इकडे मनस्वी गावातल्या लोकांना एकाजागी जमवून बसली होती. इतक्यात गावाकडे काहीतरी वाईट येत असल्याची जाणीव तिला झाली. तिनी गावातल्या लोकांना सावध केले. इतक्यात खंदकाच्या दुसऱ्या टोकाला विक्रम आणि ते दोघे निग्रो दिसले. विक्रम काकुळतीने आपल्या आईला हाक मारत होता." आई ! आई ! मला वाचव तो दुष्ट 'फेरीस' माझ्या जीवावर उठलाय. त्यांनी मला धमकावून इथे आणायला भाग पाडले. त्यांनी आपल्या गावाची वाट लावली आणि आता मला मारायला येतोय. आई मला आत घे." इकडे अर्जुनची आई आपल्या धाकट्या मुलाकडे धावत निघाली. त्यांना त्याची दया येत होती. मनस्वीने आडवल्यावर त्या म्हणाल्या," हे बघ पोरी ! मला माझा मुलगा आणि परका कळणार नाही का ? तो विक्रमच आहे. जर तुम्ही त्याला गावात घेणार नसाल तर मी जाते तिकडे. रस्ता मोकळा कर." मनस्वीने नकार देताच त्या तिकडे निघाल्या. विक्रम त्या खंदकाच्या आत येऊ शकत नव्हता. त्या कसेतरी करून ती रेषा पार करून गेल्या. त्यांनी कोणालाही जुमानले नाही. त्यांनी धावत जाऊन विक्रमला मिठी मारली. विक्रम हसला आणि हसताना मनस्वीला त्याचे भयानक सुळे दिसले.
इकडे तळघरात एका पेटीत त्यांना त्या परदेशी माणसाचे प्रेत दिसले. त्यावर 'फेरीस' असे लिहिले होते. त्यांनी त्याच्या नाकातोंडात लसूण भरला. इतक्यात त्याच्या हस्तकांनी या लोकांवर हल्ला केला. फादर विल्यम्स आणि तळघरात असेलेले फादर त्यांच्यावर होली वॉटर शिंपडून त्यांना दूर ठेऊ लागले. इतक्यात दोन फादरनी हातात घेतलेले क्रॉस त्यांच्यावरच उलटून पोटात खुपसले गेले व ते मृत्युमुखी पडलें. मग वरती थांबलेले फादरही खाली आले. परंतु तेही मारले गेले. शेवटी फादर विल्यम्स उरले. त्यांनी पटकन तो क्रॉस फेरीस च्या छातीत खुपसला. मोठी किंकाळी मारून तो निपचित झाला. त्याला सगळ्यांनी तिथेच अग्नी दिला मग एक एक करून त्या तळघरल्या सर्वानाच शोधून जाळले. मग ते परत जायला निघाले. गावात येताच मनस्वीने घडलेली सर्व हकीगत सांगितली. विक्रमने आईला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मनस्वीने त्यांच्यावर तिच्या आजीने दिलेले तिच्या गुरुचे भस्म उडवून त्यांना मागे ढकलले आणि त्यांना ती सुरक्षित रींगणात घेऊन आली. त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. आता सगळे नष्ट झाले होते. मूळ म्हणजे त्यांना आज्ञा देणारा फेरीस. आता घाबरण्यासारखे काहीच नव्हते. फेरिसमुळेच ते शक्तिशाली होत होते. मग फादर, मनस्वी आणि अर्जुन मुंबईत निघून गेले. सर्व लोक गावात सुरक्षित होते. आता ते त्यांच्या गावात जाऊ शकत होते.
विक्रमचा काहीच पत्ता लागला नाही.
मनस्वी या सर्व घटना लिहून ठेवत होती. तिला फादर विल्यम्सनी सांगितलेले सर्व आठवत होते," हे व्हॅम्पायर कोणाचेही रूप घेऊ शकतात. माणूस प्राणी, पक्षी " आणि ती दचकली. त्या दिवशी आलेला नक्की कोण होता? फेरीस म्हणून ज्याला मारलंतो नक्की फेरीसच होता ना? त्यानी मारताना फार विरोध केला नाही. असं फादर म्हणाले. त्या दिवशी नक्की विक्रमच आला होता ना ? कि .................
समाप्त
सौ. संपदा राजेश देशपांडे