त्या काळांत विचार नव्हता. स्वराज्याचा थोडासा विचार होता. परंतु स्वराज्याचा अर्थही स्पष्ट नव्हता. स्वेदशाची, स्वदेशीची, स्वधर्माची, स्वसंस्कृतीची चाड उत्पन्न करण्यासाठी नवीन संस्था निघाल्या. परंतु शिक्षणशास्त्राचा असा त्यांत विचार नव्हता. शिक्षण इतरत्र मिळे तेंच येथे मिळे. १९०७-०८ साला नंतर हिंदुस्थानभर सरकारने दडपशाहीचा वरवंटा फिरवला. त्यांत राष्ट्रीय शाळा बंद पडल्या. समर्थ विद्यालय बंद झाले. समर्थ विद्यालयांतील विद्यार्थांस दुस-या शाळेत घेण्यास बंदी झाली ! तळेगांवच्या समर्थ विद्यालयांतीलच तो तरुण वीर पिंगळे ! गदर चळवळीत तो फांशी दिला गेला. जपानमध्ये राहणा-या रासबिहारींनी या हुतात्मा पिंगळयांबद्दल लिहिले, 'इतका तेजस्वी तरुण मी पाहिला नव्हता ! ' विजापूरकरांनी लो. टिळक सुटून आल्यावर नामदार चौबळ वगैरेंच्या सहाय्याने तळेगांवला नवीन समर्थ विद्यालय पुन्हा स्थापलें. तेथे बौध्दिक शिक्षणाबरोबर डेअरी, ऑईल इंजिन चालविणे वगैरे गोष्टींचेही शिक्षण द्यावे असे त्यांनी ठरविले. बौध्दिक शिक्षणाला धंदेशिक्षणाची तोड द्यावी असे विजापूरकर म्हणत होते.
तिकडे १९१२ मध्ये व्हॉइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांच्या हस्ते बनारस हिंदु विद्यापीठाचा पाया घातला गेला. पंडित मदनमोहन मालवियांचे ते अमर कार्य ! केवढी आहे बनारस युनिव्हर्सिटी ! हजारो मुलें तेथें शिकत आहेत. सर्व प्रकारची कॉलेज त्यास जोडलेली आहेत. कोटी कोटी रुपये त्यासाठी मालवीयजींनी मिळवले.
परंतु हिंदुस्थानातील शिक्षण कसे असावे, याचा विचार कोणीही केला नव्हता. कलकत्ता युनिव्हर्सिटीने सॅडलर कमिटी नमून शिक्षणवर दहा बारा खंडांतून रिपोर्ट प्रसिध्द केला. तो रिपोर्ट महत्वाचा आहे. परंतु तो लायब्र-यांतून पडून राहिला ! त्या रिपोर्टातही अखिल हिंदुस्थानच्या सार्वत्रिक शिक्षणाचा प्रश्न सोडवलेला नाही.
१९२० साल आले. असहकाराचे युग आले. शाळा - कॉलेजांवर पुन्हा बहिष्कार आला. शेकडो विद्यार्थी बाहेर पडले. कारण शिक्षणांत जीवनदायी असे काही राहिलेंच नव्हते. 'मॉडर्न रिव्हयू' ने लिहिले 'शिलर या जर्मन नाटककाराचे 'रॉबर्स' नाटक वाचून व पाहून कित्येक जर्मन तरूण खरोखरच चोर बनले ! त्याप्रमाणे कॉग्रेसने शाळा सोडा म्हणताच शेकडोंनी शाळा सोडल्या. कारण शाळा कॉलेजांत आकर्षक असे काही नव्हतेंच.'
परंतु या विद्यार्थ्यांचे पुढे करावयाचे? त्यांना शिकण्याची तर इच्छा होती. राष्ट्रीय शाळा-महाशाळा निघाल्या. टिळक विद्यापीठ स्थापन झाले. अहमदाबादला गुजरात विद्यापीठ स्थापन झालें. मुंबईस नॅशनल मेडिकल कॉलेज निघाले. अमळनेर येथे राष्ट्रीय महाविद्यालय निघाले. राष्ट्रीय शाळा तर सतारा, पुणे, नगर, चिंचवड, येवले, भुसावळ, खामगांव, अकोला, यवतमाळ, अनेक ठिकाणी बृहन्महाराष्ट्रांत निघाल्या.
परंतु सर्व संस्थांतून शिक्षण कोणते होते? तेंच काव्यशास्त्रविनोदाचे शिक्षण ! मात्र ते मातृभाषेतून दिले जाई. गुजरात विद्यापीठाने थोडाफार अर्थशास्त्र विषयक शिक्षणाचा प्रयोग केला . 'मातर' तालुक्याची पाहणी हे संशोधनात्मक पुस्तक गुजरात विद्यापीठातील डॉ. कुमारप्पा यांनी विद्यार्थ्यासह खेडयापाडयात हिंडून तयार केले ! हिंदी अर्थशास्त्र म्हणजे सात लाख खेडयांचे अर्थशास्त्र असे त्यांनी सांगितले. महात्मा गांधींनी, 'स्वातंत्र्यासाठी सत्याग्रही तयार करील ते राष्ट्रीय शिक्षण.' अशी व्याख्या केली. राष्ट्र आधी स्वतंत्र केले पाहिजे. आज दुसरे प्रश्न आपण हाती घेऊ शकत नाही. कोणतेही प्रयोग स्वराज्याशिवाय फोल आहेत. तेंव्हा तें स्वराज्य जवळ आणण्यासाठी शिपायी हवेत. सत्याग्रही हवेत. शिक्षणाने असे त्यागी, स्वातंत्र्यप्रेमी सत्याग्रही सैन्य निर्माण करावे, असे महात्माजींचे म्हणणे.