आकडमासी एकादशी बुवा चालले पंढरीशीं ।ब्राह्मणाची सखुबाई गेली होती पाण्याशीं ।त्या पानंदी बुवांनी पुंगीचा नाद केला ।सखुबाईला ध्यानं लाविलं देवाचं गंगेवरी ।घागर ठेवूनी सखु निघाली पंढरीशीं ।सखुबाईच्या सोबतिणी घरीं आल्या सांगत सासूशीं ।सून सखुबाईच्या तुमची गेली पंढरीशीं ।सखुबाईच्या सासुला राग आला जाऊनी सांगती  पुत्राशीं ।हातांत काठी लागे पाठीं सखु अडविली रस्त्याशीं ।हाणून मारुन सखु आणली घराशीं ।दोर लाविला खोलीमधीं कोंडून टाकली ।सखुला बांधूनीं लावली कुलपी महामोरी ।अरे भगवंता कमळीकांता दिवस होता निघून गेला ।रात कशी निघून जाईल तुझे पाय केव्हां भेटत्याल ।देवाला संकट पडलं देव आल्यात धांवून ।राहिले सखुच्या समोर उभे ।कासर पडलं गळून कुलूप पडल गळून । घॆतलें देवानं बाधुन ।जा म्हणाला आतां पंढरीशीं ।दुपारचं सोवळं भोजन झालं । सासू हाक मारी स्वैपाकाशीं ।शेजारी सांग सखु तुमची गेली पंढरीशीं ।जाऊन पांच दक्षिणा घातल्या गरुड्पारावरी उभी राहिली ।ठेवलें पायावरी डोकं बघता प्राण सोडला ।ब्राह्मणाची सखुबाई शिव झाली  पंढरीशीं ।आखडमाशीं एकादशी बुवा चालले कर्‍हाडाशीं ।सखुबाईच्या गांवची माणसें सांगत गेलीं सासूसासर्‍याशीं ।सून सखुबाई तुमची झाली शिव पंढरीशीं ।चंदन बेल गोळा केलं सखुबाईला अग्रि दिली । मग निघून घरीं गेली ।रुक्मिणीनं हुबहुबी पत्र पाठविलं विठ्ठलाला ।भयाण दिस पंढरी साधुसंत कष्टी दिसती ।विठ्ठलानं पत्र पाठविलं रुक्मिणीशीं ।जाऊन बस गरुडावरी कुपी भरुन अमृत घे । जाऊन शिंपड सखुवरी ।सखुबाई उठून बसली । चोळी पातळ बोळवण केलं रुक्मिणीनं ।सखु आली शिवपाशी देव भेटले पंढरीशीं ।सखु आली घरासी सासूसासरा बोळबण करतो ।धन्य धन्य सखु सून तूं भाग्याची खरी ।सखु सखु म्हणून आठवूं कुठवरी ।
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel