दॅट्स ऑल युवर ऑनर
प्रकरण दोन
तपन लुल्ला ने अंदाज केल्या प्रमाणे दुसरा दिवस स्वच्छ सूर्य प्रकाशाचा होता .पाऊस पूर्ण पणे थांबला होता.आकृती सेनगुप्ता ने तिची गाडी दुरुस्त करायला माणूस
 आणला होता.त्याने गाडीचा डिस्ट्रिब्यूटर बदलला आणि गाडी व्यवस्थित चालू केली होती.त्या दिवशी आपले काम ती कृत्रिम पणे करत राहिली.तपन हा एक वाया गेलेला
 मुलगा होता आणि त्याला धडा शिकवायचाच असा तिने निश्चय केला होता.भले तिला तिची नोकरी गमवावी लागली तरी बेहत्तर.तिने त्याच्या विरूध्द दावा ठोकला असता
 तरी त्याचा फारसा उपयोग झाला नसता असे तिला वाटून गेले.कारण त्यांनी तिची माहिती गुप्त हेरांकडून मिळवली असती, ती कुठल्या पुरुष बरोबर  कधी , कुठे गेली
, सगळ सगळ त्यांनी शोधून काढल असत,  तिच चारित्र्य बदनाम केले असते. पण असाच विचार करून त्याला बळी पडलेल्या इतर मुली घाबरून काहीच करत नसतील
 म्हणूनच अशा लांडग्याचे फावत असेल. ते काही नाही त्याला सजा मिळालीच पाहिजे. आणि एका विविक्षित क्षणी तिने अंतिम निर्णय घेतला. पाणिनी पटवर्धन ला भेटायचे !
तिने त्याच्या ऑफिस चा नंबर लावला.ती पाणिनी पटवर्धन ची सेक्रेटरी, सौम्या सोहोनी शी जोडली गेली. तिने आपली ओळख करून दिली आणि पाणिनी पटवर्धन ना
 सायंकाळी भेटायचे आहे म्हणून सांगितले.सौम्या ने पाणिनी पटवर्धन शी बोलून दुपारी अडीच ला येणे शक्य आहे का असे विचारले. ‘‘ मी जमवते.‘‘ आकृती तिला म्हणाली.
पाणिनी पटवर्धन ने भेटायला मान्यता दिली या जाणिवेनेच तिच्या मनावरचे निम्मे ओझे उतरले. दुपारी दीड वाजता तिच्या ऑफिस मध्ये बरीच खळबळ चालू झाल्याचे
 तिच्या लक्षात आले.नमन लुल्ला म्हणजे मालक, तपन चा बाप काहीतरी अघटीत घडल्या सारखा चेहरा करून इकडून तिकडे फिरत होता.दुसरा उपाध्यक्ष  लुल्ला च्या मागे मागे करत होता.तपन मात्र ऑफिस ला आलेला दिसत नव्हता.
आकृती तिच्या साहेबांकडे गेली. ‘‘ मला आज दुपारी एक तास बाहेर जाऊन यायचं.खूप महत्वाच काम आहे. काल मी जादा वेळ थांबून सर्व काम पूर्ण करूनच गेले
 घरी.त्याचा कोणताही जादा पगार मी मागितलेला नाही. सवलत देता येत नसेल तर अर्धा दिवस रजा द्या.‘‘ एका दमात तिने सांगून टाकले.
‘‘ ही खूपच  विचित्र विनंती आहे आकृती. ‘‘
‘‘ परिस्थिती पण विचित्रच आहे माझ्या समोर. ‘‘ तिने उत्तर दिले.
‘‘ तुमच्या कामाबद्दल काहीच प्रश्न नाहीये आकृती, पण अस आहे की एकदा प्रथा पडली ना की आपल्या पोरी ब्युटी पार्लर मध्ये जायला सुद्धा सवलत मागतील..... पण
 ठीक आहे या तुम्ही तासाभरात जावून.‘‘
‘‘ दीड तास ‘‘ ती ठाम पणे म्हणाली.
समोरच्या साहेबाने चमकून तिच्याकडे पहिले. थोडेसे नाखुशीनेच तो म्हणाला.‘‘ बर ठीक आहे आकृती ये जाऊन , जेवढे शक्य तेवढे लौकर ये.रजा नाही मांडत तुझी.‘‘
आकृती ने स्वतःची गाडी न्यायाचा अजिबात विचार केला नाही. पार्किग ला जागा शोधण्यात वेळ कोण घालवणार? सरळ टॅक्सी केली आणि  निघाली. तिला दीड तासात
 सर्व काही संपवून परत ऑफिस ला यायचं होत कारण तसं तिने वचन दिल होतं. पण त्याला आता काही अर्थ राहिला नव्हता कारण तिला माहित होत की उद्या सकाळ
 पर्यंत ती कंपनीच्या नोकरीत राहणार नव्हती.
 
( प्रकरण दोन समाप्त )
 
 दॅट्स ऑल युवर ऑनर
प्रकरण तीन.
 
‘‘ आकृती , तुला नेमकं काय करायचंय ?  ‘‘
पाणिनी पटवर्धन ने तिची सर्व हकीगत ऐकल्यावर विचारले. सौम्या च्या मनात तिच्या विषयी सहानुभूती आणि लुल्ला बद्दल पराकोटीची चीड निर्माण झाली होती.
‘‘ मला दाखवून द्यायचं आहे की नोकरी करणाऱ्या बायका म्हणजे गरीब गायी नसतात.आम्ही नोकरी करतो म्हणजे मालकाच्या हातातले खेळणे नसतो. ‘‘
‘‘ थोडक्यात त्याला अद्दल घडवायची आहे, धडा शिकवायचा आहे.त्याला.‘‘ पाणिनी पटवर्धन उद्गारला.
‘‘ बरोबर.तसेच समजा.‘‘ ती म्हणाली
‘‘ त्याला दोन मार्ग आहेत.एक म्हणजे त्याच्यावर नुकसानीचा दावा लावणे.किंवा सरळ पोलिसात जाऊन त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे. पण एकाच वेळी दोन्ही नाही करता येणार. ‘‘
‘‘ का नाही करता येणार?‘‘तिने विचारले.
‘‘ वास्तवाचा विचार कर.ज्या क्षणी तू नुकसान भरपाईची दावा लावशील त्याच क्षणी फौजदारी तक्रारीची किंमत शून्य होईल. हुशार वकील असा मुद्दा मांडेल की तुला या
 गोष्टीचा अनुभव आहे आणि त्याचा तू फायदा घेण्याचा प्रयत्न करते आहेस. ‘‘
‘‘ अच्छा, आणि मी पोलिसात तक्रार नाही केली आणि फक्त नुकसान भरपाई मागितली तर ?  ‘‘
‘‘ तर न्यायाधीश काय विचार करतील यावर अवलंबून राहील.तुला कशाची भरपाई हवी आहे यावर ते अवलंबून असेल. तुला पैसे हवे असतील, .... ‘‘
‘‘ नाही !  मला माझ्या भावना दुखावल्याची किंमत पैशात नको आहे. मला माझ्या स्वाभिमानावर उभे राहायचे आहे. ‘‘
‘‘ तुला काय म्हणायचं आहे समजल मला. अशा प्रकारचे वर्तन तुझ्याच बाबतीत नाही तर कोणाच्याच बाबतीत घडू नये अशी तुझी इच्छा आहे. बरोबर? ‘‘
‘‘ अगदी माझ्या मनातल ओळखलत तुम्ही.‘‘ ती म्हणाली.
‘‘ पण हे सोपे नाही.ते तुझ्यावर चिखलफेक करतील.तुला ब्लॅक मेल करतील.तूच त्याला अति प्रसंग करायला कसे प्रवृत्त केलेस हे ते सिद्ध करतील.तू ठरव तुला जायचयं पुढे?  ‘‘
‘‘ मिस्टर पटवर्धन तुम्ही मला यात मदत करणार असाल आणि शेवट पर्यंत माझ्या बाजूने लढणार असाल तर मी तयार आहे या लढाईला..‘‘ ती मनस्वी पणे म्हणाली.
‘‘ गुड गर्ल  ‘‘ पाणिनी खुश होवून म्हणाला.
‘‘ सौम्या, कनक ओजस ला फोन लाऊन तातडीने इकडे बोलावून घे. काय चाललाय ते तपन ला कळे पर्यंत  आपण हातात पुरावे गोळा करायला सुरवात करू.‘‘
तो आकृती कडे वळून म्हणाला,  ‘‘तू म्हणालीस की तू त्याची गाडी त्याच्या अपार्टमेंट समोरच्या अग्नी रोधकासमोर लावलीस ? त्या जागी गाड्या लावायला परवानगी नसते.‘‘
‘‘ मुद्दामच लावली मी तशी त्या जागी. म्हणजे त्याला त्यासाठी दंड व्ह्यावा म्हणून !  ‘‘
‘‘ हे एक चांगल झालय आपल्या दृष्टीने. आता त्याला पोलीस दंड तर आकारतीलच  शिवाय आपली गाडी इथे कशी या बद्दल त्याला बराच खुलासा देत बसावे लागेल
 पोलिसांना. तो पोलिसांना काहीतरी रचून गोष्ट सांगेल की एका युवतीने आक्रमक पणे माझ्या इच्छे विरुद्ध मला गाडीतून बाहेर काढल मग भांडणे झाली आणि तिने ती
 गाडी तिथे लावली वगैरे. काहीही सांगेल तो. पण कोर्टात तो उलट तपासणीच्या वेळी वेगळेच बोलेल असे मी पाहीन.
कोर्टात प्रकरण जाईल तेव्हा तूच आगळीक केलीस असे सिद्ध करायचा तो प्रयत्न करेल.म्हणजे तुला कंपनीत वरचे पद हवे म्हणून तू काहीही करायला तयार होतीस
 असे.  तुला म्हणाला ना, तो  की ऑफिस मधल्या एकीने असेच प्रकार केले, तो म्हणेल ते केले आणि मग त्याने तिला वरचे पद दिले ?  काय नाव आहे तिचे?
‘‘पाणिनी ने विचारले.
‘‘अभिज्ञा बोरा. तिला मी ओळखत नाही पण खूप वेळा बघितलय  ‘‘
‘‘ तिच वर्णन सांगता येईल ?  ‘‘
‘‘ दिसायला एकदम  चांगली आहे.सव्वीस-सत्तावीस वय असेल. तिचे डोळे सोडले तर एखाद्या सौंदर्य स्पर्धेतही वरचा क्रमांक पटकावला असता. डोळ्यात एक विशिष्ट
 प्रकारचा नैराश्याचा भाव आहे तिच्या किंवा एक पराभूत झाल्याची छटा. आणि.... ‘‘
 कनक ओजस चा दारावर  विशिष्ठ प्रकारची टकटक केल्याचा आवाज आला.
‘‘ सौम्या, त्याला आत बोलव.‘‘ पाणिनी म्हणाला. ‘‘ आकृती, हा आता आत येईल तो कनक ओजस , गुप्त हेर आहे.याच मजल्यावर त्याचे ऑफिस आहे.या शहरातला तो सर्वोत्तम गुप्तहेर आहे.माझे जवळ जवळ सर्व काम तोच करतो.त्याला पाहिल्यावर प्रथम दर्शनी तो फारच साधा आणि किरकोळ वाटतो.पण तेच त्याचे बल स्थान आहे.‘‘
ओजस आत आला. पाणिनीने त्याची आणि आकृती ची ओळख करून दिली.
‘‘ लुल्ला कास्टिंग , इंजिनियरिंग कंपनीच्या लुल्ला कुटुंबाशी तुझा काही संबंध आलाय किंवा त्यांची माहिती आहे कनक ? ‘‘पाणिनीने विचारले
‘‘ त्याचं काय ? ‘‘ओजस ने कपाळावर आठ्या पाडत विचारले.
 ‘‘त्या कंपनीचे एक आउट हाउस आहे टेकडीवर ,एकदम अद्ययावत आहे. किचन, मद्यपानाची सोय, महागडे फर्निचर, जलतरण तलाव असे सर्व आहे.‘‘. पाणिनीने सांगितले.
‘‘ मला माहिती आहे कुठे आहे ते.‘‘ ओजस म्हणाला.
‘‘ तपन लुल्ला ची गाडी काल त्याच्या अपार्टमेंट समोरच्या अग्नी रोधक समोर लावली होती.मला हवं की ती कधी हलवली गेली, कोणी हलवली आणि ती तिथे लावली
 गेल्याबद्दल तपन ला काय म्हणायचं आहे. म्हणजे तो ती जबाबदारी स्वीकारतोय की नाकारतोय, मला त्याचे मित्र कोण आहेत,कोणाशी तो मोकळे पणाने बोलू शकतो ते
 पण हवय, काल रात्री तो कुठे होता या बद्दल तो कोणाशी काही बोललाय का? आणि हे सर्व त्याला काही सुगावा लागू न देता व्हायला हवय. ‘‘  पाणिनीने फटाफट
 सूचना देवून टाकल्या.
‘‘ मिस सेनगुप्ता तुझी अशील आहे पाणिनी ?  ‘‘
‘‘ हो. ‘‘
‘‘ खर तर मी तुला बाजूला घेऊन सांगितलं पाहिजे हे , पण आता वेळ नाहीये तुझ्याकडे तेवढा म्हणून सांगतो तिच्या समोरच, काल रात्री तपन लुल्ला चा खून
झालाय !!!  ‘‘ ओजस ने बॉम्ब  टाकला.
पाणिनीचे डोळे विस्फारले. आकृती च्या तोंडून गर्भगळीत होवून उसासा बाहेर पडला.
‘‘ पुढे बोल सविस्तर . ‘‘ क्षण भरात सावरत पाणिनी म्हणाला. आता त्याचा चेहेरा पूर्ण पणे निर्विकार होता.
‘‘ मला दुसऱ्या एका प्रकरणात पोलिसांनी काय केलं ते समजण्यात रस होता म्हणून मी रेडिओ वर बातम्या लावल्या होत्या.त्यातच ही बातमी ऐकली. त्यात एवढंच
 सांगितलं की तपन लुल्ला चा खून काल रात्री झाला.त्याचे प्रेत  कंपनीच्या आउट हाउस मध्ये सापडले.त्याला स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या सुरीने पाठीमागून भोसकले गेले. ‘‘
‘‘ संशयिता बद्दल  काही सांगितलं?‘‘ पाणिनीने विचारले.
‘‘ पोलीस एका युवतीच्या शोधात आहेत ,जी काल रात्री त्याच्या बरोबर होती. ‘‘ ओजस म्हणाला.
‘‘ ठीक आहे, तुझे काम चालू कर. ‘‘ पाणिनीने ओजस ला सांगितले.
‘‘ मी कदाचित .....‘‘ ओजस काहीतरी सांगायला लागला पण पाणिनीने त्याला थांबवले. ‘‘ वेळ कमी आहे कनक, लगेच कामाला लाग.‘‘
आपल्याला पाणिनी कटवतोय हे ओजस ने ओळखले. दोघेही जिवलग मित्र होते,त्यामुळे काहीही बोलू शकत होते ते एकमेकांना. राग,लोभ या पलीकडची मैत्री होती त्यांची.
 ओजस झटक्यात उठला.आकृती कडे बघून हसला.
‘‘ या पेक्षा चांगला वकील तुला मिळाला नसता. तू सर्वोत्कृष्ट माणसाची मदत घेतली आहेस ! ‘‘ ओजस म्हणाला आणि बाहेर पडला.
‘‘ आकृती, तू मारलास त्याला ? ‘‘ओजस बाहेर जाताच पाणिनीने विचारले.
तिने मानेनेच नकार दिला.
‘‘ तू तिथून बाहेर पडलीस तेव्हा किती वाजले होते? ‘‘पाणिनीने विचारले.
‘‘ साधारण संध्याकाळचे सात वाजले असावेत.  ‘‘
‘‘ आणि तुझे कपडे चिखलाने माखले ? ‘‘पाणिनीने विचारले.
तिने मानेने हो सांगितले.
‘‘ तुझे कपडे फाटले सुद्धा ?  ‘‘
‘‘ माझा ब्लाउज फाटला. ‘‘
‘‘ तू त्याची गाडी चालवत आणलीस ना ? आणि त्याच्या अपार्टमेंट समोर अग्नी रोधकापुढे लावलीस बरोबर?  ‘‘
तिने मानेने होकार दिला.
‘‘ गाडीतला आरसा असतो ना आकृती, तो हाताचे ठसे मिळण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो.गाडी चालवताना माणूस अनेकदा त्याच्याही नकळत आरसा आपल्या बोटाने हलवत असतो. तू पण गाडीत , तुझ्या उंचीनुसार, तो हलवला असशील ना?, हातमोजे नसतील ना तेव्हा घातलेले ? पाणिनी म्हणाला.
‘‘ हातमोजे नव्हते तेव्हा.आणि अधून मधून मी आरसा सारखा करत होते. ‘‘ तिने कबुल केले.
‘‘ आता मी सांगतो ते नीट ऐक. पळून जाणे हा गुन्हा केल्याचा पुरावा समजला जातो.गुन्ह्याची माहिती पोलिसांना न देणे हा पण गुन्हा समजला जातो. पण त्याच बरोबर
 आपला वकील काय सांगेल ते अशिलाने ऐकायचे असते.जर चुकीचा सल्ला दिला वकिलाने तर ती त्याची जबाबदारी ! त्याची सनद जावू शकते.
तुला पळून जायचा सल्ला मी देऊ शकत नाही.त्याच बरोबर आत्ता तरी तू तुझी सर्व हकीगत पोलिसांना सांगणे योग्य होणार नाही.ती सांगण्यापूर्वी त्याला पूरक असा पुरावा
 आपल्याला गोळा करावा लागेल. तू म्हणालीस की तुझे फाटके कपडे तू तुझ्या घरात ठेवलेस?  ‘‘
‘‘ हो घरात , कपाटात ठेवले.‘‘
‘‘ ते अजूनही तुझ्या घरीच आहेत? ‘‘
‘‘ अर्थात ‘‘
‘‘ बाहेरच्या कपड्यांचे काय? ‘‘
‘‘ मी काटेरी कुंपणा खालून सरपटत गेले तेव्हा माझ्या कपड्याला चिखल लागला. ‘‘
‘‘ नीट लक्ष दे माझ्या प्रश्नाकडे, रक्ताचे डाग लागले का कपड्याला?‘‘
‘‘ मांडीला लांब ओरखडा आहे , आणि त्याला रक्त आलं होत. दुसऱ्यांदा मी जेव्हा तारेच्या कुंपणा खालून गेले आणि त्याच्या गाडीत घुसायचा प्रयत्न केला तेव्हा घाई
 झाली मला खूप, त्यामुळे असे झाले.‘‘ तिने खुलासा केला.
‘‘ बाहेरचा ड्रेस फाटला? ‘‘
‘‘ मला नाही वाटत तसं.मी आधी कुंपणाखालून माझी पावले पलीकडील बाजू ला सरकवली.नंतर गुढगे, कंबर असे करत करत शेवटी डोके बाहेर काढले.त्यामुळे माझा ड्रेस
 वर वर सरकत गेला.त्यामुळे चिखल लागला पण फाटला नसणार.‘‘
 घरी आल्यावर तू तुझे कपडे धुतलेस?  ‘‘
‘‘ नाही.मी ते सर्व वेगळ्या पिशवीत ठेऊन दिलेत.तसेच्या तसे. ‘‘
‘‘ पोलीस काही मखलाशी करण्यापूर्वी मला काही गोष्टी करायला लागतील. मला तुझ्या अपार्टमेंट ची किल्ली दे, आणि आत जाण्याची परवानगी पण दे. जे काही योग्य
 असेल ते मी करणार आहे.‘‘ पाणिनी म्हणाला.
तिने आज्ञा धारक पणे पर्स मधून  किल्ली काढून पाणिनीकडे दिली. ‘‘ तुम्ही माझे कापडे तिथून हलवणार आहात का ? ‘‘
‘‘ छे छे ! तसे करणे म्हणजे पुराव्यात ढवळाढवळ केल्या सारखे होईल. ती पोलिसांना करु देत ! ‘‘ ‘‘ नाही मला नाही कळल तुम्हाला काय म्हणायचयं ते. ‘‘
 ती म्हणाली.
‘‘ तुला न कळलेलेच बरे. मला आता वेळ कमी आहे.पोलिसांनी तुला प्रश्न विचारण्यापूर्वी मला तुझे काहीतरी केले पाहिजे. ‘‘
‘‘ पण मला वाटलं की मी पोलिसां पासून दूर पळून जायचे नाही असे तुम्ही म्हणालात. ‘‘ आकृती ने गोंधळून विचारले.
‘‘ अगदी बरोबरच म्हणालो मी.‘‘ पाणिनी म्हणाला;  ‘‘तू पळून जायचे नाहीच कुठे. अशा परिस्थितीत सर्व सामान्य मुलगी काय करेल ते तू करायचे आहे.‘‘
तिचा गोंधळ अजूनच वाढला. ‘‘ सर्व सामान्य मुलगी पोलिसांना सांगेल ना ?  ‘‘
‘‘ तू माझा सल्ला ऐकणार आहेस. पोलिसांना काय सांगायचे कधी सांगायचे ते मी ठरवणार. सध्या तू संपर्काच्या बाहेर जा. पळून जाऊ नको. दोघात फरक आहे. कळतंय तुला? ‘‘पाणिनीने विचारले.
‘‘ खर तर नाही कळत  ‘‘
‘‘ मी सांगतो काय कर ते. अगदीच आमने सामने करायची वेळ आली आणि तू काय काय केलस , कुठे कुठे गेली होतीस हे  सांगायची  सक्ती पोलिसांनी केली तर त्यांना सांग की तू माझ्या सल्ल्या प्रमाणे जाणार आहेस.पण तो अगदी शेवटचा पर्याय.मी तुला सांगे पर्यंत तू त्या पातळीवर जाऊन बोलायचे नाहीस.
आता पहिली गोष्ट कर म्हणजे इथून ऑफिस ला गेलीस की साहेबांकडून  बोलणी खाऊन घे. ‘‘
‘‘ ते फार अवघड नाही , एकदा त्यांना कळले की मी तपन .....‘‘
‘‘ नाही, तसे नाही.तपन मेला आहे त्यामुळे तू त्याच्या बरोबर होतीस हे तू त्याला  सांगू शकणार नाहीस .तू जो पर्यंत एखादा पुरावा मागे ठेवत नाहीस,त्या आउट हाउस मध्ये गेल्याचा,तो पर्यंत त्यांना कळणार नाही आणि त्यामुळे तुला ते त्या कारणास्तव ओरडू शकत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या काहीतरी कारणाने ते तुला ओरडतील असे बघ. कामात चूक करणे किंवा वाद घालणे असे करून बघ.
‘‘ ठीक आहे करते काहीतरी तसेच. नंतर काय? ‘‘आकृती ने विचारले.
‘‘ तुझी या शहरात कोणी जवळची मैत्रीण आहे?’’ पाणिनीने विचारले.
‘‘ आहे एक खास मैत्रीण पण या शहरात नाही , बाजूच्या शहरात, देवनार मध्ये. मैथिली आहुजा असे नाव आहे तिचे.‘‘
‘‘ कशी आहे दिसायला?
‘‘ सत्तावीस वर्षाची आहे. तपकिरी छटा असलेले  केस आहेत.दिसायला ही छान आहे.एका सौदर्य स्पर्धेत तिने बक्षीस मिळवले होते पूर्वी.मी तिच्या इतकी सुंदर नाहीये पण आमच्यात खूप साम्य आहे. बरेच जणांना आम्ही बहिणी वाटतो. ‘‘
ती काय करते सध्या ?  ‘‘
‘‘ सेक्रेटरी म्हणून नोकरीला आहे.चांगली नोकरी आहे ही.आम्ही एकमेकींना खूप आधी पासून ओळखतो.म्हणजे मी लुल्ला कंपनीत  लागण्या आधीपासूनच,खर म्हणजे मी या कंपनीत लागले ते तिच्या मुळेच. तिने माझ्या समोर कुणाला तरी फोन केला आणि मला म्हणाली की मुलाखत देऊन ये तुझे काम झालंय आणि खरच बाहेर एवढे उमेदवार बसले होते पण मला थांबायला पण लागल नाही ,थेट आत गेले आणि मुलाखत झाल्यावर नियुक्तीचे पत्रच घेऊन आले.‘‘
‘‘ ठीक आहे तर मग आता जा ऑफिस ला आणि साहेब तुला ओरडतील असे बघ. नंतर ऑफिस मधून निघून जा आणि मैथिली आहुजा ला फोन करून सांग की तुला साहेब वाटेल तसे बोलले. हाकलून द्यायची भाषा केली.तपन ने माझ्याशी खोडसाळ पण करायचा प्रयत्न केला पण मी त्याला दाद दिली नाही त्यामुळे त्याने माझ्या बद्दल साहेबांचे कान भरले आणि त्यामुळेच साहेबांनी माझ्यावर आरडा ओरडा केला.आता मला कामच करायचे नाही या ऑफिसात आणि तातडीने मी तुला भेटायला येते आहे. ‘‘
‘‘ तिला तपन बद्दल आधीपासून माहिती होते. काल रात्री मी तिला फोन केला आणि विचारलं की तूच मला या कंपनीत लावलंस नोकरीला मग कंपनीत असे लांडगे आहेत याची मला आधी कल्पना का नाही दिलीस? ‘‘
‘‘ यावर काय म्हणाली ती तुला?  ‘‘
‘‘ ती म्हणाली इतर कुठल्या ऑफिस मध्ये असे प्रकार चालत नाहीत असे तुला वाटतं की काय? लांडगे सगळी कडेच असतात. आपणच ठरवायचं त्यांना कसे हाताळायला पाहिजे ते. मग मी जेव्हा तिला कालचा प्रसंग सांगितला आणि तपन ची गाडी अग्नी रोधका समोर लावल्याचे तिला सांगितले.तेव्हा ती हसायलाच लागली.‘‘ आकृती म्हणाली.
‘‘ तू आता लगेचच तुझ्या त्या मैत्रिणीकडे जाणे इष्ट. तिचा फोन नंबर सौम्या कडे देऊन ठेव. जेव्हा तिला खून झाल्याचे कळेल तेव्हा तिला सांग की याची वाच्यता कुठेही करु नको. ‘‘
‘‘ मी तिला खुना बद्दल काहीच सांगू नको?  ‘‘
‘‘ तिलाच काय कोणालाच सांगायचे नाही. ‘‘
‘‘ तिने मला विचारले तर ?  ‘‘
‘‘ ती नाही विचारणार. एखाद्या पुरुषाशी झटपट झाल्याचे तू मैत्रिणीला सांगितलेस तर ती असे विचारेल का, की   अग तो अजून जिवंत आहे ना?  ‘‘
‘‘ या मैथिली आहुजा वर तू भरोसा ठेऊ शकतेस ना? ‘‘
‘‘ हो तर शंभर टक्के. ती खूपच चांगली आहे  ‘‘
 ‘‘नीघ तू आता जायला तिच्याकडे. ‘‘
‘‘ मला माझ्या घराची किल्ली लागेल, मी घरी जाऊन ताजी तवानी होऊन कपडे बदलून तिच्याकडे जाणारे.‘‘
‘‘ तू असले काहीही करणार नाहीस. तू इथून थेट तिच्याकडे जाणार आहेस.सौम्या कडे तिचा पत्ता आणि फोन दे आणि लगेच नीघ.वेळ कमी आहे. ‘‘
 
( प्रकरण तीन समाप्त)
 
 

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel