सुधा मूर्ती या इंग्रजी आणि कन्नड भाषेतील एक भारतीय लेखिका आहेत. त्यांनी कादंबरी, तंत्रविषयक पुस्तके, प्रवास वर्णने लघुकथा संग्रह, वास्तववादी लेख, बालसाहित्य अशा विविध विषयांना स्पर्श करणारे विपुल लेखन केले आहे. त्यांच्या पुस्तकांचा अनुवाद सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये केला गेला आहे. सुधा मूर्ती यांना साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी आर. के. नारायण पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले आहे. २००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला. २०११ मध्ये त्यांना कर्नाटक सरकार द्वारे कन्नड भाषेतील साहित्यात उल्लेखनीय कामगिरी साठी अत्तीमब्बे पुरस्कार प्रदान केला गेला आहे. त्यांच्या शाळेगणिक एक ग्रंथालय या कल्पनेनुसार ५०००० ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. इन्फोसिस फौंडेशन मार्फत त्यांनी पूरग्रस्त प्रदेशमध्ये २३०० घरे बांधून दिली आहेत. त्यांनी तामिळनाडू आणि अंदमान राज्यात त्सुनामी, गुजरातमधील कच्छ येथे भूकंप, ओरिसा आणि आंध्र प्रदेश राज्यात वादळ आणि पूर, त्याचप्रमाणे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तींचा यशस्वीपणे सामना केला आहे.