आज जर एखाद्या मुस्लिम धर्मीयास त्याची कोणत्या धर्मावर श्रद्धा आहे? असे विचारले, तर तो अभिमानाने इस्लाम म्हणून सांगतो, ख्रिस्ती सुद्धा ख्रिस्ती धर्म म्हणून सांगतो परंतु बहुसंख्य हिंदू मात्र अभिमानाने सर्वधर्म किंवा मानवता धर्म असे उत्तर देतो. यालाच म्हणतात हिंदूंचा तथाकथित सर्वधर्मसमभाव. यामागचे कारण म्हणजे, मुस्लिम धर्मीय दिवसातून पाच वेळा नमाज पाडतात, तर बहुसंख्य ख्रिस्ती धर्मीय न चुकता रविवारी चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करतात. मुस्लिम व ख्रिस्ती धर्मीय आपले सण आपापल्या धर्माला अनुसरून असलेल्या पध्दतीनुसार करतात. त्यात त्यांना इतर धर्मियांची ढवळाढवळ, भेसळयुक्त विचार बिलकुल पसंत नसतात. उदा. मुस्लिम धर्मीय हॅप्पी ईद कधीच बोलत नाही, तर तो नेहमीच ईद मुबारक म्हणतो. ख्रिस्ती धर्मीय हॅप्पी ख्रिसमस कधीच बोलताना दिसत नाही, तर तो नेहमीच मेरी ख्रिसमस म्हणतो. परंतु हिंदूंच्या बाबतीत असे काहीही होतं नाही. हिंदूंना कधीही कशाचीच सक्ती नसल्याने त्याला त्याच्या मनानुसार, इच्छेनुसार धर्माचे आचरण करण्याचे अथवा न करण्याचे स्वातंत्र्य असते. तो देवावर श्रद्धा ठेवतो किंवा ठेवत नाही, मंदिरात जातो किंवा जात नाही, अमुक प्रकारे पूजा करतो अथवा करत नाही...असे काहीही झाले तरी सहसा त्याच्यावर कोणी रागवत नाही. म्हणून हिंदू धर्मीय शुभ दीपावली किंवा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणण्यापेक्षा हॅप्पी दिवाली म्हणण्यात धन्यता मानतो. हिंदूंच्या अशाप्रकारे वागण्यामुळे हिंदू धर्म धोक्यात येत नसला तरी त्याची मूळ तत्वे मात्र नक्कीच आचरणातुन नाहीशी होत जातात.
मुस्लिम-ख्रिस्ती धर्माच्या अनुयायांना त्यांचा धर्म, धर्माची शिकवण माहीत असते. म्हणून त्यानुसारच ते जीवनभर आचरण करतात. मुस्लिमांनी इस्लाम प्रमाणे तर ख्रिस्त्यांनी ख्रिस्ती धर्माप्रमाणे वागावे याकरिता, लहानपणापासूनच त्यांच्यावर त्यांच्या धर्माचे संस्कार केलेले असतात. परंतु हिंदूंच्या बाबतीत हल्ली तसे घडत नाही. पाश्चिमात्य विचारसरणीच्या प्रभावामुळे किंवा सनातन परंपरेत मुळातच असलेल्या विचार स्वातंत्र्यामुळे, हिंदूंना सनातन धर्माप्रमाणे आचरण करण्याची सक्ती कधीच केली जात नाही. त्यामुळे बहुसंख्य हिंदूंना सनातन धर्म, त्याची शिकवण माहीत नसते. असे असूनही, म्हणजे ज्याला स्वतःच्या धर्माची जाण नाही त्यामुळे इतर धर्म तर लांबचीच गोष्ट, असा तथाकथित सेक्युलर हिंदु सर्वधर्म समान आहेत अशा बोंबा मारून, सर्वधर्मसमभाव या संकल्पनेचे समर्थन करताना दिसतो. थोडक्यात स्वतःच्या धर्माची जाण नसल्याने हिंदू आपल्या धर्माप्रति कधीच कट्टर नसतो. हिंदूंचे आपल्या धर्माप्रति कट्टर असणे याचाच अर्थ त्याने सहिष्णु असणे हाच आहे. त्यामुळे मुस्लिम, ख्रिस्ती धर्मीय त्यांच्या धर्माप्रति दिवसेंदिवस अधिक कट्टर बनतात, तर मुळातच सहिष्णु असलेला हिंदू फक्त मानवतावादी बनतो. त्यामुळे एकीकडे आपल्या धर्माप्रति कट्टर असलेल्या इतर धर्मियांनी आपल्या धर्माला अनुसरून हिंदूंवर अत्याचार जरी केले, तरी तथाकथित सेक्युलर हिंदू त्याला इतर धर्मियांच्या कट्टरतेची जाण नसल्याने त्याकडे मानवतेच्या दृष्टीने बघतो. हिंदूंनी जगाकडे मानवतेच्या दृष्टीने बघणे हा हिंदूंचा मूळ स्वभावच आहे; परंतु अज्ञानापोटी फक्त डोळ्यांवर सर्वधर्मसमभावचा चष्मा लावल्याने हिंदू मानवतेच्या गोष्टी करत असेल, तर हा निव्वळ मूर्खपणाच आहे. असा मूर्खपणा करणारे हिंदू अप्रत्यक्षपणे दुर्जन शक्तींना त्यांची दुष्कृत्ये करण्यासाठी बळ देत आहेत.
सर्वधर्मसमभाव मानणारे दोन प्रकारचे हिंदू भारतात आहेत. एक म्हणजे जे अज्ञानापोटी सर्वधर्मसमभाव मानतात आणि दुसरे म्हणजे जे जाणीवपूर्वक आपल्या स्वार्थासाठी सर्वधर्मसमभाव समभाव मानतात. यातील दुसऱ्या प्रकारातील हिंदूंमध्ये डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेले, फक्त नावासाठीच हिंदू असलेले महाभाग येतात. स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे डाव्या विचारसरणीचे लोक पाश्चिमात्य विचारसरणीच्या त्यांच्यावरील प्रभावामुळे सनातनी हिंदूंच्या विरोधात बोलताना-वागताना दिसतात. हीच तथाकथित पुरोगामी मंडळी सनातनी हिंदूंना नेहमीच जातीयवादी ठरवून त्यांच्यावर चिखलफेक करण्याचे, त्यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचण्याचे उद्योग करताना दिसतात. भारतातील पुरोगामी मंडळींनी आजवर फक्त आणि फक्त हिंदू संस्कृतीला वाईट ठरवून हिंदू परंपरांवर टीका केली आहे. परंतु त्यांनी आजवर हे धाडस मुस्लिम व ख्रिस्ती धर्माबाबत केलेले नाही. खिस्ती धर्मियांकडून त्यांच्याच धर्मप्रसाराचे कार्य करणाऱ्या 'नन' वर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध पुरोगाम्यांनी कधीही आवाज उठवल्याचे ऐकिवात नाही. त्याचप्रमाणे इस्लामनुसार मुस्लिम समाजात प्रचलित असलेल्या हलाला, बुरखा, बहुविवाह अशा कुप्रथांवर कधीही टीका केलेली नाही. यावरून या पुरोगामी मंडळींचा स्वार्थापोटी असलेला पक्षपातीपणा लक्षात येतो. स्वतःला सेक्युलर म्हणवून घेणारी ही तथाकथित पुरोगामी मंडळी मुस्लिम, ख्रिस्ती धर्मियांनी सनातनी हिंदूंवर केलेल्या अन्याय-अत्याचार प्रसंगी मूग गिळून शांतपणे मजा बघत असतात. याउलट कधी मुस्लिम, ख्रिस्ती या धर्मियांवर अन्याय-अत्याचार झाले की, अशा घटनांना धार्मिक रंग देऊन त्याकरिता हिंदूंवर चिखलफेक करण्यासाठी सर्वात पुढे असतात. इतकेच नव्हे तर या मंडळींचा नक्षलवादास नेहमीच पाठिंबा असतो व त्यांची कृत्ये देखील नक्षलवादास खतपाणी देणारी आणि देशविघातक असतात. या गोष्टी करून त्यांना काय साध्य करायचे आहे? त्यांच्या अशाप्रकारे वागण्याची कारणे काय आहेत? हा मोठा व्यापक विषय आहे. परंतु स्वतःला सेक्युलर नि पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या धूर्त मंडळींच्या अशा वागण्यामुळे देशातील समाजस्वास्थ्य बिघडून देशाची अखंडता नेहमीच संकटात येते; इतके समजून घेऊन सर्वांनी किमान जागरूकता तरी बाळगणे देव, देश, धर्मासाठी हितकारक आहे.
समाजातील प्रस्थापित वर्गाने नेहमीच दिन-दुबळ्या वर्गाचे शोषण केले आहे; या गोष्टीवर पुरोगामी मंडळींचा ठाम विश्वास असतो. भारताच्या बाबतीत बोलायचे झाले तर या गोष्टीस भारत देखील अपवाद नाही. आपल्या समाजात एकेकाळी जातीवाद बोकाळला होता; या जातीवादामुळे समाजातील एका वर्गाला अस्पृश्य ठरवण्यात आले, त्याच्यावर अन्याय-अत्याचार देखील झाले. हे सत्य आहे! ते नाकारण्याचे कारण देखील नाही. परंतु त्या गोष्टींचे भांडवल करून, स्वतःला सेक्युलर म्हणवून घेणारी पुरोगामी मंडळी हिंदू समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असते. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी भारतीयांमध्ये आपापसात भांडणे लावून देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न भूतकाळात झालेले आहेत. त्यासाठी इतिहास साक्षी आहे! आजही तेच घडत आहे आणि पुढेही घडतच राहणार आहे. फरक फक्त इतकाच की, भूतकाळात जे काही घडवून आणण्यात आलं त्यामागे परकीयांचे षडयंत्र होतं. परंतु वर्तमानात हिंदूं-हिंदूंमध्ये वाद निर्माण करण्यासाठी, जे प्रयत्न सुरू आहेत, त्यामागे स्वकीयांचा शुल्लक स्वार्थ दडलेला असतो. अर्थातच त्यात राजकारण, सत्ताकारण ओघाने आलंच. त्याकरिता 'भलेही देशाच्या एकात्मतेचा बळी द्यावा लागला तरी चालेल, समाजात तेढ निर्माण होऊन तोड-फोड, जाळपोळ, हाणामाऱ्या, दंगली घडल्या तरी चालतील अन्यथा हे सर्व घडवूनही आणले जाईल. परंतु 'आम्ही आमचा स्वार्थ सोडणार नाही!' हे या मंडळींनी मनाशी पक्के केलेलं असतं. यासर्व गोष्टींमागे साहजिक त्यांचं हित दडलेलं असतं. समाजाच्या भावना भडकवून ही मंडळी समाजामध्ये आगी लावतात, भडकवणारे ती भडकवतात, विशिष्ट वेळेनंतर त्यातून आपलं अंगही बाजूला काढतात. आणि आपण मात्र अगदी सहजपणे समाज कंटकांनी रचलेल्या कटात अडकतो, षड्यंत्राला बळी पडतो. वाद -प्रतिवाद करत द्वेषाच्या आगीत जळत रहातो. कोणी कोणाला जाळतं तर कोणी त्यात स्वतःच जळतो! जाळणारा, जळणारा आणि मग प्रतिशोध म्हणून जाळणाऱ्यांना, जाळणारा...असे दृष्ट चक्र समाजात सुरू होते. आग अधिकच तीव्र होते, सर्वत्र पसरते, मोठा भडका उडतो. बघता-बघता मोठा वानवा पेटतो. आणि संपूर्ण समाजाला त्याची झळ पोहोचते. कित्येक निष्पाप जीव या आगीत होरपळत असताना षड्यंत्र निर्माते लांबून या सर्व गोष्टींचा असुरी आनंद घेत त्याच आगीत आपले हात शेकत बसलेले असतात; ही बाब जितक्या लवकर आपल्या लक्षात येईल तितक्या लवकर आपल्याला समाजाकडे यादृष्टीने बघण्याची दृष्टी प्राप्त होईल. त्यातूनच समाजात जागरूकता आणि सावधपणा वाढेल!
सर्वसमावेशकता आणि सर्वव्यापी सत्य हीच हिंदुत्वाची व्याख्या आहे. तीच भारताची खरी ओळख आहे. परकीयांच्या आक्रमणामुळे समाजात दोष निर्माण झाले. त्यामुळे आत्मकेंद्रीत झालेल्या हिंदू समाजात जाती-पाती, पंथ- संप्रदाय, प्रांत-भाषा, खान-पान अशाप्रकारे भेद निर्माण झाले. ज्यामुळे एकसंध असलेला हिंदू समाज विखुरला गेला. या विखुरलेल्या समाजातील वर्गा-वर्गांमधील वैमनस्य वाढवण्यासाठी इंग्रजांसारख्या परकीय आक्रमकांनी प्रयत्न केल्याने, समाजातील वर्गा-वर्गातील दरी अधिकच वाढत गेली. समाजातील भेद-भाव, अस्पृश्यता संपवण्यासाठी दीर्घ काळापासून समाज सुधारकांनी प्रयत्न केलेले आहेत. समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे समाजातील अस्पृश्यता नष्ट झालेली आहे. परंतु मनातील कटुतेच काय? ज्या वर्गाच्या बाबतीत समाजात भेदभाव झाला त्या वर्गाच्या मनात आजही कटुता कायम आहे. किंबहुना ही कटुता कायम रहावी यासाठी, समाजात आजही षड्यंत्र रचली जात आहेत. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडवून आणल्या जात आहेत. अशा घटना घडून गेल्यावर अशा षड्यंत्रला बळी पडलेल्या समाजाची यात किती चूक होती? याचे मूल्यमापन करण्याची वेळ निश्चितच निघून गेलेली असते. तरी समाजात आग लावणाऱ्यांचे हात त्यांनीच लावलेल्या आगीत जळावेत याकरिता एकच उपाय समाजाकडे शिल्लक असतो. तो म्हणजे, समाजात पुन्हा शांततेचं वातावरण निर्माण करणं. समाज कंटकांचे कट-कारस्थान ओळखून, नकळतपणे झालेल्या चुका विसरून, समाजहितासाठी इतरांच्या चुका मोठ्या मनाने माफ करून, पुन्हा नव्याने, नवीन नात्यांची सुरवात करणे समाजाची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असते. अन्यथा समाजातील वर्गा-वर्गातील मत-भेदांचा कधीच अंत होणार नाही. त्यामुळे हिंदू समाजातील जाती-पाती, भाषा-प्रांत, पंथ-संप्रदाय यांपासून मुक्त अशा भेदरहीत समाजाची निर्मिती व्हावी म्हणून हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हिंदू समाजात असलेल्या या दोषांचा गैरफायदा समाज कंटकांकडून, हिंदू समाज तोडण्यासाठी नेहमीच केला जाईल.