वसंता, तूं जीवनाच्या कलेचा उपासक हो. तुझ्या सेवादलांतील मुलांना जीवनाची कला उपासावयास सांग. त्यांच्याजवळ जर इतर कला असतील तर त्या त्यांनी जीवनाच्या कलेसमोर आणाव्या.
वसंता, लौकरच माझा खटला चाजून मला शिक्षा होईल. तर पुढें तुरुंगात लिहीन तें बाहेर येईपर्यंत वहीतच राहील. सध्यांपुरता तरी सर्वांस सप्रेम प्रणाम. तुम्ही बहुतेक विद्यार्थी आहांत. विद्यार्थ्यांनी राजकारणांत पडावें कीं न पडावें, याची चर्चा आतां फोल आहे. स्वतंत्र्य देशांत अशी चर्चा कोणी करीत नाहीं. कठीण प्रसंगी सारे एकजात त्यांत पडतात. अशी चर्चा आपल्या देशासारख्या अभागी देशांतूनच होते. आज जगांती इतर देशांतील तरुण आपापल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व सोडून बाहेर पडले आहेत. मी तुम्हांलाहि सांगेन की, शाळा-कॉलेज सोडा व खेडयांतून निर्भयता पसरवा. ज्यांना शक्य त्यांनीं तरी निघावें. तुम्ही हजारों तरुण पडा बाहेर. जा खेडोपाडी व अस्पृश्यता नष्ट करण्यास सांगा. हरिजनांची वस्ती झाडा. खांद्यावर खादी घेऊन ती खपवा. हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रसंग वरचेवर आणा. निरनिराळया सणांचे वेळेस जमवा हिंदु-मुसलमान एकत्र. संक्रांत झाली तर त्यांना तिळगूळ वाटा. प्रेमानें भेटा. आणि हें सारें करीत असतांना कॉग्रेसची विशुध्द भूमिका सर्वांना समजावून देत रहा. निर्भय व्हा. सारें राष्ट्र जागृत होऊं दे. जागृत राहूं दें. गा गाणीं. घ्या हाती उंच भव्य तिरंगी झेंडें. मिरवणुकी काढा. सभा घ्या. धूमधडाका सुरु करा. ही जीवनाची कला आहे. जीवनांत आज रंग भरण्याची ही वेळ आहे. तुम्ही का स्वस्थ राहणार?
ज्यांना हें नसेल करतां येत, त्यांनीं साक्षरतेचा प्रसार करावा. सुटीचे दिवस सेवेंत दवडावे. मी किती सांगूं, काय सांगूं? माझें हृदय भरुन आलें आहे. सारा महाराष्ट्र उचंबळून उठेल का? क्षुद्र जातीय डबकीं सोडून अखिल भारतीय अशी मोठी दृष्टि घेऊन, स्वातंत्र्य डोळयांसमोर ठेवून उठतील का सारे महाराष्ट्रीय तरुण? ज्या राष्ट्रांतील तरुणहि संकुचित दृष्टीचे बनले, जात्यंध बनले, त्या राष्ट्राला कोण तारणार? तरुण तरी मोठया दृष्टीचा हवा. खरीं शास्त्रीय दृष्टि घेणारा हवा. दुसरा वाईट वागला तरी आपण श्रध्देनें सन्मार्ग घेऊनच गेलें पाहिजे. कॉग्रेस हें सांगत आहे. तुम्ही सेवादलांतील मुलें ! तुम्ही उठा सेवा करायला, शक्य ती तरी करायला. वसंता, आपण केव्हां भेटूं? मी सुटेन तेव्हां तोंपर्यंत मनोमय भेट. सेवादलांतील सर्वांस प्रणाम !
लहान दत्तू, व रामूस आशीर्वाद.
तुझा
श्याम