सातशें काळया डागांची कहाणी !
प्रिय वसंतास सप्रेम आशीर्वाद.
हिंदुस्थानचा प्रश्न मोठा बिकट आहे. कुटिल ब्रिटिश मुस्तद्यांनी तो अधिकच बिकट करून ठेवला आहे. हिंदी संस्थानिकांची एक धोंड स्वराज्याच्या मार्गात सदैव उभी असते. हिंदुस्थानांतील हे बहुतेक संस्थानिक म्हणजे जगांतील एक अजब चीज आहे ! त्यांच्या लीला किती वर्णाव्या? किती सांगाव्या?
जगाचा इतिहास पाहिला तर आपणांस असें दिसते कीं साम्राज्यें स्थापन होतात; कांही काळ ती टिकतात; नंतर तीं मोडतात. त्यांचे निरनिराळे भाग स्वतंत्र होतात. रोमन साम्राज्य, त्यापूर्वींचें पर्शियन साम्राज्य, आपल्याकडील मौर्य व गुप्त साम्राज्यें, मोंगल साम्राज्य, मराठी साम्राज्य सर्वांची एकच गति झाली.
हिंदुस्थानांत ब्रिटिश आले तेव्हा मराठे प्रबळ होते. तिकडें पंजाबांत शिखांची प्रबळ सत्ता स्थापन झाली होती. अगदीं दक्षिंणेकडे हैदरअल्लींनें राज्य बळकावलें होते. मधूनमधन लहान लहान राजे अथवा त्यांचे मांडलिक असे वावरत होते. ब्रिटिशांशी तह करुन आपले संस्थान टिकविणारा निजाम हा पहिला संस्थानिक ! हळूहळू ब्रिटिशांची तैनाती पध्दत सर्वांच्या मानगुटीस बसली. ब्रिटिशांच्या कारवाया व आमची आपसांतील भांडणें यामुळें हळूहळू एक एक भाग ब्रिटिशांनी गिळंकृत केला. वेलस्ली, हेस्टिंग्ज व डलहौसी यांनी हिंदुस्थान एका सत्तेखाली आणण्याचें काम पुरें केलें. सार्वभौम सत्ता स्थापन झाली. मधूनमधून संस्थाने काजव्याप्रमाणें लुकलुकत राहिली.
१८५७ साल आलें. असंतुष्ट लोकांचें तें युध्द होतें. ज्यांच्या जहांगिरी गेल्या, पेन्शनें गेंली, संस्थानें खालसा झालीं ते रागावले होते. ' स्वराज्य म्हणजे जनतेचें राज्य ' ही कल्पना त्यावेळेस उद्भूत झालेली नव्हती. तें आम जनतेचें युध्द नव्हतें. असंतुष्ट संस्थानिकांचें, राजेमहाराजे यांचें तें युध्द होतें. परंतु या युध्दांत जर सारे सामील झाले असते तर हिंदुस्थानच्या इतिहासाला निराळी गति मिळाली असती. ग्वाल्हेरचे शिंदे जर लढाईंत पडले असते तर सारे रजपूत राजेहि उठाव करणार होते. ' शिंदे विरुध्द गेले तर आपलें आटोपलें? ' असें कॅनिंगनें कळविलें होतें. कदाचित् राजनिष्ठ शीखहि मग असंतुष्ट झाले असते. परंतु ग्वाल्हेरचा राजा वयानें लहान होता. दिवाणांच्या हातांत सूत्रें होतीं. रावराजे दिनकरराव दिवाण होते. त्यांनीं अल्पवयी राजाला दिल्लीला पाठवून दिलें. दिल्ली ब्रिटिशांनी सर केली होती. ग्वाल्हेर ब्रिटिशांच्या बाजूनें राहिलें. रजपूत रक्त थंड राहिलें. महाराष्ट्रांतील संस्थानेंहि शांत राहिलीं. १८५७ आलें व गेलें ! तात्या टोपे, झांशीची राणी लक्ष्मी अशीं वीर रत्नें चमकलीं. परंतु स्वातंत्र्य दुरावले. परवंशता कायमची जणुं पदरीं आली.