ख्रिस्ती धर्माची सर्वधर्मसमभाव बाबतची शिकवण वा मते समजून घेण्यासाठी ख्रिस्ती धर्माचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या बायबलचा अभ्यास करणे आवश्यक आहे. परंतु बहुसंख्य भारतीय या भानगडीत कधी पडतच नाहीत! हिंदूंच्या बाबतीत बोलायचे झाले तर स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या हिंदूंनी स्वतःच्या धर्मग्रंथाचा, सनातन संस्कृतीचा देखील अभ्यास केलेला नसतो. त्यामुळे इस्लाम वा ख्रिस्ती धर्मग्रंथ तर लांबच राहिले. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले तथाकथित पुरोगामी लोक परधर्मियांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास न करताच, 'सर्व धर्म समान आहेत, सर्वच धर्म मानवतेची शिकवण देतात!' वगैरे बाता मारण्यात धन्यता मानताना दिसतात. या मंडळींनी सनातन हिंदू धर्म, भारतीय चिंतन, भारतीय तत्वज्ञान जाणून घेऊन परधर्मियांच्या धर्मग्रंथांचा, त्यांच्या तत्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास केला तर 'सर्व धर्म समान आहेत.' या वाक्यातील फोलपणा त्यांच्या लक्षात येईल. त्याचबरोबर सनातन धर्म आणि परधर्मांची तुलनाच होऊ शकत नाही हे सुद्धा लक्षात आल्यावाचून रहाणार नाही. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगतात मानवतेचा, शांततेचा संदेश देणारी जर कुठली संस्कृती असेल तर ती भारतीय संस्कृती आहे. आणि धर्म असेल तर तो सनातन हिंदू धर्म आहे! ही गोष्ट अनुभवांती पाश्चिमात्य लोकं सुद्धा स्वीकारू लागले आहेत. त्यामुळे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी हिंदू संस्कृतीचा आपापल्या देशात प्रचार करण्याचे कार्य पाश्चिमात्य लोकं हल्ली करताना दिसतात. ही गोष्ट करण्यासाठी त्यांना कोणीही बळजबरी करत नाही. तो हिंदू संस्कृतीचा स्वभावच नाही. म्हणूनच भारतीयांनी कधीही जोर-जबरदस्तीच्या मार्गाने धर्मांतरणासाठी कधीही प्रयत्न केले नाहीत; साम्राज्य विस्तार केलेला नाही. याउलट परकीय आक्रमकांकडे देखील मानवतेच्या दृष्टीने बघितले. याच चांगुलपणाचा फायदा घेऊन परकीय आक्रमकांनी भारतात साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीने आपापल्या धर्माची पाळेमुळे रोवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. जगातील सर्वात मोठा धर्म असलेला ख्रिस्ती धर्म हा त्यापैकीच एक!
भारतातील तथाकथित सेक्युलर मंडळींनी, भारतात परकीय आक्रमकांनी तलवारीच्या बळावर पसरविलेल्या ख्रिस्ती धर्माला देखील मानवतावादी-सहिष्णु मानून 'सर्व धर्म समान आहेत.' अशी समजून करून घेतलेली आहे. परंतु त्यांची ही समजूत फक्त एक समजूत मात्र आहे. त्यात सत्यता नाही. इस्लाम प्रमाणे ख्रिस्ती धर्माचे अनुयायी देखील त्यांच्या धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे फक्त एकच ईश्वरावर श्रद्धा ठेवतात. ख्रिस्ती धर्मियांचा तो एकमेव ईश्वर म्हणजे येशू ख्रिस्त! बायबलच्या शिकवणीनुसार ख्रिस्ती धर्मीय येशू ख्रिस्त सोडून इतर कोणत्याही देवी-देवतेला आपला ईश्वर मानू शकत नाहीत. यातील सत्यता बायबल मधील पुढील वचनांवरून लक्षात येईल.
“माझ्या शिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करु नयेस." (जुना करार-निर्गम 20:3)
“तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करु नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करु नकोस; जुना करार - (निर्गम 20:4)
"त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो" (जुना करार- निर्गम 20:5)
इतकेच नव्हे तर बायबल मध्ये येशू ख्रिस्ताच्या अखेरच्या आज्ञेनुसार त्याने संपूर्ण जगतात घोषणा करण्यास सांगितले आहे की, "जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल." (नवा करार- मार्क- 16: 16)
ख्रिस्ती धर्मियांच्या धर्म ग्रंथात येशू ख्रिस्ताने अशाप्रकारे परधर्मियांविषयी केलेले प्रतिपादन व आज्ञा असल्यामुळे जे येशूला मानत नाहीत ते सर्वजण येशू ख्रिस्ताचे म्हणजे पर्यायाने त्याच्या अनुयायांचे शत्रू असून, ते शिक्षेस पात्र आहेत. अशा प्रकारची शिकवण असलेले ख्रिस्ती धर्मीय कधी सेक्युलर होऊ शकतात का? हा प्रश्न तथाकथित सेक्युलर मंडळींनी स्वतःच्या मनास विचारावा. असो, एकाच कुटुंबात रहाणाऱ्या आपल्या नात्यातील माणसांनी इतर कोणत्याही ईश्वराची उपासना केली तर बायबल काय सांगते ते पाहू.
“तुमच्या निकटची एखादी व्यक्ती तुम्हांला तुम्ही किंवा तुमच्या पूर्वजांसाठी सुद्धा ऐकीवात नसलेल्या दुसऱ्या देवतेची उपासना करण्यास सांगेल तेव्हा ती व्यक्ती तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, ‘चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु. त्या व्यक्तीच्या म्हणण्याला मान्यता देऊ नका. त्याचे ऐकू नका. त्याची कणव येऊ देऊ नका. त्याला मोकळा सोडू नका. तसेच त्याला संरक्षण देऊ नका. त्याला ठार करा. त्याला दगडांनी मारा. पहिला दगड तुम्ही उचला आणि मारायला सुरुवात करा. मग इतर जण त्याला दगडांनी मारतील. कारण मिसरमधून ज्याने तुम्हाला दास्यातून सोडवले त्या परमेश्वर देवापासूनच हा तुम्हाला बहकवायचा प्रयत्न करत आहे. " (जुना करार- अनुवाद 13:6 -13:9)
बायबलच्या या शिकवणीवरून यावरून फक्त आणि फक्त येशूलाच मानणाऱ्या व्यक्तींशी ख्रिस्ती धर्मियांचे नाते असू शकते हे स्पष्ट होते. आता आपण मानवता आणि शांतीच्या संदेशाबाबत बायबल काय सांगते हे पाहू.
"असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे. मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध, सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे. सारांश, मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील. जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील." (नवा करार - मत्त्य 10:34 - 39)
ख्रिस्ती धर्माच्या, इतर राष्ट्रांतील साम्राज्यवादी धोरणांचे स्वरूप व त्यामागची प्रेरणा बायबल मधून पुढील प्रकारे स्पष्ट होते.
"१. जो देश वतन करून घ्यायला तुम्ही निघाला आहात तेथे तुमचा देव परमेश्वर तुम्हास नेईल. आणि हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी, यबूसी अशा तुमच्यापेक्षा मोठ्या आणि बलाढ्य अशा सात राष्ट्रांना तुमच्यासमोरून घालवून देईल. २.तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करु नका. त्यांना दया दाखवू नका. ३. त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्याच्या मुली आपल्या मुलांना करून घेऊ नका. ४. कारण ते लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजन पूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल व तो तात्काळ तुमचा नाश करील. खोट्या देवांचा नाश करा ५. त्या देशात तुम्ही असे करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका. त्यांचे स्मारकस्तंभ फोडून टाका. अशेरा दैवताचे स्तंभ उपटून टाका, मूर्ती जाळून टाका. ६. कारण तुम्ही तुमच्या परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे. ७. परमेश्वराने प्रेमाने तुम्हासच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता. ८. पण सर्व सामर्थ्यानिशी तुम्हास दास्यातून मुक्त करून परमेश्वराने तुम्हास मिसर देशाबाहेर आणले, फारो राजाच्या अंमलातून सुटका केली. याचे कारण हेच की तुमच्यावर त्याचे प्रेम आहे आणि तुमची पूर्वजांना दिलेले वचन त्यास पाळायचे होते. ९. तेव्हा लक्षात ठेवा तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजारो पिढ्यांवर तो दया करतो. १०. पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही. ११. तेव्हा ज्या आज्ञा व विधी, नियम आज मी सांगितले त्यांचे काळजीपूर्वक पालन करा." (जुना करार - अनुवाद- 7:1 - 7:11)
ख्रिस्त्यांचा धर्मग्रंथ असलेल्या बायबल मधून, वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांची इतर धर्मियांविषयी असलेली भूमिका स्पष्ट करणारी अनेक उदाहरणे देता येतील परंतु या ठिकाणी आपला उद्देश फक्त हिंदू धर्म आणि ख्रिस्ती धर्म समान आहेत का? ख्रिस्ती धर्मीय सर्वधर्मसमभाव मानतात का? हे समजून घेणे इतकाच आहे. ख्रिस्ती धर्मीय सर्वधर्मसमभाव मानूच शकत नाहीत हे समजून घेण्यासाठी, आपल्या धर्माला सर्वोत्तम मानणाऱ्या ख्रिस्ती धर्मियांनी आपल्या धर्माच्या प्रचाराच्या नावाखाली जगभरात कशाप्रकारे साम्राज्य विस्तार करून ख्रिस्ती धर्म वाढवला याचा विचार करणे आवश्यक आहे.