*राजा . . गोसावी*!
😆🤷🏻‍♂️😣

पुण्याच्या मध्यवर्ती भागातील, जुन्या वास्तूंचा वेध घेतला तर इतिहास जाणून घेताना, अनेक कर्तृत्ववान माणसांच्या, कारकीर्दीचा पट उलगडत जातो. भानुविलासची सध्याची दुरावस्था पहाताना, मराठी चित्रपटांचा तो सुवर्णकाळ, रसिकांची जत्रा आणि नामवंत कलाकारांच्या सहवासाने पावन झालेली ही वास्तू, आता मात्र . . जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा . . झाल्याचे लक्षात येते. येथील तिकीटविक्रीची खिडकी पाहिल्यावर, हमखास, राजा गोसावींची आठवण होते.
मूळ गाव फलटण, जन्म 1925 आणी त्रयाहात्तर वर्षे आयूष्य लाभलेल्या या श्रेष्ठ कलाकाराच्या उमेदवारीचा काळ हा अत्यंत संघर्षाचा होता.
नावातच, *राजा आणी गोसावी* ही ओळख असलेल्या या कलाकाराने, युवावस्थेत, मास्टर विनायकांच्या घरी घरगड्याचे काम केले.प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्यांनी आधी ऑफिसबॉयचे व नंतर सुतारकाम केले . मेक-अप, प्रकाश योजना आदी क्षेत्रात काम करत ते ’एक्स्ट्रा’ नट बनले. पुढे दामुअण्णा मालवणकर यांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ते ’प्रॉम्प्टर’ झाले. त्यांना ’भावबंधन’ या नाटकात रखवालदाराची भूमिका मिळाली. तीच त्यांची नाटकातली पहिली भूमिका. नंतर ते *पुण्याच्या भानुविलास चित्रपटगृहात चित्रपटाच्या तिकीटबारीवर तिकिटे विकायचे काम करू लागले ,त्यांनी भूमिका केलेला पहिला मराठी चित्रपट ’अखेर जमलं’ आणि ’लाखाची गोष्ट’ जेव्हा पुण्यातल्या भानुविलास चित्रपटगृहात लागले, तेव्हाही राजा गोसावींनी आपल्याच चित्रपटाची तिकिटे विकली होती.*
राजा गोसावी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांच्या शब्दांत ते बी.ए.(बॉर्न आर्टिस्ट) होते. ते सुरुवातीला *कामगार म्हणून नाट्य क्षेत्रात शिरले आणि ’नटसम्राट’ म्हणून बाहेर पडले*. राजा गोसावी यांनी १००हून अधिक चित्रपटांतून कामे केली आणि जवळपास ५० नाटकांत सहभाग घेतला. ’भावबंधन’ मधील
रखवालदाराच्या भूमिकेनंतर त्याच नाटकात ’धुंडीराज’ची भूमिका मिळाली. दुसरीकडे ते नाटकाची पोस्टर्स चिकटवायचे काम करीत.
मराठी सिनेमात निरोगी विनोदाची परंपरा मा. विनायकांनी सुरू कैली आणि राजा गोसावी या खर्‍या अर्थाने चतुरस्र कलावंताने समर्थपणे जोपासली .त्यांनी रंगविलेला मध्यमवर्गीय/शहरी नायक रसिकांना मनापासून भावला. त्यांच्या चित्रपटाची घोडदौड एकोणीसशे पन्नासच्या दशकापासूनच सुरू होती. त्यांचा बोलबाला एवढा होता की, १९५८ मध्ये पुण्याच्या बाबुराव गोखलेंनी राजा गोसावीला तिहेरी भूमिकेत चमकवत ’राजा गोसावीची गोष्ट' हा चित्रपट काढला होता. साठच्या दशकात राजा गोसावी यांनी शरद तळवळकर,राजा परांजपे, यांच्या साथीने ,चित्रपटसृष्टी गाजवली,त्यांच्या अभिनयातील विनोदात निरागसता आणि नैसर्गिकता होती.ह्या तिन्ही कलावंतांचे,
बादशाही बोर्डींगशी, जिव्हाळ्याचे नाते होते.
राजा गोसावी यांना मेकअपच्या खोलीतच चेहर्‍याला रंग लावताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा इहलोकीचा प्रवास संपला .
१९९५ साली बारामती येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद हा सर्वोच्च सन्मान त्यांना लाभला होता.
या श्रेष्ठ कलाकाराने 1980 च्या गणेशोत्सवात, शुक्रवार पेठेतील आमच्या मंडळास भेट दिली होती. त्यांचे शब्द, *मी कलाक्षेत्रात, राजा आणि गोसावी म्हणून, मनसोक्त जगलो आहे. रसिकांच्या टाळ्या आणि वाहव्वा, हीच आमची संपत्ती वाटते !* . . कायमचेच स्मरणात राहिले आहेत !
भानूविलासची सध्याची धूळदाण पहाताना, मला ती खिडकी, राजा आणि गोसावी, दोन्ही शब्दांमधे सामावलेल्या कारकीर्दीचा पट उलगडून दाखवीत होती. !
*आनंद सराफ*
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel