भारतभूमी ....जगातील प्राचीनतम वारसा असलेली संस्कृती.... जगासाठी एक प्रेरणास्थान..... जगाचे अध्यात्मिक केंद्र ..... प्राचीनतम वारसा असलेली भूमी.... महाराज भरतांच्या नावावरून याला भारतभूमी असे नाव पडले.
  हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती एक प्रगत संस्कृती होती. त्या संस्कृतीतील नगररचना , गृहरचना, सापडलेल्या वस्तू,  चित्रे,  शिल्प इत्यादींकडून ही संस्कृती प्रगत होती हे समजते. सिंधू संस्कृतीचा लोप झाल्यानंतर भारतात वैदिक काळ होऊन गेला. तत्पश्चात प्रमुख चार वेद - ऋग्वेद, यजुर्वेद , सामवेद, अथर्ववेद यांची निर्मिती झाली. तो काळही एक प्रकारचा प्रगत काळजी होता .
   अशा या प्राचीनतम महान भारतभूमीत नंद राजांची राजवट स्थापन झाली होती. मात्र हे नंदन राजे जुलमी होते. प्रजेवर बरेच जुलूम त्यांनी केले. अशा या नंद राजांची राजवट उलथून टाकून,  त्या पवित्र अशा या भारतभूमीत एक योद्धा सम्राट बनला.... याची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरली....तो एक महान चक्रवर्ती राजा झाला... त्याचे नाव चंद्रगुप्त मौर्य
       चंद्रगुप्त मौर्य ....भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचे एक हिरेजडित सुवर्णपदक म्हणावे लागेल.... जसे की भारत मातेच्या मुकुटातला मुकुटमणीच जणू...!! मौर्य घराण्याची राजकीय कारकीर्द हा भारतीय इतिहासातला एक सुवर्णकाळ मानला जातो.
    इसवी सन पूर्व ३४५ ला  जन्मलेल्या चंद्रगुप्ताने आर्य चाणक्य यांच्या मदतीने जुलमी अशा नंद राजवटीचा पराभव करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली. त्याच सुमारास तक्षशिला विद्यापीठाचे आचार्य चाणक्य नावाचे एक अतिशय बुद्धिमान , महान व्यक्ती इतिहासात होऊन गेले. आजही त्यांच्या चाणक्यनीती आणि कौटिल्य अर्थशास्त्र इत्यादी ग्रंथांवरून त्यांच्या बुद्धिमत्तेची कल्पना येते. अशा या आर्य चाणक्यांशी चंद्रगुप्त मौर्य यांची भेट झाल्यावर चाणक्यांच्या मार्गदर्शनात चंद्रगुप्ताने प्रथम पंजाब प्रांत जिंकला. खरंतर त्याच सुमारास ग्रीक राजा अलेक्झांडर हा भारतावर स्वारी करून माघारी परतला. पण त्याने भारतात जिंकलेल्या प्रदेशाची नीट व्यवस्था लावली नव्हती. त्याच अंदाधुंदीचा फायदा घेऊन चंद्रगुप्ताने पंजाब प्रांत जिंकून घेतला. सैन्य घेऊन त्यांनी मगध देशावर चाणक्याच्या मदतीने स्वारी केली आणि  धनानंद राजाचा पराभव करून मगध साम्राज्य जिंकले.  आर्य चाणक्यांनी नंदराजांचा सर्वनाश करण्याची प्रतिज्ञा पूर्ण केली.
     त्यानंतर चंद्रगुप्त मगधांच्या गादीवर राजा म्हणून विराजमान झाल्यावर त्याने उत्तरेत आपल्या सीमा वाढवायला सुरुवात केली. अलेक्झांडरचा एक सरदार सेक्युलस निकेटर याने भारतावर स्वारी केली .त्यावेळी चंद्रगुप्ताने त्याचा पाडाव केला. सेक्युलस निकेटरने  चंद्रगुप्ताशी तह केला .त्यानुसार त्याला जिंकलेले काबुल , कंदहार आणि इतर भूभाग सोडून द्यावे लागले. चंद्रगुप्ताला या तहामुळे चंद्रगुप्ताला फार मोठा प्रदेश मिळाला . त्याच्या राज्याची उत्तर सीमा हिंदुकुश पर्वतापर्यंत जाऊन पोहोचली, जिथे आपल्या राज्याची उत्तर सीमा असावी असे प्रत्येक सम्राटाला वाटत असे. तहात त्याने निकेटर ला पाचशे हत्ती दिले , यावरूनच त्यांची मुत्सद्देगिरी लक्षात येते. इसवी सन पूर्व ३२३ ला सिकंदर मरण पावल्यानंतर चंद्रगुप्ताने सिकंदराने जिंकलेले भारताचे सर्व प्रांत मुक्त केले. सेक्युलस  क्र निकेटरने आर्यवर्तावर स्वारी केल्यावर चंद्रगुप्ताने त्याचा पराभव करून त्याला हाकलून दिले. निकेटरने  त्याच्या मुलीचा हेलनचा विवाह चंद्रगुप्ताशी लावून दिला. या यशस्वी कारवाईनंतर चंद्रगुप्ताची ख्याती जगभर पसरली आणि इजिप्त व सिरीया या तत्कालीन बलाढ्य साम्राज्यांनी आपल्या राजकीय दूतावासांची  स्थापना केली व या देशांच्या राजदूतांची चंद्रगुप्ताच्या दरबारी नेमणूक करण्यात आली. ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिस हा चंद्रगुप्ताच्या राज्यकारभाराने व मौर्यांच्या ऐश्वर्याने इतका प्रभावित झाला की त्याने इंडिका या नावाचा ग्रंथ लिहिला. तो जवळपास ५ वर्षे चंद्रगुप्ताच्या दरबारी असल्याने त्याने लिहिलेली माहिती उपयुक्त ठरते.
   चंद्रगुप्ताच्या साम्राज्यात बलुचिस्तान, अफगाणिस्तान, गांधार, हिंदुकुश पर्वतरांग, काबूल, विंध्य पर्वताचा प्रदेश, बिहार, बंगाल, ओरिसा, दख्खन व म्हैसूर यांचा समावेश होता. यावरून मौर्यांचे राज्य किती बलशाली व विस्तारीत होते याचा अंदाज येतो.
    चंद्रगुप्त एक आदर्श राजा होता. नंद राजवटीत जी गुन्हेगारी वाढीला लागली होती ती चंद्रगुप्ताने नियंत्रणाखाली आणली. चाणक्याच्या मदतीने आदर्श असे गुप्तहेर खाते निर्माण केले .त्याचा परिणाम म्हणून भ्रष्टाचार नियंत्रणात आला. आदर्श अशी न्याय व्यवस्था स्थापन केली आणि लोकांच्या मनात स्वतःविषयी प्रबळ विश्वास संपादन केला. एक न्यायी राजा म्हणून त्याची ख्याती होती.
   स्वतःचे सक्षम आणि प्रबळ गुप्तहेरखाते त्याने निर्माण केले होते. त्याच्यावर अनेकदा विषप्रयोगाचे प्रयत्न झाले , मात्र त्याने ते हाणून पाडले. स्वतःच्या संरक्षणासाठी त्याने अंगरक्षक म्हणून स्रियांची नेमणूक केली होती.
      आयुष्याच्या उत्तरार्धात त्याने तत्कालीन रुढीप्रमाणे पुत्र बिंबिसार याच्या हाती राज्य सोपवून वानप्रस्थाश्रमाचा मार्ग स्वीकारला. त्यानंतर तो श्रवणबेळगोळा येथे गेला . आयुष्याच्या उत्तरार्धात जैन धर्माच्या जवळ तो गेला होता. उपवास पद्धतीने त्याने प्राणत्याग केला . श्रवणबेळगोळ येथे एक शिलालेख आढळून येतो.
     त्याची प्रशासकीय व्यवस्था उत्तम होती. पाटलिपुत्र या राजधानीची व्यवस्था तीस जणांच्या एका मंडळामार्फत चाले. याशिवाय सर्व राज्यकारभार भिन्न अधिकाऱ्यांमार्फत होई.  लष्कराचे हत्तीदळ, घोडदळ आणि पायदळ असे तीन प्रमुख विभाग होते.
    चंद्रगुप्ताचा अंमल भारतातील फार मोठ्या प्रदेशावर होता. त्याच्या ताब्यात जवळजवळ अखिल भारत होता आणि सहा लाख फौज होती. याशिवाय आठ हजार रथ, नऊ हजार हत्ती आणि तीस हजार घोडेस्वार होते.
   चंद्रगुप्त हा एक पराक्रमी, मुत्सद्दी व परोपकारी राजा होता. त्याने अखिल भारत आपल्या अंमलाखाली आणला व मौर्य वंशाची स्थापना केली. ते राज्य पुढे जवळजवळ शंभर वर्षे टिकून होते. भारताचा पहिला चक्रवर्ती सम्राट होण्याचा मान त्याला जातो. चंद्रगुप्ताचा इतिहास भारतात नेहमीच प्रेरणादायी व त्यांचे कार्य वंदनीय राहिलं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel