श्रीपाद टेंबे

उन्हाळ्याचे दिवस, वैशाख महिन्यातली रणरणत्या उन्हातली दुपारची वेळ. लोखंडी रुळावरून आपल्याच एका विशिष्ट लयीत वेगाने पळणारी ती गाडी अगदी खचाखच भरलेली होती. हात किंवा पाय थोडे  मोकळे करू म्हटले तर अगदी महाभारतातील प्रसंगाप्रमाणेच सुईच्या टोकावर मावेल एवढी देखील जागा त्या गाडीत नव्हती. इतकी ती खचाखच माणसांनी भरलेली होती. गाडीच्या हेलकाव्याने प्रवासी एकमेकांच्या अंगावर पडत होते. घामाच्या धारांमध्ये एकमेकांना खेटून स्त्रिया, पुरुष आणि त्यांच्या सोबत असलेली लहान मुले सांभाळत कसाबसा आपला प्रवास करत होते. ज्यांना बसायला जागा मिळाली होती ते स्व:तच्या घरी आराम खुर्चीत ऐटीत बसल्यासारखे थाटात बसले होते. दुपारची वेळ असल्याने बहुतेकांची जेवणाची वेळ झाली होती. बऱ्याच जणांनी आपली जेवणं बसल्या जागी उरकून  घेतली होती. कडक उन्हाचे दिवस त्यात खाणेपिणे आटोपल्यामुळे एकमेकांच्या अंगा खांद्यावर रेलत पेंगायला बऱ्याचजणांची सुरवात झाली होती. कुणाला कुणाची काळजी नव्हती की माणुसकीची साधी दखल नव्हती. जेवढी माणसं त्या डब्यात किंवा गाडीत होती त्याच्यापेक्षा जास्त सामान प्रत्येक डब्यात कोंबलेलं होते. गाडी जेंव्हा एका रुळावरून दुसऱ्या रुळावर जायची तेंव्हा वरून पिशव्या, बॅगा प्रवाश्यांच्या अंगावर पडत होत्या. त्यावेळेस प्रवाशांची थांबलेली बाचाबाची पुन्हा नव्याने उचल खायची. लहान मुलं असह्य उकाड्यामुळे घामाघूम होऊन भोकाड पसरत होती. एका सीटवर मी अंग चोरुन, जमेल तसं खिडकीपाशी बसून त्या डब्यातील सभोवतालचे चित्र, वातावरण डोळ्यात आणि डोक्यात साठवत होतो. उन आणि उकाडा यामुळे घशाला कोरड पडली होती. सोबत घेतलेल्या बाटलीतील पाणीही आता संपल होतं. डब्यात एखादा पाणीवाला केंव्हा येतो किंवा पुढचं स्टेशन केव्हा येतं याची मी काकुळतीने वाट पाहू लागलो. अर्थात वाट पाहण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्यावेळेस उपलब्ध नव्हता.

खड खडखडात खड खडखड आवाज करत गाडीने रूळ बदलत तिचा वेग कमी केला, तसं  स्टेशन आल्याची कल्पना आली. थोड्याच वेळात गाडी एका छोट्या स्टेशनवर थांबली. मी उत्सुकतेने खिडकीतून बाहेर डोकावून पहिले. त्त्या छोट्याश्या स्टेशनचे नाव बोरगाव असं काहीतरी दिसत होते. गाव खेडेवजा आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे फारशी वर्दळ दिसत नव्हती. प्लॅटफॉर्मवर कँटीन तर दूर साधं दुकानदेखील नव्हते. काही प्रवासी डब्यातून खाली उतरले आणि तेवढेच किंबहुना त्याच्या दुप्पट प्रवासी डब्यात जिवाच्या आकांताने चढले. अगोदरच्या स्टेशनवर जेमतेम डब्यात घुसलेले आता नव्याने डब्यात घुसू पाहणाऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते. आपली गरज डब्यात जागा मिळाल्यावर ते विसरून गेले होते. प्रत्येकाला कशीबशी जागा मिळाली. आतले आणि बाहेरचे आता सगळे एकमेकांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू लागले होते, अगदी राजकरण, सिनेमा, क्रीडा सगळे विषय चघळले जात होते. डब्यातली गर्दी जशीच्या तशी होती. त्या गर्दीमधेही अचानक एक दोन फेरीवाले आत आले आणि त्यांची भेळ, चहा विकायची गडबड सुरु झाली. त्यांच्या सोबत एक मुलगा देखील डोक्यावर पिण्याच्या पाण्याचा माठ घेवून डब्याच्या आत मोठ्या चपळतेने शिरला. नेहमीच्या सवयीने त्याने स्वत:ला उभं राहता येईल एवढी जागा तयार केली आणि मोठ्याने आवाज दिला." थंड पाणी घ्या, पाणी घ्या." त्याच्या मोठ्याने ओरडण्यामुळे आणि गर्मीमुळे डब्यातील अनेक लहान मोठ्या प्रवाशांची तहान आणखीनच वाढली. माझा या गोष्टीला अपवाद कसा असेल ? माझ्याही घशाची कोरड वाढली होती. तो कधी आपल्याजवळ येतो याची वाट बघत मी माझ्या जागेवरच चुळबुळ करत बसून राहिलो. एवढ्यात गाडीने शिट्टी वाजवली आणि अंगावरची धूळ झटकून एखाद्या निवांतपणे रवंथ करीत बसलेल्या म्हशीप्रमाणे हळूहळू चालणं सुरु करावे तसं गाडीने  हळूहळू आपला वेग वाढवत बोरगाव स्टेशनवरील मुक्काम हलवला. गाडीच्या वेगाने त्या पाणी विकणाऱ्या मुलाजवळ असलेल्या माठातील पाण्याचे थेंब आजूबाजूंच्या लोकांवर पडल्याने थोडाफार गलकाही झाला. परंतु दादा, बाबा करत त्या मुलाने सर्वांना शांत केलं आणि तो आपल्या पाण्याची विक्री करू लागला.

पाणीवाला तो मुलगा जवळ येत होता. अनेकांनी त्याच्याजवळून पाणी घेवून आपली तहान भागवली. माझ्यासमोर बसलेला मध्यम वयाचा प्रवासी अपटूडेट कपडे घालुन होता. त्याच्या पेहरावावरून तो बऱ्यापैकी पैसेवाला असावा असा मी अंदाज केला. त्याने त्या मुलाला आवाज देत आपल्याजवळ बोलावलं आणि विचारलं, "काय रे, पाणी विकायचा परवाना आहे का तुझ्याकडे?"

तो मुलगा काकुळतीला येत म्हणाला, " नाही हो साहेब, कसला आलाय परवाना अन् फिरवाना ! दोन स्टेशनपर्यंत तर येतो पाणी घेवून आणि पुन्हा तिकडून येणाऱ्या गाडीने परत जातो आपल्या गावाला. सध्या सुट्ट्या आहेत शाळेला. गावात दुसरं कोणतेही काम नाही, हे काम मला सहज जमतं आणि थोडेफार पैसे मिळतात तेवढीच म्हाताऱ्या आईबापाला मदत होते. सुट्टी संपली की शाळेतल्या वह्या पुस्तकांसाठी कामाला येतात".

"पण तुझ्याजवळ असलेले हे पाणी प्यायचेच आहे नां? आणि गाळलेले तरी आहे का पाणी"? "हो साहेब पाणी प्यायचेच आहे आणि गाळलेले देखील आहे".

असं म्हणत त्या मुलाने माठात त्याच्याजवळ असलेला पेला बुडवून तो पाण्याने भरून बाहेर काढला. तो पाण्याने भरलेला पेला  देणार तेवढ्यात त्या प्रवाश्याने विचारले," पण काय रे तू पैसे तर सांगितलेच नाही. कसं दिलंस रे पाणी"?

"पन्नास पैश्याचा एक ग्लास साहेब, आणि रुपयाला दोन ग्लास". त्या मुलाने उत्तर दिले.

तसा तो प्रवाशी थोडया दरडावणीच्या सुरात म्हणाला," पाण्याचेच तर पैसे करतो आहे, आणि इतके महाग विकतो ? ते काही नाही एक रुपयाला तीन ग्लास दे"! तो मुलगा उगाचंच हसला. त्याने काही न बोलता तो पाण्याने भरलेला ग्लास माठात रिकामा केला. माठ आपल्या डोक्यावर ठेवून तो पुढे चालू लागला. मी त्या दोघांचे संभाषण ऐकतच होतो. मला त्या मुलाच्या संयमाचं खूप कौतुक आणि त्याच्या मंद स्मित हास्याचं कोडंच वाटलं. इतक्यात तो मुलगा माझ्या जवळ येवून पोहचला होता.

" काय साहेब घेताय का पाणी? असं म्हणत त्याने माझ्यासमोर पाण्याने भरलेला ग्लास पुढे केला. मी अक्षरशः अधाश्यासारखा त्याच्या हातातून ग्लास घेतला आणि ढसाढसा दोन ग्लास पाणी प्यायलो. माठातील थंडगार आणि गोड पाणी एकदम योग्य वेळेस मिळाल्याने मला ते अमृतासमान वाटलं. त्यामुळे आता कुठे माझी तहान भागली होती. जीवात जिव आला होता. मी खिशात हात घालत त्या  मुलाला माहित होते तरी विचारलं,' किती पैसे झाले रे'?

तो म्हणला, "साहेब एक रुपया झाला".

मी त्याच्या हातावर पाच रुपयाचे नाणे ठेवले. सुटे नाही असं कोणतेही कारण किंवा कोणतीही कुरबूर न  करता चार रुपये त्याने माझ्या हातावर ठेवले. मी त्याला म्हटलं,"काय रे त्या समोरच्या प्रवाश्याजवळून निघतांना तुला मी हसतांना बघितलं. तू तेव्हा का हसलास होता ते तू सांगतील का"?

तो मुलगा पुन्हा हसला,"खरं सांगू का? त्या साहेबांना खरं तर तहानच लागलेली नव्हती ! त्यांना विनाकारण चौकशी करून टाइमपास करायचा होता".

"म्हणजे"? मी म्हणालो.

"अहो साहेब, ज्यांना खरंच तहान लागलेली असते ते लोक पाण्याचा असा कधीच भाव करत नाहीत. आधी आपली तहान भागवतात, नंतर मी मागेन तेवढे पैसे देतात. मी मात्र आपले ठरलेलेच पैसे घेत असतो. कमी नाही आणि जास्तही नाही. असते काही काही लोकांना अशी सवय, विनाकारणच घासाघीस करायची. आणि नको त्या ठिकाणी आपली खोटी शान दाखवायची. चालतंय साहेब. अशी कितीतरी प्रवासी रोज भेटतात आम्हाला या गाडीत". असं म्हणून काहीच घडलं नाही या अविर्भावात डोक्यावरील पाण्याचा माठ सावरत तो त्याची पुढची वाट चालू लागला.

थंड पाणी घ्या थंड पाणी हा आवाज ऐकता ऐकता मी विचारांच्या गर्दीत केंव्हा हरवून  गेलो ते कळलचं नाही. खरीखुरी, प्रामाणिक तहान लागलेला माणूस पाण्याची किंमत किंवा भाव कधीच ठरवत नाही. कारण पाण्याचे काय मोल असते हे तहान लागलेल्यांनाच चांगल कळतं. काहीही करून आपली तहान भागवणे हा मुख्य उद्धेश असतो. अशावेळी वादविवाद करण्याची मनस्थिती नसते. वितंडवाद करत नाही. विसंवाद होणार नाही याची काळजी घेतो. भानगड किंवा मारामारी तर खूपच दूरचा विषय आहे. मात्र यासाठी तहान प्रामाणिकपणे लागलेली असायला पाहिजे. किती मोठं तत्वज्ञान सांगितलं त्या मुलांने. मी तर आश्चर्यचकितच झालो त्या मुलाच्या या तर्काने. साधनेचा मंत्रच सांगितला की त्याने, साध्या, सोप्या आणि सुटसुटीत शब्दात. माझं मन एकाग्र झालं. डब्यातल्या गोंगाटापासून दूर गेलं, आणि मी आत्ममग्न होऊन चिंतन करू लागलो.

देव, धर्म, पंथ, जात, ज्ञान, नोकरी, व्यवसाय, पद, आणि प्रतिष्ठा अशा कितीतरी गोष्टींसाठी आपण निरर्थक वाद-विवाद, चर्चा, भांडणं, मारामाऱ्या, दंगली घडवून आणतो. परंतु या सगळ्यांना जाणून घ्यायची आपल्याला खरंच प्रामाणिक तहान असते का? या प्रश्नाभोवती माझं मन फिरू लागलं. ज्यांना खरंच या गोष्टीची तहान असेल, जाणून इच्छा असेल,पालन करायची मनीषा असेल ते त्याचं मर्म जाणतील. अर्थ समजून घेतील आणि तसं वागतील. उगाचच वाद घालणार नाहीत आणि समाजचे स्वास्थ बिघडवणार नाहीत.

कोणत्याही गोष्टीचा ध्यास लागला, प्रामाणिक तहान लागली तर ती भागवण्यासाठी माणूस भाव ठरवत नाही. वायफळ चर्चा करत नाही. कारण त्या वेळी त्या गोष्टीचं मूल्य काय असतं हे त्यालाच कळतं. दंगलीमध्ये ज्याचं घर उध्वस्त होतं त्याला घराची किंमत कळू शकते. मात्र, उध्वस्त झालेल्या स्वप्नाचं मोल लावता येत नाही. व्यसनाधीन झालेल्या मुलाच्या औषधोपचाराची किंमत देता येते, परंतु त्याने आयुष्यात काय गमावलं याचं मुल्य कसं ठरवणार? ज्याचा देवाधर्मावर विश्वास नाही तो अकलेचे तारे तोडण्यातच धन्यता मानणार.कोणताही देव-धर्म कधीही द्वेष, हिंसा, अन्याय,अत्याचार शिकवत नाही, पण हे त्यांना कोण सांगणार?कारण देव धर्म या बद्धलची त्यांची ओढ, तहान, आस्था ही खोटी असू शकते. ढोंगी असते. म्हणूनच अशी माणसं समाजात वादविवाद, वितंडवाद करतात आणि करवितात.निरर्थक चर्चा घडवतात आणि समाजाला वेठीस धरतात. तहानेच्या या  चिंतनाने मला सामाजिक सलोख्याचा एक नवा मार्ग सापडला. फक्त प्रत्येकाला प्रामाणिक तहान हवी. तहान हवी ज्ञानाची. कर्माची, धर्माची, राष्ट्र विकासाची सहवेदनेची. आणि या सर्वांसह सत्यापर्यंत जाण्याची, जीवन जगण्याची.

खड् खडाडखट खड् खडाडखट आवाज करत गाडीने रूळ बदलले व जोरात शिट्टी वाजवली. तसा मी भानावर आलो. माझं स्टेशन आलं होतं. मी उतरण्याच्या गडबडीत देखील त्या पाणी विकणाऱ्या मुलाला शोधू लागलो. ज्याने मला जीवन जगण्याची एक नवी दृष्टी दिली होती. तो तर माझ्या अगोदरच दाराजवळ येवून उभा होता. एका हाताने पाण्याचा माठ सांभाळत माझ्याकडे तो बघत हसला. त्याचे ते हास्य जणू मला सांगत होते, "आनेवाला पल जाने वाला है, हो सके तो इसमे जिंदगी बिता दो, पल ये जो जाने वाला है". मी हातात माझी बॅग सावरत स्टेशनवर उतरलो, आणि तो काही क्षणातच गाडीच्या दुसऱ्या डब्यात शिरला.  माझ्यासारख्या खरोखरच्या तहानलेल्या क्षणांच्या शोधात.......!!!!!

*****

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel