पोलिसदादा पांडुरंग वाटायला लागला. उशिरा का होईना पण सत्य समजले देशाला मोठे मोठे हॉस्पिटल खूप गरजेचे आहे हे पुतळे मंदिर मशिद इत्यादी बांधनाऱ्यांनी बोध घेतला असल्यास कोरोना यशस्वी झाला असे समजण्यात येईल याच काळात अनेक गुरुद्वारा मंदिर मशीद यातून दानधर्म झाले आणि हे सर्वधर्मसमभाव तत्वावर चालणारे आपल्या देशाला जात-पात-धर्म न विचारता व्यक्तीला दान करण्यात आली उत्तम उदाहरण निर्माण झाले अनेक मोठ्या व्यक्तींनी कंपन्यांनी अभिनेत्यांनी देखील दानधर्म केले या निमित्ताने बर्याच वर्षांपासून सुप्त झालेली स्वदेशी चळवळ पुन्हा सक्रिय झाली आणि सोशल मीडियावरील स्वदेशी विदेशी कंपन्यांच्या याद्या झळकायला सुरुवात झाली काहीही असो आपल्या देशात राष्ट्रवाद पुन्हा जागा झाला हे निश्चित.
कोरोनाच्या उपचारासंबंधी आपल्या देशात खूप हालचाली झाल्या अनेक जण त्यांच्या त्यांच्या बुद्धीने कोरोनावर हा उपचार आहे असे सांगू लागला मात्र स्वतःवर प्रयोग करून दाखवण्याचे धाडस कोणीही केले नाही शेवटी काय तर बोलाची भात आणि बोलाचीच कढीएवढेच !
आपल्या नैमित्तिक जीवनात गुंग असलेल्या जनतेला लॉकडाऊनच्या रूपाने अनेक अडचणी आल्या बायकोला सोडून बाहेर गेलेला नवरा किंवा नवऱ्याला सोडून बाहेर गेलेली बायको जिथे गेली तिथेच अडकून पडली समाजात अशी शेकडो उदाहरणे सापडतील दो हंसो का जोडा बिछड गयो रेअसं म्हणता येईल अनेकांनी मात्र वेगवेगळी कारणे बनवून वेगवेगळ्या अत्यावश्यक गरजा दाखवून काहीनी रात्री-अपरात्री शॉर्टकटचा प्रवास करून पोलिस यंत्रणेला चुकारा देऊन आपल्या जोडीदाराला घरी आणले मात्र अनेक जण आजही लॉकडाऊन उठण्याची वाट बघत आहेत याच काळात अनेक तरुण-तरुणींचे विवाह तसेच वाडनिश्चय कार्यक्रम होणार होते त्यांची मात्र पुरता निराशा झाली काहींनी मोठे कार्यक्रम होत नाही म्हणून घरातच लग्न विधी उरकवण्याचा आदर्श समाजा समोर ठेवला तर काही मात्र लग्न आयुष्यात एकदाच होते म्हणून मोठे करायचे म्हणून लॉकडाऊन उठण्याच्या प्रतीक्षेत आहे या काळात मात्र स्मार्ट फोन खूप कामी आला. किमान व्हिडीओ कॉल करून आपल्या होणाऱ्या जोडीदाराला आपण बघू शकतो एवढी त्यांची इच्छा पूर्ण झाली.
लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक हाल झाले ते गरीब आणि हातावर पोट असणाऱ्या जनतेचे त्यांचे दुःख या सर्वांपेक्षा खूप भिन्न होते आणि खरतर अशाच व्यक्तींना मदतीची गरज होती असं मला वाटतं कित्येकांतपर्यंत मदत पोहोचली असेल याबाबत मात्र प्रश्न आहे परप्रांतीय मजूर देखील गावात अन्नछत्र सुरू असून पण पोलिसांच्या काठ्या खाव्या लागतात म्हणून उपाशी सुद्धा झोपली असतील अनेकजण शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या घराकडे प्रस्थान करताहेत खऱ्या अर्थाने अशांची सोय व्हायला हवी हे दुःख मात्र कोरोनानंतर देखील मनात असणार आहे कोरोनाच्या निमित्ताने पर्यावरण मात्र स्वच्छ झाले निसर्गातील जीवनचक्र सुधारले हवा आणि पाणी नद्यांचे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले याशिवाय ओझोनचा थर वाढला भविष्यात या सर्व बाबींचा निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही मात्र संपूर्ण देशाचं राज्याचं आणि जगाचं अर्थकारण खूप मोठ्या प्रमाणात बिघडलं हे सत्य आहे कुछ पाने के लिये कुछ खोना पडता हैहे मात्र नक्की..