लहान मुलें अकपट असतात. त्यांना कोठें धर्म माहित असतात. आपण त्यांना खोटे धर्म शिकवितों. मी माझ्या बहिणीच्यालहान मुलींना विचारलें, ''हरिजनांचीं मुलें तुमच्या घरी आणली तर तुम्हांस चालेल का?'' त्या मुलीं म्हणाल्या, ''ती घाणेरडी असतील. ती मुलें गलिच्छ असतात. ''मी सांगितलें, आपण त्यांना नीट आंघोळ घालूं. त्यांच्या अंगाला तेल लावूं. साबण लावूं. मग त्यांना जवळ घ्याल की नाहीं? '' त्या मुलीं म्हणाल्या, '' हो '', '' त्या लहान मुलांना पटकन समजलें. परंतु आम्हां वयानें वाढलेल्यांना कोण अहंकार !
कोणी पंडित विचारतात, '' पूर्वीच्या काळीं अस्पृश्यता होती म्हणून का हिंदुस्थान श्रीमंत नव्हता? अस्पृश्यता होती तरी का शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापता आलें नाही? '' या प्रश्नांना काय अर्थ? चो-या करुन मनुष्य श्रीमंत होतो म्हणून का चोरी समर्थनीय ठरते? अस्पृश्यता ठेवनहि पूर्वी श्रीमंत होते म्हणून का आज अस्पृश्यता ठेवायची? जी गोष्ट अन्याय आहे असें कळलें तिचा त्याग केंलाच पाहिजे. श्री. शिवछत्रपतींनी स्वराज्य मिळविलें. परंतु तें पुढें तसेंच गेलें. कां गेलें? आमचा पायाच खंबीर नव्हता. आमच्यांत उच्चनीचपणा होता. पुढें पुढें तर ग्रामण्यें वगैरेनाच ऊत आला. शिवाशिवी म्हणजे राजकारण झालें ! ' मराठे व इंग्रज ' या पुस्तकांत तात्यासाहेब केळकर लिहितात, '' राज्य टिकवावें असें कोणासच वाटेना. हें राज्य आपलें आहे असें जनतेस वाटेंना. ''
आणि पूर्वी अमूक एक गोश्ट होती म्हणून आजहि ती असूं दें असें म्हणणें वेडेपणाचे आहे. धर्माचा आत्मा बदलत नसतो, परंतु धर्माचे शरीर बदलत असतें. मनुस्मृतीच्या वेळचे समाजाचे कपडे आज चालणार नाहीत. त्या वेळच्या चालीरीती आज कशा राहतील? थंडीत जे कपडे आपण वापरतो ते उन्हाळयांत चालणार नाहीत. सकाळी जे कपडे वापरुं ते भरदुपारी नकोसे वाटतील. '' बदल करा नाहीं तर मरा '' असा सृष्टीचा कायदा आहे. हजारों वर्षांपूर्वींच्या नियमांचे जूं आमच्या मानेवर बसवूं नका. मृताची सत्ता आमच्यावर कशाला? माणुसकीला साजेल तें करुं या.
आज सारें जग आम्हांला अस्पृश्य मानीत आहे. एडिंबरोच्या हॉटेलांत हिंदी लोकांना प्रवेश मिळत नाही. आफ्रिकेंत आमच्याबरोबर अन्याय होत असतात. अशी परिस्थिति आहे. तरीहि आम्ही आपसांत एकमेकांस तुच्छ मानीत आहोंत. जगांत आम्ही गुलाम ठरलों तरी त्याची आम्हांस शरम नाही. शेणांतील किडयांनी एकमेकांस नावें ठेवावी तसेंच हें आहे.
पापें फळावयास कधी कधी हजारों वर्षे लागतात. अस्पृश्यतेसारखीं पापें करुनहि देशांत भाग्य होतें. परंतु त्या भाग्यवृक्षाला आंतून भुंगा लागलेला होता. तो दिसला नाहीं. आणिआज आतां झाड कोलमडून पडलें. तुम्हांला पूर्वीचे भाग्य दिसलें, परंतु त्या भाग्याला लागलेली कीड दिसली नाही. अहंकारांत राहिलेत, आज जगांत पै किंमतीचे झालेत.