मला निमिष सोनार यांनी लिहिलेल्या "डिटेक्टिव्ह नेगेटिव्ह" या कादंबरीच्या प्रस्तावना लेखनासाठीचे आमंत्रण म्हणजे मी माझे भाग्य समजतो. सर्वप्रथम निमिष सोनार यांच्या या नव्या कादंबरीचे मी मनापासून स्वागत तसेच अभिनंदन करतो. जरी मी आणि निमिष एकाच महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे स्नातक झालो तरी आमची ओळख ही एका मित्राद्वारे झाली असून ती अगदी औपचारिक होती.
जवळ-जवळ पंचवीस वर्षांनी आम्ही पुन्हा संपर्कात आलो आणि त्याचे श्रेय जरी सोशल मेडिया सारख्या टेक्नॉलॉजिला जात असले तरी कारण मात्र आमची मराठी लेखनाबद्दल असलेली रुची आणि निमिष सोनारांचे त्याबद्दल योगदान हेच होते. निमिष यांनी आपल्या मराठी लेखनाबद्दलच्या आवडीला न्याय देतांना बरीच तारेवरची कसरत केली आहे यात तिळमात्र शंका नाही. कारण स्वतःचे वैयक्तिक जीवन ज्यात नोकरी तसेच कुटुंबाची जबाबदारी पार पाडून देखील आपली लेखनासारखी आवड जोपासणे हे किती अवघड आहे ते मी अगदी अनुभवाने समजू शकतो. त्यांची ही आवड जोपासण्याची जिद्द त्यांच्या लेखन कौशल्यतेत दिसून येते.
आज-काल प्रेमकथा, प्रवासवर्णन, राजकारण वगैरे मराठी लिखाण खूप वाचायला मिळते किंबहुना उपलब्ध आहे परंतु सायन्स फिक्शन च्या जोडीने डिटेक्टिव्ह कथा कादंबर्या तेही मराठीत वाचण्यास / ऐकण्यास मिळणे विरळाच. म्हणून "डिटेक्टिव्ह-निगेटिव्ह" ही कादंबरी अगदी आजच्या टेक्नॉलॉजिला लक्षात घेऊन मराठी वाचकांना डिजिटल स्वरूपात वाचण्यासाठी तसेच किंडल सारख्या टेक्नॉलॉजिद्वारे ऐकण्यासाठी देखील उपलब्ध करण्याच्या निमिष सोनार यांच्या या उपक्रमाचे मी अभिनंदन करतो आणि ही कादंबरी "सायन्स फिक्शन "तसेच "डिटेक्टिव्ह" या श्रेणींमध्ये खूपच लौकिक मिळवेल अशी माझी खात्री आहे.
याच प्रकारे निमिष सोनार यांनी विविध विषयांवर कादंबऱ्या लिहीत राहाव्यात आणि मराठी वाचकांना वाचनाचा लाभ आणि आनंद देत राहावे या सदिच्छेने ही प्रस्तावना येथेच संपवतो.
-- राहुल दवे, कॅलगरी (कॅनडा), ह.मु. कॅलिफोर्निया
(अमेरिकेतील खासगी कंपनीत अभियांत्रिकी सलागार)