त्या दिवशी रणजित यांच्या चाणाक्ष पोलिसी बुद्धीतून आणि नजरेतून रेल्वे प्लॅटफॉर्मवरचा काहीही ठोस संदर्भ नसतांना अचानक गुन्हेगाराला ओळखण्याचे सुनिलचे अजब कसब सुटले नाही आणि त्यातून विविध प्रश्न निर्माण झाले. 

 

प्रश्नांचा भडीमार सुनिलवर त्याच दिवशी पोलीस स्टेशनमध्ये झाला होता. तसे आधीही रणजित यांच्या कानावर सुनिलच्या रंगीत डोळ्यांबद्दल आलेच होते. रंगिनीच्या सांगण्यानुसार योग्य वेळी योग्य व्यक्तीला सुनिलने त्याच्या अंगी असलेल्या शक्तीबद्दल सांगण्यास हरकत नव्हती आणि मग जास्त आढेवेढे न घेता रणजित यांना सुनिलने त्याच्या अंगी असलेल्या शक्तीबद्दल सांगितले. सर्वप्रथम त्यांचा विश्वास बसला नाही पण लगेच पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी सुनिलची परीक्षा घेतली. कारण त्यांची परीक्षा सुनिलने पास केल्यास सुनिलची क्रिमिनल डिटेक्टर म्हणून चांगलीच मदत होणार होती आणि त्याने निर्ढावलेल्या आणि गुन्हा कबुल न करणाऱ्या गुन्हेगारांकडून गुन्हा कबूल करून घेणं सोपं होऊ शकणार होतं.

 

एका व्यक्तीने एका महिलेवर बलात्कार करून त्यानंतर तिचा जाळून निर्घृण खून केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या चार संशयित गुन्हेगारांना सुनिलसमोर उभे केले गेले. अजून चौघांवर थर्ड डिग्रीचा वापर झालेला नव्हता. तिथे हजर असलेल्या पोलीस डिपार्टमेंटमधील कुणालाही सुनिलच्या शक्तीबद्दल न सांगता सहजपणे त्या चौघांच्या समोर इतरांच्या नकळत सुनिलला आणले गेले. चौघेही त्यांचा गुन्हा कबूल करत नव्हते.

 

चौघांपैकी तिसऱ्या क्रमांकाचा गुन्हेगार ज्याच्या डोक्याभोवती प्रचंड लाल भळभळते वर्तुळ सुनिलला दिसले त्याबद्दल त्याने खुणेने हाताच्या बोटांनी रणजितला तीन आकडा दाखवला आणि मग हसून रणजित यांनी सुनिलला तिथून बाजूला जाण्यास सांगितले. आता सुनिलने सांगितलेल्या त्या माणसावर इतर तिघांच्या आधी थर्ड डिग्रीचा वापर करायला सुरुवात झाली आणि अथक प्रयत्नांनी त्याने गुन्हा कबूल केला. त्याने तसा घटनाक्रम आणि पुरावेपण सांगितले, जे फक्त त्या गुन्हेगारालाच माहिती होते आणि त्याद्वारे मग पोलिसांनी भक्कम केस उभी करून त्याला जलद कोर्टात फाशीच्या शिक्षेपर्यंत पोचवले. त्यानंतर असे बरेच गुन्हेगार सुनिलने ओळखले. त्याच्या आयुष्याची ही एक नवीनच सुरुवात होती. एक कलाटणी देणारी सुरुवात! आणि दोघांनी हे सुनिलच्या घरी किंवा इतर कुणालाही सांगायचे नाही असे ठरवले होते!

 

जेव्हा खोटे बोललेले ओळखण्याचे मशीन म्हणजेच "लाय डिटेक्टर" गुन्हेगारांच्या शरीराला जोडले जाते तेव्हा बरेच वेळा त्यातून खोटे ओळखणे शक्य होत नाही कारण गुन्हेगारांना माहिती असते की त्यांचे खोटे बोलणे हे मशीन त्यांच्या शरीराच्या आत खोटे बोलतांना होणाऱ्या बदलांमुळे पकडते आणि मग काही कसलेले प्रशिक्षित गुन्हेगार खोटे बोलत असतांना जाणीवपूर्वक शरीरातील बदल नियंत्रित करून बोललेले खोटे मशीनने ओळखू नये असा प्रयत्न करू शकत होते आणि लाय डिटेक्टर मशीनलाच खोटे ठरवण्यात यशस्वी होत होते.

 

पण समोर उभ्या असलेल्या सुनिलच्या अंगी निगेटिव्ह विचार ओळखण्याची अशी काही शक्ती आहे हे गुन्हेगारांना माहितीच नसल्याने, सुनिल समोर मुद्दाम त्यांच्या गुन्ह्यासंदर्भात काही ठराविक भावना भडकवणारे प्रश्न विचारले की त्यांच्या नकारात्मक विचारांचे इंजिन मेंदूत सुरु व्हायचे आणि मग लगेच सुनिलला लाल वर्तुळ दिसायचे आणि तो गुन्हेगार ओळखला जायचा.

 

अर्थात बरेचदा गुन्ह्याशी संबंधित नसणारा इतर दुसरा प्रखर निगेटिव्ह विचार सुरु असल्याने जजमेंट चुकायचीसुद्धा!! आणि म्हणून रणजित काही डोळे झाकून त्याच्या शक्तीवर विश्वास ठेवत नव्हते. तसेच अगदी प्रत्येकच वेळेस सुनिलवर अवलंबून राहण्याचे रणजित टाळत होते. येथे दोघेजण सारासार विचार आणि सद्सद्विवेकबुद्धी वापरून मार्ग काढायचे. 

 

पोलीस डिपार्टमेंटच्या इतर कर्मचाऱ्यांना सुनिल हा फक्त एक खबरी तसेच पोलिसांना टेक्नोलॉजीच्या सहाय्याने आणि गुन्हेगारांची वर्णनावरून वेगाने चित्रे काढून गुन्हेगार पकडण्यास मदत करणारा एक जागरूक नागरिक आणि त्यांचा एक नातेवाईक म्हणून माहिती होता. सुनिलच्या आणि रणजितच्या घरीसुद्धा थोड्याफार फरकाने हेच माहिती होते.

 

कॉलेज आणि अभ्यासातून जसा वेळ मिळेल तसा गरजेनुसार सुनिल रणजित सोबत असायचा. निर्जीव लाय डिटेक्टर मशीन असते तसे आता सुनिल खऱ्या अर्थाने एक सजीव निगेटिव्ह डिटेक्टर झाला होता!!

 

सुनिलने गेल्या दोन वर्षात पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल अनेक पुस्तके वाचली होती. कॉलेज आणि इतर सामाजिक जीवनात त्याला कुणीही मित्र, नातेवाईक ओळखीच्या व्यक्तीत कमी जास्त तीव्रतेचे लाल वर्तुळ दिसायचे तेव्हा तो गरजेनुसार त्या व्यक्तीला प्रश्न विचारून मग आलेल्या उत्तरांच्या आधारे तो सकारात्मक विचारसरणी त्यांच्या डोक्यात पेरायचा. एक वेगळ्या प्रकारची समाजसेवा केल्याचा आनंद त्याला व्हायचा.

 

पुलावरच्या स्फोटाच्या घटनेचा तपास रणजित यांचेकडे नसला तरीही विशेष राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा सनसिया (SNSIA) च्या मुंबई शाखेला त्यांना मदत करावी लागत होती. अजून त्या पुलावरच्या घटनेबद्दल कुणीही पकडले गेले नव्हते. तसेच त्याच दिवशी सुनिलमुळे पकडला गेलेला तो बॅगमध्ये शस्त्रं घेऊन जाणारा माणूस आणि पुलावरचा स्फोट यांच्यात काही कनेक्शन आहे किंवा नाही याबद्दल काही निष्कर्ष निघाला नव्हता आणि त्या सुनिलमुळे पकडला गेलेल्या माणसाने सांगितलेल्या दोन नावांच्या आधारे तपास सुरु होता.

 

पुलावरच्या घटनेनंतर घटनास्थळी ज्या काही वस्तू सापडल्या त्यावरून काहीच सुगावा लागत नव्हता. पुलाच्या आसपासच्या परिसरात तसेच "जहाज हॉटेल" वरील लोकांची चौकशी केली गेली. त्यातून फारसे निष्पन्न झाले नाही.

 

स्फोटाचे व्हिडीओ शुटींग अनेक लोकांनी मोबाईलवर केले होते पण ते सगळे स्फोटानंतरचे होते. हे सगळे रणजित आणि सुनिल या दोघांनाही माहिती होते. अंधाऱ्या रात्रीचे ते पाण्यातून उडी मारून पुलावर येणारे रोबोटिक विंचू कुणाच्याच कॅमेरात कैद झाले नव्हते. घटनास्थळी त्या विंचूंचे तुकडे सापडले खरे पण त्यावरून कोणताच ठोस सुगावा लागत नव्हता कारण ते साधे धातूचे तुकडे होते. सुनिल आणि रणजित हे दोघे शक्यतो सार्वजनिक ठिकाणी उघड उघड भेटणे आणि अशा विषयांवर बोलणे टाळत असत.

 

पुलावरच्या घटनेला अनेक महिने उलटून गेले होते. हवेपासून पेट्रोल बनवणारे यंत्र नष्ट करण्यामागे कुणा कुणाचा हात आहे याबद्दल अनेक तर्क वितर्क लढवले गेले पण अजून त्याबद्दल कुणाही गुन्हेगारापर्यंत पोहोचता आले नव्हते आणि कुणालाही अटक सुद्धा झालेली नव्हती. कुणी म्हणे हे एक आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे. पण सत्य अजूनही उघडकीस आले नव्हते.

 

दरम्यान सुनिलने पोलीस डिपार्टमेंटसाठी स्वस्तात विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनवलीत जी त्यांना गुन्हेगारांचा शोध लावण्यास मदत करतील. जसे मल्टीपर्पज फिंगर प्रिंट स्कॅनर, युटिलिटी बेल्ट, फेस स्कॅनर सेव्हर वगैरे. पोलीस हवालदारांसाठी त्यांच्या काठीत बसेल पण दिसणार नाही असे ऑडिओ आणि व्हीडिओ रेकॉर्डिंग डिव्हाईस बनवून दिले.

 

एकदा रणजित यांनी सुनिलकडे एक प्रस्ताव ठेवला होता. सुनिलला लोकांच्या डोक्यातील ज्या फ्रिक्वेन्सीच्या नकारात्मक लहरी दिसतात त्या लहरी एखादे इलेक्ट्रॉनिक उपकरण बनवून त्याद्वारे सुद्धा डिटेक्ट करू शकतो का? म्हणजे सुनिलवरचा ताण कमी होईल. खरे तर यामुळे सुनिलचे महत्व कमी होणार होते पण समाजाच्या भल्यासाठी त्याने ते आव्हान स्वीकारले.

 

पोलीस डिपार्टमेंटच्याच एका लॅब मध्ये त्याने सलग आठ दिवस तसे उपकरण बनवण्यासाठी मेहनत घेतली. शेवटी एक उपकरण बनवण्यात सुनिल यशस्वी झाला. लॅब मध्ये फक्त रणजित यांच्या उपस्थितीत सुनिलने ते उपकरण ऑन केले. त्याच्या डिस्प्ले मध्ये लाल दिवा बीप झाला नाही. मग उपकरण स्वीच ऑफ करून ते गर्दीच्या ठिकाणी दादर रेल्वे ब्रिज वर गेले. एका मोठ्या पेटीत ते उपकरण त्यांनी आणले. पेटी उघडून ते उपकरण ऑन केले. क्षणार्धात त्याचा स्फोट झाला. त्या मजबूत पेटीचेही तुकडे झाले. या स्फोटामुळे घाबरून पळापळ सुरू झाली तेव्हा रणजित यांनी सर्वांना हे एक मॉक ड्रिल होते असे सांगून धीर दिला.

 

 

लॅब मध्ये परतल्यावर -

"मला वाटते मामा, वातावरणातली सगळीच निगेटिव्हीटी हे मशीन एकत्र पकडतं. आणि त्याची एनर्जी पॉवर या मशीनच्या कपॅसिटी पलीकडची आहे. माझी गोष्ट वेगळी आहे, मला व्यक्तीनुसार फक्त लाल वर्तुळ दिसते. विशिष्ट व्यक्तीवर फोकस केल्यास तेवढ्याच व्यक्तीबद्दल लाल वर्तुळ, आवाज मला येतात, इतरांकडे मी गरजेनुसार दुर्लक्ष करू शकतो!"

 

"होय, तुझ्याकडे सिलेक्टिव्ह डिटेक्शन आहे. आणि प्रत्येकच गोष्ट जी माणूस करू शकतो ती यंत्राने करावी असा अट्टाहास माणसाने करूच नये. तुमच्या भाषेत काय म्हणतात त्याला? आर्टिफिशीयल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता! एके दिवशी मानवजातीला भारी पडेल ते!"

 

सुनिलने त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

घरी परत येत असतांना त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. कारण खरे तर सुनिलकडे सिलेक्टिव्ह निगेटिव्हीटी ओळखू शकेल असा फॉर्म्युला होता ज्याद्वारे तो तसे उपकरण बनवू शकला असता पण तसे उपकरण गरज पडेल तरच तो बनवणार होता. कारण आता जर तसे उपकरण बनले तर त्याची नक्कल होऊन त्याचा दुरूपयोग होऊ शकला असता. त्यामुळे पुढे जाऊन तसे उपकरण बनवावे लागलेच तर ते फक्त स्वतःसाठी सुनिल वापरणार होता किंवा एखाद्या अतिशय विश्वासू व्यक्तीला तो ते देणार होता, अन्यथा नाही!

 

दरम्यान सुनिलचे इंजिनिअरिंग पूर्ण झाले. तो डीस्टींक्शन मिळवून पास झाला. त्याला चांगले 88 टक्के मार्क मिळाले. आयटी कंपनीत दोन तीन जॉब ऑफर पण आल्या पण त्याने स्वीकारल्या नाहीत.

^^^

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Nimish Sonar

आता ही कादंबरी ऑडिओ बुक स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे: https://youtube.com/playlist?list=PL3b5C5GmPJolxNZzL9dD2Z54T_L--OSX_

Deepa

please continue to write such amazing stories.

Rujuta

वाह। खूप छान कथा आहे। खरोखर विज्ञान आहे ह्या कथेत आणि रोमांच सुद्धा।

Sayali Raje

कथा फार छान जुळून आली आहे , एका बैठकीत सर्व वाचून संपवली. कथानकाचा मूळ नायक हा एका अर्थाने "दिव्यांग" आहे .

Akshar

Nimish has put a lot of efforts into this book. Must read.

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to डिटेक्टिव्ह निगेटिव्ह


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
खुनाची वेळ
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
कथा: निर्णय
गांवाकडच्या गोष्टी
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल
अजरामर कथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत