वसंता, या गोष्टी ऐकून तूं हंसशील. मी हया गोष्टी अशांसाठी देत आहे कीं गांधींजी विज्ञान मानतात. त्यांना शोधबोध सारें हवें आहे. ते जुनाट बुध्दीचे, जडजरठ बुध्दीचे नाहींत. बंगलोरला पुष्कळ वर्षापूर्वी भाषण करतांना ते म्हणाले, '' मला विजेचे दिवे हवे आहेत. परंतु विजेनें चालणारी कापडाची गिरणी नको. विजेची शक्ति घरोघर पुरवितां आली व घरगुती धंदे त्यावर चालवितां आले तर मला तीहि हवी आहेत ! '' यंत्र म्हटलें कीं नाक मुरडावयाचें असे दुराग्रही गांधीजी नाहींत. ते म्हणतील, '' शिवण्याचें यंत्र मला पाहिजे. अंहिंसक इनॉक्युलेशन मला पाहिजे. क्लोरोफॉर्म मला पाहिजे. जे शोध, जी यंत्रे कोणाची पिळवणूक न करतां संसारांत सुख आणतील तीं मला हवीं आहेत ! '' गांधीजींना वनस्पतिसंशोधन पाहिजे आहे. खगोलविद्या हवी आहे. बौध्दिक आनंद का त्यांना नको आहे? चरखा हातीं घ्या एवढें म्हटल्यानें गांधीजी कांहीं जुनाट, पुरातन पुरूष होत नाहींत.
यंत्रानें बेकारी वाढते व गुलामगिरी वाढते. भांडवलवाले व मजूर असे भेद वाढतात. युध्दें होतात. हिंसा वाढते. म्हणून गांधीजी म्हणतात कीं सा-याच वस्तु यंत्रानें नका निर्मू. आतां आगगाडया किंवा इतर गोष्टी खेडयांत किंवा एका माणसाला नाहीं निर्मिता येणार. आणि त्या नष्टहि नाहीं करतां येणार. परंतु अशा कांही गोष्टी आपण सोडून देऊं या. दृष्टि अशी ठेवूं या कीं खेडयांतील लोक तेथेंच घरबसल्या उद्योगधंदे करुन समाजाच्या आवश्यक गरजा पुरवीत राहतील. मग एकाच्या हातांत फारशी सत्ता व संपत्ति येणार नाहींत. ग्रामोद्योग असले म्हणजे आपोआपच संपत्तीचें विभाजन होईल. यंत्रांचें राक्षस उत्पन्न करा व मग क्रांति करा हें सांगितलें आहे कोणीं?
गांधीवादाचीं तीन तत्त्वें सांगतां येतील. (१) संपत्ति एका हातीं न देंणें. (२) सत्ता एका हातीं न देणें. (३) लोकांची एकाच ठिकाणीं गर्दी होऊं न देणे. या तिन्हीं गोष्टींसाठी यांत्रिक उत्पादन दूर ठेवणें हाच धर्म ठरतों. यांत्रिक उत्पादन केलें नाहीं म्हणजे भांडवलवाला वर्ग निर्माण होणार नाही. भांडवलदार वर्गच जन्मला नाहीं म्हणजे मग पुढें त्यांतून निर्माण होणारी फॅसिस्ट-नाझी हुकुमशाही वा साम्यवादी हुकुमशाही याहि जन्मास येणार नाहींत. म्हणजे सत्ता एकाच्या हातांत एकवटणार नाहीं. आणि प्रजाहि लाखों गांवीं पसरलेली असेल. एके ठिकाणीं गदींने राहण्याची जरूरी भासणार नाहीं. खेडयांत मोकळी अशी जनता राहील.
समाजवादी लोक म्हणतात कीं गांधीजींना ज्या तीन गोष्टी हव्या आहेत त्याच आम्हीहि इच्छितो. आम्हांलाहि एकाच्या हातीं संपत्ति नको आहे. परंतु त्यासाठी ग्रामोद्योगांची कांस धरण्याची जरूरी नाहीं. 'यंत्रांनी बेकारी वाढते. आणि ही बेकारी दूर करण्यासाठीं म्हणून इतर देशांना गुलाम करावें लागतें व आपला माल तेथें खपवावा लागतो' असें गांधीवादी म्हणतात. परंतु हा यंत्राचा दोष नसून समाजरचनेचा दोष आहे. समाजवादी समाजरचनेंत हा दोष राहणार नाहीं. समजा एखाद्या देशाला समाजवादी व्हावयाचें आहे, तर तेथें काय करण्यांत येईल? यंत्रानें उत्पादन फार होतें. तें खपविण्यासाठी दुस-या बाजारपेठा धुंडाळाव्या लागतात. परंतु आम्ही इतकेंच उत्पादन करूं. कीं, जें देशाच्या गरजे पुरतें आहे. आणि ज्या कांहीं वस्तु देशांत होतच नाहींत त्या वस्तु परदेशांतून आणण्यासाठी जी किंमत द्यावी लागेल ती भरुन काढण्यासाठीं जेवढें अधिक उत्पादन करावें लागेल तेवढें करू. जगाच्या बाजारपेठा आम्हाला काबीज करण्याची गरज नाहीं. आम्ही कामाचे तास कमी करूं व अनेकांना काम देऊं आठ आठ, नऊ नऊ तास काम केल्यानतर मनुष्यामध्यें जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठीं शक्तिच राहात नाहीं. जीवनांतील इतर आनंद तो कधीं घेणार? त्याला बाग करतां येणार नाहीं. संगीत शिकतां येणार नाहीं; चित्रकला दूर ठेवावी लागेल, इतर शास्त्रें दूर ठेवावीं लागतील. आजच्या भांडवलशाही समाजरचनेंतील कामगार हा कामगार म्हणूनच जगतो व मरतो ! समाजवादी समजारचनेंतील कामगारहि शास्त्रज्ञ व संगीतज्ञ होईल आणि संगीतज्ञ व शास्त्रज्ञहि कामगार होतील. श्रमजीवी वर्ग व बुध्दिजीवी वर्ग यांची आज फारकत आहे. बुध्दीजवळ शरीरश्रम नाहींत व शरीरश्रमाजवळ बुध्दि नाहीं. मनुष्याचासंपूर्ण विकास भांडवलशाही समाजरचनेंत होऊंच शकत नाहीं. आणि उद्यांच्या समाजवादी रचनेंत कारखाना हा व्यक्तीच्या मालकीचा राहणार नसल्यामुळें एकाच्या हातीं संपत्ति जमण्याची भीति नाहीं. तेव्हां यंत्रावर जे तीन आक्षेप गांधीवादी मंडळींचे आहेत कीं, त्यानें बेकारी वाढते, इतरांना गुलाम करावें लागतें व भांडवलशाही निर्माण होते, ते वरील प्रमाणें नाहींसे होतात. यासाठीं यंत्र ठेवूनहि गांधीजींचा उद्देश सफल होईल व फार श्रम न करतां फुरसतीचा भरपूर वेळ जीवनाच्या इतर बौध्दिक विकासांत व निरामय, निर्मळ आनंदांत कामगारास दवडता येईल.