छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहीली आहे.

संभाजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले चिरंजीव. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर नाव आहे.हे फार पराक्रमी होते. असे म्हणतात की ते एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर शत्रूशी मुकाबला करीत.

संभाजीवर अनेक लेखकांनी चांगले-वाईट लिखाण केले. या लिखाणांत मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या 'छावा ' या कादंबरीचा समावेश होतो.

मृत्युंजयच्या यशाने सावंत ह्यांना आपला सूर गवसला होता. चरित्र लेखन आणि त्यातल्या त्यांत ऐतिहासिक, पौराणिक नायकांचे चरित्र हे त्यांचे क्षेत्र झाले होते. संभाजी महाराज म्हणजे नरशार्दूल होते. एका महान देवता समान पित्याचा एक शूरवीर पुत्र पण आपल्या पित्याच्या सावलींत त्याला आपली अशी ओळख निर्माण करायची होती. संभाजी महाराजांचे चरित्र म्हणूनच लिहिणे सोपे नाही. पण हे शिवधनुष्य सावंत ह्यांनी अत्यंत सक्षम पाने उचलले. 
 

१४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे जन्मलेले संभाजी राजे हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्‍नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. पण तरीही त्यांचा जीवनकाल अतिशय कठीण होता. ते जन्मापासूनच बिकट परिस्थितींत अडकत गेले. मात्र सर्व परिस्थितींशी निकराने सामना करत हा शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनला.

जन्मतःच सईबाईंच्या निधनामुळे आईच्या दुधास मुकलेले शंभूराजे त्यांची दूध आई बनलेल्या पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ, थोरल्या मांसाहेब जिजाबाई ,सावत्र आई सोयराबाई यांच्यात आई शोधू लागले. संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले.अगदी लहान वयातच अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांना मोघलांकडे राहावे लागले,वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी शिवाजी महाराजांबरोबर आग्ऱ्याहून सुटकेचा प्रसंग त्यांनी अनुभवला, संभाजींच्याच सुरक्षिततेसाठी पसरवण्यात आलेल्या 'संभाजीराजांचे निधन ' या खोटया अफवेमुळे त्यांना बराच काळ परक्या ठिकाणी लपून राहावे लागले.इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते.

राज्याभिषेकानंतर अवघ्या १२ दिवसांत झालेल्या जिजाबाईच्या निधनानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज सतत स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले.सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या याच्या सांगण्यावरूनच झाले.अण्णाजी दत्तों- महाराजांचे अमात्य,अनुभवी आणि कुशल प्रशासक पण तेवढेच लबाड , भ्रष्टाचारी. त्यांच्या विरोधामुळे शंभूराजांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले. आपल्याला दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल मात्र संभाजीराजांच्या मनात कायम राहिला.

पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला. उत्तर दिग्विजय मोहीम छत्रपती संभाजी महाराज यांच्या मनात होती यासाठी त्यांनी औरंगझेब चा मुलगा सेहजादा मुअजम याला आपल्या बाजूने करून औरंगझेब ला शह द्यायचा या साठी ते दिलेरखानाच्या छावणीत स्वराज्यावर नाराज असल्याचे दाखवून गनिमीकावा खेळला. या त्यांच्या सोबत त्यांची ताईसाहेब राणू अक्का ही होत्या. अफझलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या बलाढ्य शत्रूंना खडे चारणारे युगपुरुष शिवाजी महाराज घरातील बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले.शेवटी ३ एप्रिल १६८० मध्ये आबासाहेब म्हणजेच शिवाजी महाराजही त्यांना कायमचे सोडून गेले आणि डोक्यावर असलेला मायेचा शेवटचा हातही नियतीने शंभूराजांच्या डोक्यावरून काढून घेतला. या युगपुरुषाच्या अंतिम क्षणी सोयराबाईकडून केले गेलेले कटकारस्थान वाचून तर वाचक स्तब्ध होऊन जातो. त्यानंतर संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले. पण सरनोबत हंबीरराव मोहित्यांनी सत्य स्थिती आणि स्वराज्याला त्या क्षणी आलेली संभाजीराजांची निकड ओळखली आणि संभाजीराजांची बाजू घेतली. आणि १६ जानेवारी इ.स. १६८१ रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला.या सर्व सुखदुखांच्या प्रसंगी संभाजींच्या पत्नी येसूबाईनी दिलेल्या साथीचे सुंदर चित्रण या पुस्तकात केले आहे.

औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. जगातील सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाची कितीतरी उदाहरणे संभाजीराजांच्या कारकिर्दीत झाली .संभाजीराजांनी केलेल्या वेगवेगळ्या स्वाऱ्यांचे व लढायांचे पुस्तकात केलेले जोशपूर्ण वर्णन वाचकास नव्या उमेदीने प्रेरित करते.

पण संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्खे मेहुणे-गणोजी शिर्के काही गावांच्या वतनांसाठी शत्रूला सामील झाले.आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांने केलेल्या संगमेश्वरावराच्या हल्ल्यात संभाजी राजे आपले प्रिय मित्र कवी कलश सहित पकडले गेले. आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. बहादूरगडापासून ते पुढे दोघांच्या मृत्यूपर्यंतच्या ४० दिवसांचे अतिशय हृदयद्रावक वर्णन कथन करणारी या पुस्तकातील शेवटची २० पाने वाचताना वाचकाच्या मनात संताप आणि डोळ्यांत अश्रू नकळत तरळून जातात. ही निघ्रुण हत्या मार्च ११, इ.स. १६८९ रोजी भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे करण्यात आली.पण इतक्या अत्याचारानंतरही संभाजीराजे औरंगजेबासमोर काडीमात्रही नमले नाहीत आणि यातच औरंजेबाचा पराभव सिद्ध झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel