भाकरी थापून झाल्यावर धुरपतीने हातातल्या परातीतलं पाणी अंगणात भिरकावलं तशा आजूबाजूला चरणाऱ्या आठ-दहा कोंबड्या कलकलाट करत धावत आल्या. त्या पाण्याबरोबर आलेले अन्नकण टपटप आपल्या चोचीने गोळा करू लागल्या. धुरपतीने बाजूच्या रांजनातून पाणी घेऊन पुन्हा ती परात एकदा विसळून टाकली आणि वर आभाळाकडं पाहिलं. आभाळ भरून आल्यागत वाटत होतं. सकाळपासून वारा पडला होता. कुठं झाडाचं पान हालत नव्हतं कि गवताची काडी डुलत नव्हती. पलीकडं धाम्बोडीच्या कडेच्या हिरव्यागार झाडवनात लपलेला पावशा सकाळपासून `कुहू कुहू' असा निरंतर ओरडत होता. अंगणातल्या लिंबाच्या झाडावर कावळा आपल्या घराची डागडुजी करत होता.

`हा वळीव आज तडाखा देतुया का काय जणू' असं स्वतःशीच बडबडत ती घरात शिरली. खालच्या पट्टीत सकाळपासूनच तिच्या नवऱ्यानं, महादूनं नांगर धरला होता. त्यानेही आभाळाकडे बघत वेळेचा अंदाज घेतला आणि औत सोडून बैलांना घेऊन घराकडं आला. गोठ्यात बैलांना बांधून त्यानं वैरणीच्या दोन पेंढ्या त्यांच्यासमोर मोडून टाकल्या. सकाळी घास कापायचा राहूनच गेला होता. म्हशीच्या पाठीमागे पडलेला शेणाचा पो त्याने फावडीने कडेला ढकलला आणि ओट्याकडेच्या मोरीवर हातपाय खंगाळत, धोतराला हात पुसत तो घरात आला. `काय काहिली हुन राहिलीय सकाळधरनं' असं म्हणत तो सारवलेल्या भुईवर मांडी घालून बसला. धुरपतीने लगोलग त्याच्यासमोर ताट वाढून आणून ठेवलं. गरमागरम बाजरीच्या भाकऱ्या अन उडदाची आमटी पाहून त्याला बरं वाटलं. सकाळपासून नांगर धरून त्याला भूकही लागली होती. त्यानं दोन भाकऱ्या पितळीत कुस्करल्या. `अगं जरा आमटी आन इकडं' असं म्हणत धुरपतीला हाक मारली. पण त्याचा आवाज विरायच्या अगोदरच धुरपती आमटीचं पातेलं अन भाकरीचं टोपलं घेऊन आली. आपल्या नवऱ्याच्या ताटात तिनं दोन डाव आमटी ओतली. महादूनं टोपल्यातला कांदा उचलून त्याला बुक्कीनं फोडला अन गपागपा घास घेत जेवायला सुरवात केली. धुरपती ओल्या भुईमुगाच्या शेंगा सोलून त्याच्या ताटात टाकत होती अन समाधानाने जेवणाऱ्या आपल्या धन्याकडं प्रेमाने पाहत होती.

........... महादू अन धुरपती यांना चांगली पाच एकर काळीभोर जमीन होती. शिंदेवाडीच्या खालच्या अंगाला अगदी शिवेजवळ टोकाला त्यांची वस्ती होती. त्याच्यापुढे वडगावचं शिवार सुरु होत होतं. खाली धाम्बोडीच्या बाजूला चारदोन घरं होती, पण त्याच्या पुढं मात्र त्यांचीच एकुलती एक वस्ती. मोठी पोरगी शेवंता दोन वर्षांपूर्वीच लग्न होऊन पिंपळगावला सासरी गेली होती. अन पोरगा सुभाष आयटीआय होऊन पुण्याला कुठल्याशा कंपनीत कामाला लागला होता. घरची शेती असूनही पोराचे काही मातीत हात बुडवायचं मनात नव्हतं. महादू अन द्रौपदी दोघंच आपली एकमेकाला जीव लावत शेती अन जनावरं बघत होती. एक म्हैस, दोन बैलं, तीन-चार शेळ्या अन आठ-दहा कोंबड्या असं त्यांचं भरलं घरदार होतं. ती जनावरच त्यांची जिवाभावाची झालेली होती.

............ महादुने न्याहारी उरकली. द्रौपदीने भांडी उचलून बाहेरच्या मोरीत नेली. ढेकर देत भिंतीला टेकून बसत महादुने कोपरीच्या खिशात हात घातला. पण त्याच्या हाताला फक्त चुन्याची डबीच लागली. मग त्याच्या लक्षात आलं कि तंबाखूची पुडी तर मघाशी नांगर चालू असतानेच संपली होती. त्याने उठून शर्टाचे खिसे धुंडाळले पण त्यातही काही मिळाले नाही. उठून बाजूच्या कोनाड्यात पण चाचपडून बघितले पण हाती निराशाच आली.

`धुरपते, तंबाखूची पुडी हाय का ग एखादी'.... असं त्याने चाचरतच बायकोला इचारलं.
त्याचं बोलणं ऐकून धुरपती पाठीमागे वळत म्हणाली ``आता ग बया, मी काय तंबाखू खाती का काय?' अन असं म्हणत ती गालातल्या गालात हसली.
तिचं हसणं पाहून ओशाळलेला महादू म्हणाला `न्हाई आपलं सहज म्हणलं कुठं आजूबाजूला ठिवली असशील तर'. महादू थोडावेळ तसाच बसून राहिला पण तंबाखुबिगर त्याला काही चैन पडेना. त्याने उठून शर्ट अंगात चढवला आणि पलीकडच्या पडवीत लावलेली सायकल बाहेर काढली. तसं धुरपतीचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि आश्चर्याने ती म्हणाली ``अहो कुठे निघालाय असं मधीच, दुपारच्या येळंला'

सायकलच्या चाकाची हवा बघत महादू म्हणाला `जरा गावात जाऊन तंबाखूची पुडी घेऊन येतो'
कमरेवर हात ठेवत द्रौपदी म्हणाली `काय बाई आक्रीत, नसली तमाखू एखाद्या येळेला तर काय बिगाडतय व्हय?. तिच्याकडे बघत अन गालातल्या गालात हसत महादू पण म्हणाला `तल्लफ काय असतीया ते तुला न्हाई कळायचं!
`त्यात काय कळायचं हाय! पण म्या म्हणते इथं पावसाचं लाच्छन दिसतंय, गुरुढोरं हाईत, अन तुम्ही गावाकडं निघालाय, काय म्हणायचं बया तुम्हाला' अस म्हनत धुरपतीने लाडिक तक्रार केली.
``अगं आत्ता धा मिनटात जाऊन येतोयं, पाऊस काय लगेच कोसळतुया व्हयं? हा बघ असा गेलो नि असा आलो'.. असे म्हणत त्याने सायकलवर टांग टाकली अन पायवाटेला लागला. द्रौपदी काही बोलली नाही. महादुला बाकी कुठलं व्यसन नव्हतं, तंबाखू तेवढी लागायची, पण एवढे कष्ट करणाराला एखादी तल्लप असायचीच असे म्हणत धुरपती आपल्या कामाला लागली.

........... इकडे सायकल तांगडत महादू गावाजवळ पोहोचला खरा पण येतायेताच वाऱ्याचा वेग चांगलाच वाढला होता. गावात शिरतो तर चांगली वावटळ उठली अन घडीभर काही दिसेना झालं. सायकलवरून उतरत त्याने डोळ्यावर आडवा हात धरला अन वारं कमी झाल्यावर गावच्या कमानीतून आत शिरला. तिथल्या आजूबाजूच्या पान टपऱ्या दुपारच्या उन्हामुळे बंद झालेल्या होत्या. गावात फारसं कोण दिसत नव्हतं. महादू तसाच पुढे गेला अन मारुतीच्या देवळाजवळ तुकाराम बुवाचं किराणा दुकान उघडं दिसलं. सायकल स्टँडला लावत महादू आत गेला. तुकारामबुवा खुर्चीवर बसून डुलक्या काढत होते. महादुने जरा घसा खाकरत आवाज काढला तशी तुकारामबुवांची तंद्री भंग पावली. धडपडून जागेवर बसते होत त्यांनी समोर उभ्या असलेल्या महादुकडे बघितलं. महादुने वीसची नोट समोर ठेवत म्हटलं `जरा वाईच, दोन तंबाखूच्या पुड्या द्या!

`काय मर्दा, एवढयासाठी इतक्या दुपारचा आलास व्हाय? बाहेर वावधान कसं सुटलंय बघ.' असे म्हणत त्यांनी दोन गायछाप च्या पुड्या अन सुट्टे पैसे समोर ठेवले आणि आपुलकीने म्हणाले `आता लगोलग मळ्यात जा, पाऊस सुरु व्हायच्या आत'.

`व्हय जी, ह्या काय निघालोच लगीच' असे म्हणत महादुने सायकलवर टांग टाकायला अन पावसाचा एक टपोरा थेम्ब त्याच्या डोक्यावर पडायला एकच गाठ पडली. आभाळाकडं बघत त्याने पायडल मारला अन निघाला. पण पावसाने मात्र सुरुवातच दणक्यात केली. कमानीतून बाहेर पडायच्या आतच पाऊस सुरु झाला. बरोबरच सोसाट्याचा वारा अन वीजाही चमकत होत्या. त्याने सायकल कडेला घेतली आणि गणपत टेलरच्या दुकानाच्या पत्र्याच्या आडोशाला उभा राहिला. आतून गणपत टेलरने त्याला पाहून हाक मारली `कोण महादू, अरे आत ये कि, बाहेर का भिजत उभा राहिलाय?. पण महादू म्हणाला `नको, मला रानात जायाला पाहिजे, बायको एकटी हाय घरी' असं म्हणत महादुने पावसाचा अंदाज घेतला.

`अरे काय येडा का खुळा, पाऊस बघ कसा कोसळतोय? आणि वहिनी काय, बसल्या असतील घरात. पाऊस थांबल्यावर जा म्हणं, तंवर ये आत'. गणपत टेलरचा आग्रह पाहून महादू आत येऊन स्टुलावर टेकला. पण त्याला काही चैन पडत नव्हती. बाहेर पावसाने थैमान घातले होते. बघता बघता रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहायला लागले. महादू मधेच दरवाज्याजवळ येऊन आपल्या मळ्याकडे पाहत होता. तिकडेही पावसाचा जोर दिसत होता. विजा चमकत होत्या. तेवढ्यात लाईट गेली अन टेलरचं कामही बंद पडलं. मशीन थांबवून गणपत टेलर महादूशी गप्पा मारत होता पण महादूचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. चांगला अर्धा तास पाऊस कोसळत होता. काहीवेळाने जरा जोर कमी झाल्यासारखा वाटल्यावर महादू लागलीच उठला. `अरे अजून पाऊस पुरता थांबला नाही, अन परतही येईल कदाचित. जरा वेळाने जा' असे गणपत टेलर म्हणाला. पण महादू काही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता. त्याने बाहेर येऊन धोतर वर खोचलं अन सायकलवर टांग टाकत सायकल मळ्याकडे दामटली. पाऊस कमी झाला असला तरी रस्त्यावर आलेल्या चिखलामुळे सायकल घसरत होती. पाऊसही पुन्हा जोर धरू लागला होता. कसातरी सायकल ओढत तो पाटाजवळ आला. तिथेच कडेला भिकाजी पाटलांची वस्ती बघून त्याने सायकल त्यांच्या सपराच्या वळचणीला लावली. `भिका तात्या, सायकल ठेवतोय, उद्या येऊन घेऊन जाईल' असं घराकडं बघून ओरडला अन रस्त्याला लागला. भिकाजी पाटील बाहेर येऊन पाहीपर्यंत महादू चांगला फर्लांगभर अंतर पूढे गेला होता. आता सायकलचं लोढणं कमी झाल्यामुळे महादू ताडताड पावलं टाकत मळा जवळ करत होता. पाऊस आता बराच कमी झाला होता. पण रस्त्यावरून अजूनही पाणी वाहत होते. धाम्बोडी जवळ येऊन पाहतो तर धाम्बोडी फुल्ल भरून वाहत होती. गढूळ पाणी वेगाने वाहत होतं अन बरोबर पालापाचोळा, काट्याकुट्या, अन बारक्या तुटलेल्या फांट्या पण वाहून नेत होतं. मघाशी जाताने कोरडी ठाक पडलेली धाम्बोडी काठोकाठ भरून वाहत होती. वरती सुपाऱ्याचा बाजूला चांगलाच जोरदार पाऊस झाला असावा. पलीकडे जायला खाली सिमेंट पाईप टाकून बारीकसा पूल केलेला होता पण आतामात्र त्याच्यावरून पाणी वाहत होते. महादूचा मार्ग खुंटला. काय करावं त्याला कळेना झालं. पण घरची ओढ त्याला चैन पडू देत नव्हती. रोजचा जाण्यायेण्यातला रस्ता होता. पुलावरून गुढगाभर पाणी असेल असे त्याला वाटले. मनाशी निश्चय करत त्याने धोतर घट्ट कम्बरेशी बांधले आणि पाण्यात पाऊल टाकले. चार पावले जाताच त्याला कळले कि पाण्याला चांगलीच ओढ होती. पाणी चांगलं कंबरेपर्यंत येत होतं. महादू तसा हट्टाकट्टा गडी होता, विहिरीत पोहोणारा. पाण्याच्या रेट्याला तोंड देत तो एकेक पाउल पुढे सरकत होता. त्याने बरेचसे अंतर हिमतीने पार केलेही होते. पण अचानक पाण्यातून आंब्याच्या झाडाची तुटलेली एक भलीमोठी फांदी वाहत येत होती. त्याने धडपडत पुढे जाण्याचा प्रयत्न केला पण ती फांदी वेगाने पुढे आली आणि काही करण्याच्या आत त्याच्या पायावर जोरदार दणका बसला. त्याबरोबर त्याचा तोल गेला अन त्या फांदी बरोबरच तोही पाण्यात ओढला गेला आणि फांदीबरोबरच वाहत जाऊ लागला. घाबरून त्याने जिवाच्या आकांताने मदतीला हाका मारल्या पण आजूबाजूला होतच कोण ऐकायला. तो पाण्याबरोबर वाहत जात होता पण त्याचवेळी त्याने ती फांदीही घट्ट धरून ठेवली होती. आणि तेच त्याच्या कामी आलं. पुढे प्रवाह जरा अरुंद झाला होता, दोन्हीबाजूची चिंचेची झाडं जवळ आली होती. त्या झाडांना ती भलीमोठी फांदी अडली आणि महादुला चिंचेच्या झाडाची खाली असलेली फांदी धरायला मोका मिळाला. त्या फांदीला धरून तो वर सरकत प्रवाहाच्या बाहेर पडला आणि त्याच क्षणी ओढ्याच्या प्रवाहात अडकलेली फांदी काडकन मोडली व प्रवाहात वाहू लागली. चिंचेच्या झाडाचा आधार मिळाला नसता तर तोही पुन्हा वाहत गेला असता. महादू धडपडत वर आला अन बांधावर कोसळला. काही वेळात त्याची धाप आणि भीतीही काहीशी कमी झाली. अन त्याचं लक्ष आपल्या पायाकडे गेलं. फांदीने दणका दिलेल्या ठिकाणी नडगीवर चांगलीच सूज आली होती. ठणक लागला होता. त्याला अचानक आपली बायको, घर, जनावरे आठवली अन तो ताडकन उभा राहिला. पायातून येणारी कळ सहन करत तो शेताडीत घुसला. अगोदर लक्षात आलं नव्हतं पण वाहत वाहत आपण आपल्या वस्तीच्याही बरेच पुढे गेल्याचे त्याला कळले. तसाच बांधाबांधाने तिरका चालत तो आपल्या वस्तीकडे निघाला. पाऊस आता पूर्ण थांबला होता. आकाश अगदी मोकळे झाले होते. त्याला आपली वस्ती दिसू लागली तसा अजून हुरूप आला. पोटरीपर्यंत चिखलात रुतणारे पाय नेटाने ओढत महादू वस्तीजवळ पोहोचला. त्याला लांबून येताने पाहून धुरपती बाहेर आली. तिला महादूचा खूपच राग आला होता. अशा वादळवाऱ्यात आपल्याला एकटीला सोडून आपला नवरा तंबाखू आणायला गावात गेला म्हणून तिचा पारा चांगलाच चढला होता. लांबूनच महादुला येताने बघून ती पदर खोचुनच उभी होती. पण तिला कळेना का नेहमीचा आपला रस्ता सोडून महादू लांबच्या बाजूने का येतोय. त्याला आज चांगलंच फैलावर घ्यायचा असं तिच्या मनात येत होतं पण महादू जसा जवळ येऊ लागला तसं त्याचं लंगडनं तिच्या लक्षात आलं. हातातलं खुरपं बाजूला फेकत ती त्याला सामोरी गेली. `अहो धनी, काय झालं हो तुम्हास्नी?' असं म्हणत रडत त्याच्या गळ्यात पडली. महादुने सावरत तिला उभे केलं अन म्हणाला `चिंता करू नको, थोडंसं घसरून पडलो, व्हईल बरं'. असे म्हणत तो लंगडत ओट्यावर आला, धुरपतीने त्याला ओट्यावर बसवला अन पाण्याचं घंगाळ भरून समोर ठेवलं. ती स्वतःच त्याचे पाय धुऊ लागली, तसा महादू म्हणाला `अगं मी धुतो, तू राहू दे.' पण डोळ्यातून आसवं गाळत पाय धुता धुता ती बडबडत होती `काही गरज हुती का गावात जायची.' अन गेल्ता तर पाऊस थांबस्तवर कुठे अडुशाला उभं राह्यचं ना'

........... महादुने हातपाय धुतले. तोपर्यंत धुरपतीने गरम पाणी करून आणले. चुलीवर चहाचे आधण ठेवले. अन त्या गरम पाण्यात फडके बुडवून ती अलवार आपल्या पतीचे पाय शेकू लागली. महादुला जरा बरं वाटलं, मनही भरून आलं अन मग त्याने रस्त्यात काय काय घडलं ते तिला बैजवार सांगितलं. तशा तिच्या डोळ्यांच्या धारा अजूनच वाढल्या. मुसमुसत ती म्हणाली `अहो पण एवढ्या पावसात यायचंच कशाला? मी काय जंगलात अडकली हुती का? अन त्या पुरात तरी कशाला उतरलात? घटकाभरानं असं काय नुस्कान झाला असतं. काहीकरता काही झालं असतं तर मी कोणाच्या तोंडाकडं पाहत बसले असते.' तिचे ते बोलणे ऐकून महादुलाही रडू येऊ लागले. दोघांनाही एकमेकांची काळजी वाटत होती. एकमेकांच्या गळ्यात पडून ते मनसोक्त रडले. काहीवेळाने त्यांच्या मनातलं सगळं निघून गेलं आणि बाहेरच्या आभाळासारखच त्यांचंही मन निर्मल होऊन गेलं. एकमेकांच्या काळजीने त्यांच्यात असलेलं प्रेम अजूनच वाढलं.

......... जरावेळाने महादुने बाहेर येऊन पाहिलं. वळीव कोसळला होता, पण त्याचं काही फार नुकसान झालं नव्हतं. गोठ्यावरचे दोन तीन पत्रे उडून बाजूच्या शेतात जाऊन पडले होते. वाळलेल्या वैरणीची एक गंज जरा उचकटून काही पेंढ्या आजूबाजूला उडून गेल्या होत्या. पण एकंदरीत थोडक्यात निभावलं होतं. मनाशी समाधान मानत त्याने आपल्या ओल्या शर्टाच्या खिशात हात घातला तर ज्या तंबाखूच्या पुडीमुळे हे रामायण घडलं होतं ती भिजून तिचा पार लगदा झाला होता. त्याने खिशातून तो लगदा बाहेर काढला अन तळहातावर घेत बायकोला हाक मारली. आता आणि काय झालं असा विचार करत अन गरम चहाचा कप घेऊन धुरपती बाहेर आली. महादुने हात तिच्यासमोर केला अन म्हणाला `धुर्पा, या तंबाखूच्या तलपी पायी आज मरता मरता वाचलो. आजपासून ही भवानी कायमची बंद' असे म्हणत त्याने तो लगदा दूर भिरकावला. आनंदून जात धुरपा म्हणाली `खरं म्हणताईसा का उगा आपली तंबाखू भिजलीय म्हणून म्हणताय' शंकित मनानं धुर्पानं विचारलं.
तसा कळवळून महादू म्हणाला `नाही नाही, ही तंबाखू कायमची बंद! तुझी शपथ!'....... जवळ येत धुर्पा म्हणाली `सुटली म्हणा' असे म्हणत तिने गरम चहाचा कप महादूच्या हातात दिला. त्या चहाला आज न्यारीच चव लागत होती. . ..............

श्री.अनिल दातीर. सातारा, ९४२०४८७४१०

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel