आणि स्वत:च्या निर्मितीचा म्हणून जो आनंद वैयक्तिक हस्तकर्मांत आहे असें तुम्ही म्हणतां तो आनंद सामुदायिक निर्मितीत कां वाटणार नाही? एका जपानी कामगाराची गोष्ट आहे. तो लढाऊ जहाजें बांधण्याच्या कारखान्यांत काम करीत होता. काम करतां करतां तो वाचायला शिकत होता. कोणी तरी त्याला विचारलें, '' तूं आतां कशाला शिकतोस वाचायला? '' तो म्हणाला, '' हें पोलादी गलबत केव्हां तरी लढाईंत जाईल. शत्रूचा ते पराजय करील. या गलबताचें नांव वर्तमानपत्रांत येईल. ज्या गलबताच्या बांधणींत माझाहि हातभार होता तया गलबतानें जय मिळविला हें वाचून मला किती बरें आनंद होईल?  ती आनंदाची वार्ता मला वाचतां यावी म्हणून या गलबतांत स्क्रू बसवतां बसवतां मी वाचायला शिकत आहें ! '' तो कामगार स्क्रू पिरगाळीत होता. तो कंटाळला नाहीं. हें जें आम्ही सर्व कामगार मिळून गलबत बांधींत आहोंत. त्यांत माझाहि भाग आहे, याचा त्याला आनंद होता. यांत्रिक निर्मितींतहि हा आमचा कारखाना. सा-या समाजासाठीं येथून आम्ही माल देत आहोंत. तयांत मीहि भर घातली आहे. एखाद्या स्क्रू तयार केला आहे. '' असा आनंद राहील. सामुदायिक व वैयक्तिक असा दोहों प्रकारचा आनंद यांत आहे. हा आनंद अधिकच उच्च आहे. केवळ वैयक्तिक आनंद कम दर्जाचा आहे. गंगा सागरांत मिळाली आहे, परंतु तिला स्वतंत्र, अलग असें अस्तित्वहि आहे. अर्थात् अशी सामुदायिक आनंदाची कल्पना घेण्यासहि मनुष्याचा अधिक विकास व्हायला हवा. परंतु तुमच्या वैयक्तिक कर्मांतील आनंद उपभोगावयासहि विकास झालेला असला पाहिजे.

गायी-बैलाचें तुमचें काव्य नको. बैलाच्या नाकांत वेसण टोचतां. घोडयांना लगाम घालतां. बैलांना आर टोंचतां. घोडयाला फटके मारतां. गायी-गुरांना प्रेमानें वागविणारा एखादाच ! मुंबईस गोदींतून माल नेणा-या बैलगाडया पहा. हाकणारी चाबकावर चाबूक उडवीत असतात. टांगेवाले रागावले म्हणजे घोडयाला किती मारतील त्याचा नेम नाहीं. मोटेला बैल जुंपला म्हणजे त्याला काय वाटत असेल तें त्याच्या वंशीं जाऊं तेव्हां कळेल !

आम्हीं हिंसेचे भक्त नसलों तरी हिंसा अपरिहार्य असेल तरच ती आम्ही करू. आम्ही साधी माणसें. याच घटकेला सारे बदलूं दे असे आम्हांला वाटणार. बदलण्यासाठी आम्ही खटपट करणार. आजपर्यंत साधुसंतांनीं उपदेश केले. परंतु कोणी ऐकले? ख्रिस्ताने सांगितलें, '' सुईच्या नेढयांतून उंट जाईल; परंतु श्रीमंत मनुष्य स्वर्गात जाणार नाही. '' कोणीं तें ऐकले? कुराण सांगतें, '' तूं एकटयानें खाऊं नकोस, व्याज घेऊं नकोस. '' परंतु कोण ऐकतो? पठाणहि आतां सावकार बनले ! '' श्रीमंतांनों, तुम्ही ट्रस्टी व्हा '' असे तुम्ही सांगतां. कोणता श्रीमंत हें ऐकत आहे? या श्रीमंताविरुध्द आम्ही अहिंसक सत्याग्रह करुन काय होणार? आमच्यावर गोळया घातल्या जाणार. आम्ही असें मरायला तयार नाही. उपासमारीनें मरण. गोळीबारानें मरण. आमचें रोज मरणच आहे !  ज्याच्यामुळैं मरण आहे त्याला नष्ट करायला आम्ही उभें राहूं. हिंसा-अहिंसा आमच्यासमोर प्रश्न नाहीं. कोटयवधि गरिबांची हाय हाय होत आहे. ही जी श्रमणा-या लोकांची तिळतिळ हिंसा होत आहे. ती थांबविण्यासाठी मूठभर लोकांची हिंसा करावीच लागली तर ती आम्ही करूं. आम्ही रत्त्कासाठी तहानलेले नाहीं. परंतु अपरिहार्यच झालें तर रक्त सांडायलाहि आम्ही मागेंपुढें पाहणार नाहीं. हिंसेंतून हिंसा निर्माण होते, युध्दांतून युध्द निर्माण होतें असें  तुम्ही म्हणतां. भांडवलशाही समाजरचना आहे, सम्राज्यवाद आहे तोपर्यंतच हें असें चालेल. कारण एक साम्राज्यशाही दुस-या साम्राज्यशाहीचा पराजय करते. ती पराभूत साम्राज्यशाही पुन्हां जोर करुन त्याचा सूड उगविते. जोंपर्यंत अशी ही समाजरचना आहे, तोपर्यंत युध्दें राहाणार. शेवटच्या हिंसेनें एकदां समाजवादी वर्गविहीन समाजरचना निर्माण झाली कीं स्पर्धा संपेल. साम्राज्यें अस्तंगत होतील. मग कोण कोणाशीं लढणार? मग हिंसा कोठून दिसेल? हिंसेनें हिंसाच निर्माण होईल ही गोष्ट शेवटपर्यंत सत्य नाहीं.

समाजवादी समाजरचना हा आदर्श आहे. प्रयोग एकदम थोडाच यशस्वी होतो. पण उत्तरोत्तर तो आम जनतेला मान्य होत चालला आहे. रशियानें पोलंड घेतला, फिन्लंडवर स्वारी केली, बेसरबिया व्यापला. याबद्दल कोणी कांहीं म्हणो. त्याचा उत्कृष्ट इतिहास ' मस्ट द वॉर स्प्रेड? ' या पुस्तकांत आहे. रशियानें हें सारें स्वसंरक्षणार्थ केलें. ' स्वसरंक्षणर्थहि रशियानें दुस-यावर आक्रमण कां करावें? ' असा कोणी प्रश्र विचारील. प्रश्न विचारणें सोपें आहे. आपण एखादें कलम मोठया मिनतवारीनें लावावें, तें कलम खायला एखादी गाय येत आहे असें दिसलें तर आपण काठी घेऊन धांवतो व गोमातेच्या पाठींत ती हाणतों ! हा न्याय समजणा-यांनीं फिन्लंडवरील हल्ल्याबाबत कां नाक मुरडावें? ब्रिटिश साम्राज्यसत्तेला साम्राज्यसरक्षणार्थ सिंगापूर, एडन, सायप्रस हीं हवींत. मग रशियाला कां नकोत? निदान रशियांतील प्रयोग तरी बहुजनसमाजाच्या कल्याणाचा आहे. रशियाला पोलंडमध्यें स्वारी करतांना गोळी घालावी लागली नाहीं. तरवार उगारावी लागली नाहीं. तेथील जनतेनें रशियाच्या शेतक-या-कामक-यांच्या लाल सेनेचे स्वागत केलें ! असें आत्क्रमण दुनियेंत कोठें झालें असेल? येणा-या परसैन्याचा असा सत्कार कोणीं केला असेल? पोलंडमध्यें का स्वातंत्र्य होतें? बडया धनिकांचीच तेथे सत्ता होती. कामगार व शेतकरी चिपाडाप्रमाणें तेथें पिळलेच जात होते. या श्रमणा-या जनतेला लालसेना तरणारी वाटली आणि रशियानें तसेंच केलें. प्रदेश घेतल्याबरोबर तेथें सर्वत्र शेतक-या-कामक-यांना समित्या स्थापन केल्या. कारखान्यांतील म्हाता-या कामगारांस पेन्शनें देण्यांत आलीं. प्रत्येक शेतक-यांस पांच एकर जमीन व दोन गायी देण्यांत आल्या ! असें जगांत कोण जेत्यानें आजपर्यंत केलें होते का?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel