तो काळ परकीय सत्ता विस्ताराचा होता. भारत बाहेरून आलेल्या बाबराने मुघल सत्तेचा स्थापना केली होती पण त्याचे साम्राज्य झाले नव्हते. बाबर व हुमायून यांना साम्राज्य बनवता आले नाही. मुघल सत्ता प्रबळ करण्यात अकबर यशस्वी ठरला. अकबराने अनेक राज्यांना आपले मांडलिकत्व स्वीकारणे भाग पाडले. अशी भीती निर्माण झाली की या विशाल भारतभूमी वर एखादा तरी वीर आहे का , जो आपल्या स्वातंत्र्यासाठी प्रबळ मोगली सत्तेशी झुंज देईल..?...होता एक असा वीर , ज्याने अकबराच्या मोगली फौजेचा नक्षा उतरवला. मोगलांना सतत तुरी देताना त्याने आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा चालूच ठेवला...त्याचे नाव आहे महाराणा प्रताप...
      राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा उदयसिंहाचा पुत्र म्हणजे महाराणा प्रताप. प्रतापसिंह  नावाने ते राजस्थानात प्रसिद्ध आहेत.  त्यांचे पिता उदयसिंहानी जगमल ह्या आपल्या कनिष्ठ पुत्रास गादीचा वारस नेमले होते. जगमल हा ऐशोआरामी जीवन जगत होता. त्याला प्रजेच्या सुखाशी काहीच देणेघेणे नवते. प्रताप ने त्याला समजवायचा प्रयत्न केला असता त्याने ऐकले तर नाहीच पण प्रताप ला राज्य सोडून जाण्यास सांगितले. पण काही सरदारांनी  जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले.
    प्रताप महाराणा झाला,  त्यावेळी राजधानी चितोड अकबराच्या हातात गेली होती. अनेक राजपूतांनी अकबराचे स्वामित्व स्वीकारले होते ,  तर काही रजपुतांनी याही पुढे जाऊन आपल्या मुली अकबरास देऊन शरीरसंबंध जोडला होता.  पण राणा प्रतापने त्याच्यापुढे मान झुकवली नाही. त्याने चितोड अकबराच्या ताब्यातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला.
    आता प्रजेची सुरक्षा महत्त्वाची असल्याने त्याने  प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात वस्ती करण्यास लावले. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला. आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली.सुरक्षेसाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले. आता त्याला पराभूत करण्यासाठी अकबराने मानसिंह आणि आसफखान यांच्याबरोबर सैन्य पाठविले.
     २१ जून १५७६ रोजी हळदीघाटला  घनघोर लढाई झाली. यात मुघलांचे सैन्य जवळपास ८०,००० ते एक लाख आसवे असे इतिहासकार म्हणतात. असे असले तरी राणा प्रतापच्या फौजेने बराच पराक्रम गाजवला. प्रतापसिंहाचा पराजय झाला, तरी तो आपल्या जागी एक तोतया निर्माण करून त्याला रणभूमितून पळताना , शत्रूला तो पळणारा प्रतापच आहे हे दर्शवण्यात यशस्वी झाला. मुघल सेना त्या तोतयाच्या मागावर जाताच प्रताप इकडे सहिसलामत निसटला. आता त्याने राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालू ठेवला. अरवलीच्या पर्वतीय प्रदेशाच्या साहाय्याने त्याने मुघलांशी संघर्ष चालू ठेवला. त्याला अकबराने पराभूत करण्यासाठी त्याच्यावर अनेक सरदार पाठवले , पण प्रत्येक सरदार मार खाऊन , पराभूत होऊन परत आला.
     खुद्द अकबराचा मुलगा जहांगीर चालून आला. प्रतापने त्याचा पराभव केला. त्यानंतर सेनेची जुळवाजुळव करत परत जहांगीर ने हल्ला केला. त्यात प्रतापचा सुप्रसिध्द घोडा चेतक जखमी झाला. मोगली तोफा, बंदुकांसमोर राजपुतांचा निभाव लागला नाही. पराभव झाला. प्रताप ने जंगलाचा आश्रय घेतला.
    तत्पूर्वी प्रतापचे कर्तृत्व ठळकपणे दिसले. प्रतापने मोगलांच्या रसदा तोडल्या, खजिने लुटले. अकबर स्वतः त्याच्यावर चालून गेला पण त्याला प्रतापला न जिंकताच परत फिरावे लागले. त्याची पाठ वळताच प्रतापने आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळविले. यानंतर त्याने पुढे १२ वर्षे शांततेने राज्य केले. त्याने मोगलंना ३० वर्षे झुंजविले.
    काही काळाने आपल्या अमरसिंह ह्या पुत्राच्या हाती राज्य सोपविले व प्राण सोडला. प्रताप यांचा  मुख्य शत्रू अकबरानेही त्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे.
    असा आपल्या मातृभूमीला स्वतंत्र ठेवण्यासाठी झुंजणारा प्रताप  भारतमातेचा इतिहासातील एक महान योद्धा होता. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel