काँग्रेसनें करायचें कांही शिल्लक ठेवलें नाहीं. त्या त्या प्रांतांतील जनतेनें अलगच राहायचें ठरविलें तरीहि मान्यता दिली. प्रांतिक सरकारांस शेष अधिकार देऊं केले. एकदां मध्यवर्ती सरकार व प्रांतिक सरकार यांचे अधिकारहि ठरविल्यावर मधूनमधून जे इतर प्रश्न उत्पन्न होतील त्या बाबतीतील अधिकार ते शेष अधिकार. जवाहरलाल म्हणाले, '' अशानें मध्यवर्ती सरकार दुबळें होईल. परंतु तरीहि ऐक्यासाठी मी याला अनुकूल मत देतों. '' काँग्रेसनें आणखी काय करायचे?
पाकिस्तानची योजना अव्यवहार्य वाटते. जिनांचा हा केवळ स्टंट आहे. डॉ. आंबेडकर मध्येंच धर्मान्तराची घोषणा करतात तसाच हाहि एक प्रकार आहे का? अल्पसंख्य लोक नेहमी साशंकच असणार. जासतींत जास्त मिळावे म्हणून ते खटपट करणार. मुसलमान तर बोलून चालून परधर्मी. परंतु ब्राह्मणांना ब्राह्मणेतरांची नाहीं का भीति वाटत? ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर एकाच धर्माचे तरीहि परस्पराविषयी किती साशंकता ! या भांडणांच्या मुळाशी पारतंत्र्य आहें. हे सारे आर्थिक प्रश्र आहेत. नोक-याचाक-यांचे प्रश्र आहेत. काँग्रेस मंत्रिमंडळांच्या कारकीर्दीतच हे वाद विकोपास गेले.
परंतु काँग्रेस स्वातंत्र्यासाठीं लढत आहे. माझ्या एका मित्रानें आपल्या एका मुसलमान मित्रास विचारलें, '' काँग्रेसनें लढा सुरूं केला तर यादवी होईल असें जिना म्हणत. परंतु जातीय दंगा कोठेहि झाला नाही. हें आश्चर्य नव्हे का? '' तेव्हां तो मुसलमान बंधु म्हणाला, '' आज काँग्रेस गोळया खात आहें. फाशी जात आहे. फटके खात आहे. आज नोक-यांचा सवाल नाहीं, मरणाला मिठी मारण्याचा सवाल आहे ! आम्ही बोलून दाखविलें नाही तरी बलिदान करणा-या काँग्रेसविषयीं आम्हांला आदर वाटतो. दिल्लीस गोळीबार झाला तर मुसलमानांनी मशिदीचे दरवाजे उघडून हिंदूंना आंत घेतले. '' असो.
मुसलमानांनीहि स्वातंत्र्य युध्दांत कुरबानी केली नाही असे नाहीं. ३०-३२ सालच्या सत्याग्रहयुध्दांत पेशावर प्रांतांतून १७ हजार पठाण तुरुंगात गेले ! आणि पेशावर प्रांतांची लोकसंख्या फक्त ४५ लाख !! आपल्याकडे झाला नाहीं इतका अपरपार जुलूम तिकडे झाला. त्या लढाऊ लोकांत काँग्रेसप्रेम वाढूं नये म्हणजे सरकारनें कहर केला. परंतु ते शूर अहिंसक पठाण कसोटीस उतरले.