भारताच्या इतिहासातील सर्वात प्रबळ परकीय सत्तेपैकी एक म्हणजे मुघल सत्ता... या मुघल सत्तेतील एक प्रबळ व तितकाच धर्मवेडा राजा म्हणजे औरंगजेब... या औरंगजेबाच्या अन्यायाविरुद्ध भारतात अनेक जण लढले त्यापैकीच एक म्हणजे शिखांचे गुरु गोविंदसिंगजी..
गुरुगोविंद सिंग हे शिखांचे दहावे व अखेरचे गुरू होत. बिहारमधील पाटणा येथे जन्मलेले गोविंदसिंग लहानपणी ‘गोविंदराय’ या नावाने ते ओळखले जात.
त्यांचे पिता व शिखांचे नववे गुरु तेगबहादुर यांच्या वधानंतर वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी गोविंदसिंग गादीवर आले. आपल्या प्रभावी नेतृत्वाने त्यांनी शीख समाज सुसंघटित करून शिखांमध्ये राजकीय जागृती निर्माण केली. गुरु गोविंदसिंग लहानपणापासून धनुर्विद्येत वाकबगार होते. बाबा अजितसिंह, बाबा जुझारसिंह या त्यांच्या मुलांनी चमकौरच्या युद्धात पराक्रम करून वीरमरण प्राप्ती केली होती. तर बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह या लहान मुलांना सरहंदच्या नवाबने जिवंत भिंतींत पुरले होते. केसगड, फतेहगड, होलगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले त्यांनी युद्धात जिंकले. त्यांनी 42 वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता. त्यांचा संपूर्ण परिवारच धर्मासाठी लढत होता .
गुरु गोविंदसिंग यांनी खंडेदाअमृत’ नावाचा एक शिख दीक्षाविधी सुरू केला. या दीक्षेनंतर त्यांचे अनुयायी आपल्या नावापुढे ‘सिंग’ ही उपाधी लावू लागले व ‘पंच ककार’ (केस, कंगवा, कच्छ, कडे आणि कृपाण) धारण करू लागले. त्यांच्या अनुयायांना ‘खालसा' असे म्हटले जाते. खालसा पंथाचे ते संस्थापक होत. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीभेद नष्ट करून समानता प्रस्तापित केली व शीखांमध्ये आत्मसन्मानाची भावना वाढीस लावली.
त्यांनी एकेश्वरवादाचा पुरस्कार केला. शौर्य व राष्ट्रभक्ती या गुणांना त्यांनी आपल्या शिकवणुकीत अग्रस्थान दिले.त्यांच्या अनुयायांना त्यांनी लष्करी शिक्षण देऊन त्यांची एक फौज त्यांनी तयार केली व औरंगजेबाविरुद्धच्या अनेक लढायांत विजय मिळविले.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांत दिल्लीच्या तख्ताबद्दल चाललेल्या तंट्यात गोविंदसिंगानी औरंगजेबाचा ज्येष्ठ पुत्र बहादुरशाह याची बाजू घेतली व त्यास तख्तावर येण्यास मदत केल्याने बहादुरशाहाने गोविंदसिंगांचा मोठा सन्मान केला. पुढे बहादुरशाहाचा भाऊ कामबक्ष याचे बंड मोडून काढण्यासाठी गोविंदसिंग बहादुरशहासोबत दक्षिणेस गेले असताना, नांदेड मुक्कामी एका पठाणाने अचानक हल्ला करून गोविंदसिंगाचा वध केला.
गुरु गोविंदसिंगांचे संस्कृत, फार्सी, पंजाबी व व्रज भाषांवर चांगले प्रभुत्व होते व त्यांनी या चारही भाषांत ग्रंथरचना केली .आपल्या काव्यात त्यांनी विविध छंदांचा उपयोग केला . दसम ग्रंथ या ग्रंथात गोविंदसिंगांच्या रचना संकलित केलेल्या असून, जापसाहिब, विचित्र नाटक, ज्ञान प्रबोध, अकाल उस्तति, जफरनामा या त्यांतील काही प्रमुख रचना होत.विद्यासागर, गोविंद गीता हे त्यांचे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत.विद्वानांकरवी संस्कृत साहित्यकृतींचे हिंदी व पंजाबी भाषांतून त्यांनी अनुवाद करून घेतले. त्यांनी मुघलांविरुद्ध एकूण १४ लढाया केल्या. धर्मासाठी त्यांच्या संपूर्ण परिवाराने बलिदान दिले म्हणूनच त्यांना "सरबंसदानी" म्हटले जाते .
गुरुगोविंद सिंग हे केवळ शिखांच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक असामान्य व्यक्तिमत्व होते हे मात्र नक्की...