सारांश, हिंदुधर्म हाही विकासवादी व उत्क्रांतिवादी आहे. तो केवळ रूढींची गाठोडी सांभाळणारा हमाल नसून शील व चारित्र्य यांना बनविणारा वीर विश्वकर्मा आहे ही दृष्टी एकदा स्वीकारा आपण निर्माण करणारे आहोत, नवीन नवीन प्रयोग करणारे आहोत, पुढे पुढे जाणारे आहोत, हा विचार मनात खेळवा व मग वृत्तीत काय फरक पडतो ते पहा. हा विचार अंत:करणात असला म्हणजे जुन्या चालीरीती, जुने आचारविचार ह्यांच्यावर हल्ले चढवताना शरमायला नको, नरमायला नको, निर्भीड व निर्भय होऊन आपण जे योग्य नसेल ते बेलाशक पाडू व नवीन जोडू. आपण बाळाने फरक घडवून आणू आता स्वच्छता सांभाळीत बसणे, स्वत:ला केवळ कोपर्यात कुरवाळीत बसणे, हे आमचे कार्य नसून दुसर्यांना आमच्या बाजूस जिंकून ओढून आणणे हे आमचे काम आहे. आम्ही जे जुने भले आहे तेही राखू व जे नवीन चांगले आहे तेही चाखू. जग आमच्याबद्दल काय म्हणते हे नाही अत:पर आम्ही पाहाणार. तर जगाबद्दलचे आमचे मत जाहीर करणार. आम्ही किती राखून ठेवले हा आता महत्त्वाचा प्रश्न नसून आम्ही नवीन किती जोडले हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आमची दृष्टी नवदिग्विजयाची आहे. आम्ही मुमुर्षू किंवा केवल जिजीविषू नसून आम्ही विजिगीषू आहोत. आता गमावण्याचे नावच सोडा; आता अटकेपार झेंडे नेऊन दूरवरच्या प्रांतात स्वार्या-शिकार्या करून लढाया देण्याचे निश्चित केले आहे. आता शरणागतीचा विचार स्वप्नातही मनाला शिवता कामा नये. कारण झगडा सुरू झाला आहे, ठाण मांडले गेले आहे, धनुष्याची प्रत्यंचा चढविली गेली आहे, आता तो दूर दिसणारा जो विजय त्याला गाठल्याशिवाय विश्रांती नाही.
हिंदुधर्मात प्रचंड बदल करून घेण्याची शक्ती आहे. हिंदुधर्म स्थाणू नाही. तो अत्यंत विकासक्षम आहे. नागार्जुन व बुध्दघोष यांना नानात्मता सत्य वाटे, एकात्मता असत्य वाटे. शंकराचार्यांना एकात्मता सत्य वाटे व नानात्मता भासमान वाटे. श्रीरामकृष्ण व विवेकानंद यांना नाना व एक दोन्ही सत्यरूपच वाटतात. समाज व व्यक्ती दोघांना सत्यत्व आहे. समाजाची काळजी न करता मी एकटयाचा मोक्ष पहाणे हेही चूक; परंतु स्वत:ला शुध्द न करता समाजाची सेवा करू पहाणे म्हणजेही चूकच. मी स्वत: शुध्द झाले पाहिजे व समाजाची सेवा केली पाहिजे. नागार्जुन व शंकराचार्य यांचा समन्वय श्रीरामकृष्ण व विवेकानंद यांनी केला. हिंदुधर्मातील तत्त्वांचा आणखी विकास केला. जे तत्त्व कधी एक म्हणून भासले तेच आज एक व अनेक दोन्ही रूपांनी प्रतीत होत आहे. श्रीरामकृष्ण परमहंसांना एक व अनेक दोन्ही सत्य आहेत याचा अर्थ काय? यातील अर्थ एवढाच की, स्वत:चे चारित्र्य व पावित्र्य म्हणजेच आध्यात्मिकता. याच अर्थ हा की, आलस्य व पराजय, कर्मशून्यता व दैन्य म्हणजे संन्यास नव्हे. याचा अर्थ हा की स्वत: एकटे मुक्त होण्यापेक्षा दुसर्यांचा सांभाळ व दुसर्याची सेवा करणे हे अनंतपटीने थोर आहे. याचा अर्थ हा की मुक्तिचा ध्यास सोडणे म्हणजेच मुक्त होणे. याचा अर्थ हा की विजयशाली होणे म्हणजेच उच्च संन्यास होय. याचा अर्थ हा की हिंदुधर्म विजयासाठी, सेवेसाठी, कर्मासाठी आज उठून उभा राहिला आहे. कलंकी अवताराची चिन्हे दिसत आहेत. नौबती झडत आहेत. ताशे वाजत आहेत. कर्मवीरांनो! अरे कर्म म्हणजेच धर्म, सेवा म्हणजेच संन्यास! अरे, कर्म म्हणजेच यज्ञ, विजय म्हणजेच संन्यास! तुमच्यामध्ये जे जे सुंदर आहे व उदार आहे जे जे उदात्त व परमोच्च आहे, जे जे प्रेमाचे व पावित्र्याचे आहे, शौर्याचे व धैर्याचे आहे, त्यागाचे व सत्याचे आहे, ते सारे बाहेर येऊ दे; ते कर्मद्वारा, सेवाद्वारा प्रकट होऊ दे. तुमच्या हृदयातील त्या दिव्यतेला आज आव्हान आहे. आज आमंत्रण आहे. अशा युध्दाला चल की जेथे माघार हा शब्दच माहीत नाही.