वसंता, आसमंतातले जीवन सुंदर करणे याहून थोर काय आहे? हे जीवन सुंदर व आनंदमय करण्यासाठी सा-या कलांनी झटले पाहिजे. जीवन म्हणजे राजा. या राजाची सेवा कलांनी करावी. ज्याप्रमाणे ग्रहोपग्रह सूर्याभोंवती फिरतात व प्रकाश मिळवितात, त्याप्रमाणें जीवनाच्या सूर्याभोवती कलांनी फिरुन प्रकाशित व्हावें. ती कला धन्य जी जीवनाची सेवा करावयास उभी राहिली आहे.
संगीत कला घे. तुला माहित असेल की समावेद म्हणून एक वेद आहे. ऋ ग्वेंदांतील मंत्र संगीतांत म्हटले म्हणजे त्यांचा सामवेद होतो. हें सामवेद नांव मला फार आवडतें. संगीत साम्यावस्थां निर्माण करतें. दिवाणखान्यांत संगीत सुरुं होते व सार्वांच्या मनाची समता होते. सारे आनंदांत तल्लीन होतोत. सर्वांच्या तोंडातून एकदम 'वाहवा' असे धन्योद्गार बाहेर पडतात.
माझ्या मनांत येते दिवाणखान्यांतसंगीत निर्माण करणारा जीवनांत संगीत आणतो का? माझे एक शिक्षकमित्र चांगले गाणारे, संगीत तज्ञ असे आहेत. त्यांचा आवाज मूळचा चांगला नव्हता. परंतु तपश्चर्येने, अभ्यासाने कमावून त्यांनी तो सुधारला. त्यांचे गाणे मला फार आवडे, ते सुंदर गात. परंतु ते शाळेतील मुलांना मारुन रडवीत. आपल्या गळयांतून गोड आवाज जे काढायला शिकले त्यांनी मुलांच्या गळयातून 'भो' आवाज का काढावा? त्याला आपल्या वर्गांत, आपल्या घरांत का बरे संगीत निर्माण करता येऊ नये? मेळ का घालता येऊ नये?
मला कधी कधी वाटते की हिंदुमुसलमानांचा दंगा सुरु झाला की एकदम 'हे बहारे बाग दुनिया चंद रोज' असे गाणे म्हणत त्या गर्दीत घुसावे. त्या विरोधांत संगीत न्यावे. एखादा गंधर्व जर आलाप घेत विमानांतून एकदम त्या गर्दीत उतरला तर परस्परांस मारणारे हात एकमेकांस मिठया मारु लागतील ! संगीताने पाषाणही म्हणजे पाझरतात. जनतेंत संगीत निर्मिझ्यासाठी, मेळ घालण्यासाठी माझ्या जीवनाची तंबोरी फुटूं दे. कृतार्थ होईल ती तंबोरी.
टॉलस्टॉय एका सुप्रसिध्द चित्रकाराच्या सुंदर चित्राविषयी लिहितो : 'ते अत्यंत सुंदर चित्र होते. काय बरें होतें त्या चित्रांत? त्या चित्रात रस्त्यांतून लढाईसाठी जाणा-या सैनिकांची मिरवणूक आहे. गच्चीत खुर्ची टाकूरन एक माता बसली आहे. तिन तोंडावर रुमाल घेतला आहे. तिला ती मिरवणूक पाहवत नाही ! जवळच तिचा लहान मुलगा आहे. तो जिज्ञासेने थोडे मिरवणुकीकडे, थोडे आईकडे बघत आहे.' किती सूचक चित्र ! जीवनावर केवढा प्रकाश त्या चित्राने पाडला ! मुत्सद्यांच्या महत्वाकांक्षेसाठी युध्दे होतात. बिचारे शिपाई ! त्यांचे का कोणाशी वैर असतं! परंतु मातृभूमीसाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, चला, मरा असे त्यांना सांगण्यात येते. परंतु देश म्हणजे कोण? देश म्हणजे कोटयावधी लोक. ते तर दरिद्री आहेत. हजारो लढाया झाल्या. परंतु गरीबांची गरीबी जात नाही. शेतसारे कमी होत नाहीत. त्यांचे जीवन पूर्वीप्रमाणेच कलाहीन व निस्तेज. देश म्हणजे लॉईड जॉर्ज, देश म्हणजे हिटलर, देश म्हणजे मुसोलीनी ! देश म्हणजे कोटयावधी जनतेचा संसार नव्हे. पंरतु शिपायांना भ्रामक भावनांची दारु पाजून दुस-या देशांतील तशाच लोकांवर सोडण्यात येते. परिणाम काय? सेनापतीचे पुतळे होतात आणि लाखो शिपायांच्या घरी रडारड होते. मुले पोरकी होतात. पत्नीचा पति मरतो. बहिणीचे भाऊ मरतात. म्हणून त्या चित्रातील माता त्या मिरवणूकीकडे पाहू शकत नाहीत. ती डोळे झांकते. तिचा पति का अशा लढाईतच मेलेला असतो?