आमचे एक मामा होते. ह्यांना तो सारेगमप कि काय तो लहान मुलांचा गाण्याचा कार्यक्रम फार आवडे. त्यांत हृदयनाथ मंगेशकर हे जज म्हणून असायचे. मग मी ह्यांच्या घरी असले की हे मुद्दाम मला बोलवून "हि लहान मुलगी मग किती छान गाते" असे म्हणून ते ऐकवायचे. मला मग भिडेखातर जबरदस्तीने ते सर्व गाणे वाहवा करत ऐकायला लागायचे. पण त्यानंतर दुसरा कोणी लहान मुलगा आला आणि त्याने खूप छान गाणे म्हटले तर मी मग मामांना बरे वाटावे म्हणून "किती छान गातो ना हा. खूप सुंदर." असे म्हटले तर मात्र मामा एक विशेष हास्य देऊन "अग, तुला आणि मला संगीताचे ज्ञान आहे काय ? आम्ही इथे बसून फक्त मनोरंजन करून घ्यायचे. बरे वाईट आम्हाला काय कळते ?" असे म्हणून माझा तेजोभंग करत असत. कर्णाच्या रथाला शल्याऐवजी ह्यांना पाठवले असते तर कदाचित युद्ध लवकर संपले असते. (इंग्रजीत कंडेंसेंडिंग स्माईल प्रकार आहे मराठीत हा छद्मी हास्य असावा का ? )

सांगण्याचे प्रयोजन हे कि पावलोपावली हि असली मंडळी आम्हाला मिळत असतात. बहुतेक ठिकाणी असल्या माणसांना आम्ही इग्नोर करून पुढे जातो पण कामाच्या ठिकाणी वगैरे असले वादमभटजी मिळाले कि माझा तरी तळपायाचा संताप मस्तकांत जातो. ज्या माणसाने चहाचा स्टॉल सुद्धा आयुष्यांत चालवून पहिला नाही त्याचे मोदींनी देश कसा चालवावा ह्याबद्दल ठाम मत असते. आणि मत असले म्हणून हरकत नाही, लोकं काही बोलतात त्याच्या अगदी उलटंच मत आपले असले पाहिजे असे ह्यांना वाटते. आणि आपले मत इतरांवर लादायचा प्रयत्न. मागे भारतांत आले असता स्टेट बँक शी व्यवहार करण्याची नामुष्की आली. ह्यांनी अक्षरशः रडवले. ३-४ खेटा घालून सुद्धा काम होत नव्हते. ह्यांत आमच्या एक काकी स्वतःहून इन्व्हॉल्व व्हायच्या आणि मला "तू ना एक अप्लिकेशन लेटर कर आणि त्याला आधार जोड आणि त्या अमक्याला जाऊन भेट आणि त्याला असे अश्या पद्धतीने सांग, मग बघ काम कसे पटपटीत होईल" असले अनाहूत सल्ले द्यायच्या. माझी समस्या काय, तो अमुक बँकेत काम काय करतो हे सर्व तिला समजावून सांगण्याची माझ्यात टाकत नसल्याने मी होय म्हणून डोके हलवीत असे. मग काम झाले नाही तर मी तिने सांगितल्याप्रमाणे केले नाही म्हणून झाले नाही असे हि आणखीन दहा लोकांना सांगत असे. "तुमच्या अमेरिके सारखा वेंधळट कारभार नाही हो आमच्या स्टेट बँकेचा, हि मंडळी भारी श्ट्रीत्त आहेत" असे वर ऐकवायचे.

तुम्ही काहीही करा हि मंडळी नेहमीच असंतुष्ट. भारत सरकार पासून झाडावर बसलेल्या कोकिळेपर्यंत सर्वांवर ह्यांचा राग. ह्यांना तुम्ही वैशालीत जेवायला घेऊन गेलात तर हि मंडळी "वाहूमान ची चीज ऑम्लेट हाच खरा ब्रेकफास्ट, हे डोसा वगैरे सकाळी खाणे बरे नव्हे". असे तुम्हाला सांगतील. आणि तुम्ही ह्यांना वाहुमान मध्ये घेऊन गेलात तर "हे नॉन व्हेज ब्रेकफास्टमध्ये खाणे चांगले नाही. ब्रेकफास्ट हा नेहमी शुद्ध सात्विकच असावा" असे सांगतील. ह्यांच्या विरोधांत काही मूळ तत्व वगैरे आहे का हे तुम्ही शोधायला जाऊ नका. कारण ते कधीच नसते. समोरच्याला आपण गप्प केला ह्यांतच त्यांना प्रचंड समाधान आणि त्यासाठी हि मंडळी वाट्टेल ते शोध लावतील. कुणी बाजारांत आईस क्रीम खाताना दिसला तर मुद्दाम जाऊन "अरे हे गोड खातोस ते जास्त खाऊ नको, फार वाईट शरीराला. तो अमक्याचा तमुक ठाऊक आहे ना ? तो असाच रोज एक आईस्क्रीम खात होता मग मधुमेह झाला आणि त्याचा पाय गेला" असे म्हणून त्याच्या आईसक्रिम मध्ये विष कालवत. आणि कुणी बिचारा मोजून मापून खात असेल गोड खाणे टाळत असेल तर त्याला "अरे, पोट असणे हि माणसाची शोभा. उद्या तुम्ही लोकं गणपतीला सुद्धा बेढब आणि अनफिट म्हणाल" म्हणून टोमणा मारतील.

हि मंडळी जो पर्यंत गुड फॉर नथिंग असतात तो पर्यंत निरुपद्रवी असतात. ह्यांच्या स्वभावाला सर्व ओळखून असल्याने ह्यांच्या घरी कोण जात नाही ह्यांच्या मुलीला किंवा मुलाला स्थळे सांगून येत नाहीत. पण चुकून कुणाची सासू ह्या पद्धतीची निघाली किंवा असली माणसे उच्चपदस्थ झाली तर त्यांच्या सुनांचे आणि कर्मचाऱ्यांचे फार हाल होतात.

आपल्या हातून चूक झाली हे मान्य करण्याची क्षमता सर्व लोकांकडे असते पण आपण काहीच बरोबर करू शकत नाही हि हीन भावना आणि लो सेल्फ इस्टिम मात्र असली मंडळी आपल्या खालच्या लोकांच्या डोक्यांत घालतात. सुनेने चहा केला कि "किती वेळा सांगितले चहात आले थोडे जास्तच घाल?", "इतके आले कुणी घालतो का चहांत ? फक्त एक चमचा घालायला हवे होते. हिला चहा सुद्धा करता येत नाही", "हे ताट तू साफ धुतलेच नाही", "देवाचा दिवा लावला म्हणून होत नाही, वात साफ करायला पाहिजे, तू तसे केले नाहीस म्हणून तो विझला", "जेवण वाढताना नेहमीच आधी थोडे वाढावे, पाहुणे घेतील हवे असेल तर आणखीन, उगाच अन्नाची नासाडी नको", "भजी आवडतात म्हणून ठाऊक आहे ना अमुकला आणखीन २ वाढ बघू आधीच, त्यांना नको वाटायला कि आपण कंजूष आहोत". अश्या प्रकारच्या टोमण्यांनी लोकांचे सेल्फ एस्टीम हळू हळू कमी होत जाते आणि हे मी अनेकवेळा पहिले आहे. टोमण्यांना प्रत्युत्तर देण्याची शक्ती नसल्याने व्यक्ती समोरच्या माणसाला खुश (अपीज) करून टोमणे टाळण्याचे काम करू पाहते आणि तिला ते जमत नाही कारण काहीही केले तरी टोमणे येतातच. आणि हळू हळू त्या माणसाचा आत्मविश्वास खचत जातो.

गोव्यांत एक लग्न होते म्हणून मी गेले होते. त्या दोन तीन दिवसांसाठी एक गाडी पाहिजे होती म्हणून मी कुणाला तरी सांगितले. त्याने आपली गाडी दिलीच आणि एक ड्रायवर सुद्धा पाठवला. ह्याची जबाबदारी दिवसभर माझ्यासोबत राहून मला वाट्टेल तिथे फिरवायचे. आणि तसा सुशिक्षित होता आणि बोलायला वगैरे चांगला होता. आणि मी इकडे खरेदी, तिकडे कुणाला भेटणे वगैरे असली कामे करून संध्याकाळी घरी परतायचे. ह्याला लंच साठी २०० आणि डिनर साठी ५०० द्यायचे, त्याशिवाय दिवसाचा पगार वेगळा. एक गोष्ट मला आधी लक्षांत आली नाही ती म्हणजे हा गाडी चालवताना मला अनेक गोष्ट सांगायचा. राजकारण, अर्थकारण वगैरे वगैरे आणि हा जे काही म्हणायचा त्याला मी "मूर्खाशी वाद घालू नये" न्यायाने होकार द्यायचे. म्हणजे "गुगल मॅप्स मूर्खपणाचे आहेत, भारताने असल्या गोष्टींवर बंदी घातली पाहिजे", "अंबानी जिओ द्वारे लोकांना कँसर देईल" आणखीन काय काय. ह्याला वाटायचे दीदीला आपली विद्वत्ता मान्य आहे.

लग्न समारंभ संपला आणि लग्नानंतर जी सारवासारव असते ती सुरु झाली. ह्यांत कुणी तरी मला रिक्वेस्ट केली कि अमुक फ्लॅट मध्ये एक मोठी पेटी आहे ती माझ्या गाडीत घालून मी अमुकला नेवून द्यावी आणि फ्लॅट ची चावी वाटेवर मूळ मालकाला परत करावी. गाडी मोठी असल्याने हे शक्य होते. त्यामुळे मी ह्या ड्रॉयव्हरला घेऊन गेले आणि त्याला विनंती केली कि जरा हि पेटी गाडीत ठेव. हा शेवटचा दिवस होता आणि मला रात्री गाडी सुद्धा परत करायची होती. तर हा माणूस म्हणतोय काय तर "नाही दीदी, ह्या पेटीने डिकीला मार लागेल, गाडीची जबाबदारी आपल्यावर आहे" , "अरे गाडी मी अमुकला रिक्वेस्ट करून आणलीय ना ? मी त्यांच्याशी बोलून भरपाई देईन काही झाले तरी. तू फक्त पेटी ठेव." तर हा हट्टालाच पेटला तुम्ही जाल अमेरिकेला परत, आम्हाला इथे साहेबांशी दररोज भेटावे लागेल वगैरे. मी बारकाईने विचार केला तरी त्याच्या वादांत मला तर्क जाणवला नाही. मी कार मालकाला फोन लावला. तो बीजी होता. आणि ह्या दरम्यान हा ड्रायवर सतत बडबडत होता जणू काही गाडी चालवून ह्याने उपकार केला होता. काही क्षणांनी माझे डोके शॉर्ट झाले. मी आंत गेले, पेटी उचलली (पेटी रिकामीच होती). मेटल ची होती आणि हिला शार्प कॉर्नर्स होते. ती मी बाहेर घेऊन आले, ह्याला थांबवले आणि चार चौघांपुढे ह्याला सांगितले "हि पेटी मी गाडीत ठेवणार आहे. आणि मला थांबवण्याचा प्रयत्न केलास तर इथे सर्व लोकांपुढे श्रीमुखांत खाशील". हे सर्व शब्द त्या वेळी माझ्या रंगाच्या भरांत तोंडून आपोआप निघाले, त्यांत तर्क नव्हता आणि प्लॅनिंग करून बोललेले ते शब्द नव्हते. ह्याला तो काय रिऍक्शन देईल मला कल्पना नव्हती. पण पुढे जे काही घडले तो माझ्यासाठी आयुष्यांतील एक महत्वाचा धडा ठरला. तो म्हणाला "नको दीदी, तुम्ही कशाला उचलताय ? मी उचलून ठेवतो" असे म्हणून त्याने ती पेटी उचलून गाडींत नेवून ठेवलीच वर मला व्यवस्थित सोडून धन्यवाद देऊन तो घरी गेला.

माझे एक अमेरिकन मित्र आणि मी मुंबईत फिरत होतो तेंव्हा त्याने अनेक लोकांना खाऊन कचरा रेल्वेच्या खिडकीतून बाहेर फेकताना पहिले. मी त्याला सांगितले कि ट्रॅक लोक साफ वगैरे करतात, बहुतेक चहाचे कप प्लास्टिक नसल्याने कुजून वगैरे जातात. पण त्याचे निरीक्षण वेगळेच होते. "तो म्हणाला कि अश्या प्रकारे कचरा वगैरे बाहेर फेकणे ह्यामुळे जी गल्लीच्छता निर्माण होते त्यांत एव्हडे वाईट नाही. वाईट अश्याचे आहे कि जी मंडळी बिनधास्त कचरा फेकतात त्यांना इतर लोकांची अजिबात पर्वा नाही, अशी मंडळी चुकून सत्तेच्या पदावर पोचली आणि ह्यांच्या खाली काही लोक असतील तर त्यांची अजिबात पर्वा हि मंडळी करणार नाही. मला त्याचेच वाईट वाटते". त्याचे निरीक्षण बरोबर आहे कि नाही मला ठाऊक नाही पण त्या दृष्टिकोनातून मी ह्यावर विचार केला नव्हता.

तसेच माझे एक दूरचे काका होते. ह्यांना पत्रे वगैरे पाठविण्याचा खूप छंद. विशेष करून फुकट सॅम्पल्स मागवणे, कुठल्या तरी दूरच्या मंदिराला पत्र पाठवून त्यांचा प्रसाद मागवणे इत्यादी. पण पत्रे लिहायची मी, पोस्टांत जाऊन पाठवायची मी, हे फक्त पैसे द्यायचे आणि काही प्रतिसाद आला नाही तर मग दोष माझ्यावर. तू पत्ता ठीक लिहिला नसशील, पिन कोड चुकला असेल, रिटर्न पोस्टेज पाठवले नसेल इत्यादी. त्यानंतर ह्यांची पत्रे मी सरळ नदीत फेकून देत असे. ह्यांनी कळस केला म्हणजे एकदा वर्तमानपत्रांत एका छोट्या कंपनीची जाहिरात आली. ५०० रुपयांत कॉर्डलेस फोन. त्याकाळी हा फोन १००० रुपये तरी असायचा. मी ह्यांच्या घरी गेले असता ह्यांनी मला एकदम कॉर्नर केले. ह्या नंबरवर जरा फोन कर आणि विचार ३०० रुपयांत देतील का ? ६ फोन घेईन म्हणून सांग. मी फोन केला, दुसऱ्या बाजूला सभ्य वाटणारी शुद्ध मराठीत बोलणारी व्यक्ती होती. मी त्यांना मी जाहिरात पहिली आहे वगैरे सांगितले, माझ्या आवाजावरुन कुणी तरी लहान मुलगी आहे हे त्यांनी ताडले असेल त्यामुळे मला ते जास्त सिरियसली घेत नव्हते. मग मी त्यांना "देण्याचा भाव" विचारला त्यांनी मग ५०० रुपया पेक्षा एकही रुपया कमी होणार नाही असे सांगितले. मग मी फोन ठेवून काकांना सर्व घटना सांगितली (काकांना कानाने कमी ऐकू येत असे). हे कुत्सित पणे हसले आणि वरून "अग त्याला फोन करून सांग, चायनावाले २५० रुपयांत विकतात ह्याला ३०० मध्ये विकायला काय झालेय?" मला वाटले काका विनोद करत आहेत. पण ह्यांनी फोन डायल करून माझ्या हाती रिसिव्हर दिलाच. माझा निरुपाय होता. मी प्रचण्ड घाबरून काकांनी सांगितलेला चायना वाला डायलॉग त्या पलीकडच्या व्यक्तीला सांगितला. आता त्याला वाटले कुणी मुलगी प्रॅन्क कॉल करून विनाकारण त्रास देत आहे. मग त्याने मला प्रचंड सुनावली आणि वरून "चायना चा माल २५० मध्ये तुम्हाला मिळत आहे तर मग १०० पीस माझ्या दुकानावर पाठवून द्या मी तुम्हाला ३०० रुपये देतो आणि वरून ५०० रुपयांचा कॉर्डलेस फोन फुकट देतो असे सांगून फोन आदळला". मग काकासाहेबांनी मी त्याचे शब्द जश्याचे तसे सांगितले. पण ह्यांचा चेहेर्यावरील सुरकुत्या हल्ल्या नाहीत. "तुला बोलायला जमत नाहीस. तू अगदीच वेंधळी आहेस" मी दाखवतो बघ तुला म्हणून त्यांनी कानाचे मशीन लावले. ह्यांनी कानाचे मशीन लावणे म्हणजे कुणा ग्लॅडिएटर ने तलवार वगैरे खोचण्यासारखे होते. मग फोन करून त्याच्याशी तासभर हुज्जत घातली. मी अमुक, तमक्याचा तू नातू ना वगैरे ओळखी काढल्या. आता वयोवृद्ध व्यक्ती आहे म्हटल्यावर त्या माणसाने थोडा आदर दिला असेल पण फोन काही ३०० रुपयांना काय पण ४९० ला सुद्धा दिला नाही. मग फोन ठेवून काका "ह्याला धंदा करायला येत नाही" असे मला सांगू लागले. मी मग हळूच काही कारण देऊन पोबारा केला.

मग काही वर्षांनी मला गाडी चालवायला जमू लागली लायसन चे वय झाले असल्याने लायसन मिळाले आणि ह्या काका साहेबाना घेऊन मी कुठे तरी निघाले होते. तर हे मला, इथून साईड मार, तिथे सिग्नल नाही दिलास, अमुक रोड शॉर्टकट आहे असे सांगून वीट आणू लागले. मग मी शांत पणे काकांना "अहो काका, मला सिनियर डायरेक्टर ऑफ ड्रायविंग डिरेक्शन नको आहे हो, साधा गाडी चालवणारा ड्रायवर हवा आहे. तुम्ही चालवता तर मग मी साईडला लावते" मग ह्यांनी हसून वेळ मारून नेली आणि पुढील रस्ता तोंड बंद करून बसले. (माझ्या अनेक पुरुष मित्रांनी हा डायलॉग त्यांच्या पत्नीवर यशस्वी पद्धतीने मारला आहे, किमान ते तरी तसे सांगतात). आमच्या इथे एक कंपनी आहे जिथे सर्वच लोक डायरेक्टर आहेत. रिसेप्शनिस्ट चा पोस्ट आहे "डिरेक्टर ऑफ फर्स्ट इम्प्रेसशन्स".

पण ह्या सर्वांवर कडी करणारा माणूस म्हणजे माझा कजन, मामेभाऊ रवी. माझ्या पेक्षा साधारण १० वर्षांनी मोठा पण विविध विषयांत आमचा रस सारखा असल्याने आमचे चांगले जमायचे. मग प्रौढ झाल्यानंतर ह्याला एक सरकारी नोकरी लागली. पण ह्याला वेध धंद्याचे. मी एव्हाना शिकून पैसे कमवायला लागले होते आणि मला त्यामानाने लठ्ठ पगाराची नोकरी होती. पण नोकरी करणे आणि बॉस वगैरे असणे ह्याला मी उंदराची शर्यत मानत असल्याने नोकरी कधी सोडावी हाच विचार मनात होता. मग हा मला आयडिया द्यायचा. अमुक माणसाने तमुक व्यवसायांना भरपूर पैसा केला आहे. आम्हीही तेच करूया. पहिला धंदा आईस्क्रीम चा, त्या काली नॅच्युरलस नावाची एक देशी फ्लेवर चे आईस्क्रीम देणारी कंपनी बरीच विख्यात होती. मग मी ज्या कुणाकडे फ्रॅन्चाइसी आहे त्यांच्याकडे बोलून वगैरे पहिले. त्या धंद्यांत विशेष फायदा होता असे वाटले नाही. पण रवी ची तर्हाच न्यारी. तो काहीतरी तर्क देऊन ह्यांत प्रचंड पैसा आहे असे छातीठोक पणे सांगायचा. मग आम्ही बिसनेस प्लॅन करून भांडवल उभे करण्यासाठी प्रयत्न केले. म्हणजे काय तर मी प्लॅन्स करायचे आणि हा आपल्या मोठ्या उद्योगपती मित्रांशी बोलून भांडवल आणेल असा प्लॅन. ह्याच्या मते आईस्क्रीम चा धंदा अत्यंत सोपा. आधी आपण नॅच्युरलस ची फ्रॅन्चायजी घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला आपले फ्लेवर विकायचे. पण फ्लेवर विकायला आपली फॅक्टरी पाहिजे, त्याच्यासाठी एक डझन लायसन लागतील, फ्लेवर्स निर्माण करायला त्यांत गती असलेले लोक लागतील, कोल्ड स्टोरेज पाहिजे, ब्रॅण्डिंग पाहिजे. म्हणजे सीताफळ चिकू फ्लेवर चा एक कप आईस्क्रीम करायला किमान १०-१५ लाख रुपये तरी खर्च होतील. आता ह्यावर मी बऱ्यापैकी अभ्यास केला असताना कुणी तरी जमीन विकून कोट्यवधी रुपये दलाली कमावले. हे रवीने ऐकतांच, रवी अचानक रियल इस्टेट करायला गेला. 'सोपे आहे, कुणाची तरी जमीन दाखवायची, इथे विहीर आहे, तिथे भूजल आहे, तिथे चार झाडे आहेत वगैरे" डील झाली तर ५% ते १०% आपले. मी ह्यांत सरळ हात वर केले. रवीने मात्र ह्यांत धडपड केली. मुंबईहून पार्टी अली तर ह्यांना होटल मध्ये ठेवून त्यांचा सर्व खर्च दलालाने करायचा अशी परंपरा होती. हीं मंडळी मग दारू चिकन खाणार, जमीन पाहून परत जाणार आणि बिल मात्र दलालाने भरायचे. हे सर्व इंटर्नल गोष्टी समजल्या तेंव्हा रवीने ह्यांतून अंग काढून घेतले आणि लाखभर रुपये खर्च झाले होते. जो न देखे रवी, वो देखे कवी म्हणतात पण आपला रवी मात्र अगदीच आंधळा होता. मग त्याने सोशल नेटवर्क, रियल इस्टेट ऍप्प, आणखीन किमान २०-३० विविध बिसिनेस आयडिया "ह्यांत भरपूर पैसा आहे" म्हणून मला खपविण्याचा प्रयत्न केला. मी सुद्धा मग जुना मित्र म्हणून ह्याला थोडे ह्युमर करायचे. ह्याला ते सर्व खरेच वाटायचे. मग हा लगेच "काम कधी सुरु करूया ? ह्या वेळी नक्की झोकून देऊया" म्हणून सांगत असे.

मी काही गोष्टी नोटीस केल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे ह्या माणसाला कुठल्याही गोष्टीतील छुपी कॉम्प्लेक्सिटी दिसत नाही. हा फक्त सर्फेस पाहून निष्कर्ष काढतो. तुम्ही घरी चहा करता म्हणून चहाचा स्टॊल बाहेर लावून तुम्ही पैसे कमावणार असे नाही. तो धंदा करायला विविध प्रकारची स्किल लागतात. कदाचित मेहनतीने तुम्ही शिकाल सुद्धा पण आपल्या बेडरूम मध्ये राहून "चहा विकणे सोपा धंदा आहे" असे म्हणजे माझ्या मते चुकीचे आहे. रवीचे तसेच होते. हा हिमनगाचे टोक पाहून तोच सगळा हिमनग म्हणायचा. यश मिळण्यासाठी प्रचंड मेहनत पाहिजे आणि प्रचंड लक पाहिजे हे त्याच्या खिजगणतीत सुद्धा नव्हते. मग जे काही आमचे मित्र यशस्वी झाले त्यांना हा नावे ठेवायचा, अजून ठेवतो. त्याने कर बुडवून पैसा केला, त्या अमुकच चा धंदा खोटारडेपणाचा. मला तसली खोटेपणा जमत नाहीत म्हणून मी मागे. तो राजकारण करून पुढे गेला, मी खूप प्रामाणिक म्हणून मागे पडलो इत्यादी. आमचे मित्र यशस्वी झाले, त्यांची भरभराट झाली म्हणून मला आनंद आहे असे कधीच त्याच्या तोंडून ऐकायला आले नाही. हल्ली रवी बिटकॉईन च्या धंद्यांच्या नादी लागला आहे.

पण रवी ला "नाही" कसे म्हणावे ह्यावर मी विचार करत असायचे आणि मला एक छान युक्ती सापडली. काही वर्षांत चांगली भरभराट होऊन माझी स्थिती "मी हा चेक लिहून देऊ शकते पण ह्यावर काम करण्यासाठी वेळ नाही" अशी झाली होती (देवकृपेने). त्यामुळे रवीने काहीही आयडिया आणली कि मी मग, "रवीदादा आपली आयडिया जबरदस्त आहे, माझ्याकडून हा पाच लाखांचा चेक तुमच्यासाठी. तुम्ही एक काम करा, आधी आपली प्राईव्हेट लिमिटेड रजिस्टर करा. मग मी भांडवल म्हणून चेक पाठवते. आणि पहिला चेक माझाच. नाडकर्णी CA आहेत ना त्यांच्याशी मी बोलते. एकदा कंपनी रजिस्टर झाली कि मग आपण बसून पुढील स्टेप डिस्कस करू". हि माझी युक्ती भूतो न भविष्यती अशी यशस्वी झाली. रवी दादांनी कधीच म्हणजे कधीच माझे पांच लाख रुपये घेतले नाहीत कारण मुळांत CA कडे जाऊन कंपनी रजिस्टर वगैरे करण्याचे कष्ट घेण्याची कुवतच ह्यांच्याकडे नव्हती. कारण हे CA कडे जायला निघाले तर वाटेत आणखी कुणाला पाहून ह्यांच्या डोक्यांत नवी आयडिया. (ह्यांनी खरोखरच कंपनी रजिस्टर केली असती तर मी खरोखरच चेक दिला सुद्धा असता).

ह्यांच्या नादांत एका व्यक्तीशी ओळख झाली. एका सरकारी हाफीसांत चांगल्या पदावर हि व्यक्ती होती. काही तरी स्कँडल झाले आणि वरिष्ठानी खापर ह्याच्या डोक्यावर फोडले आणि सरकारने ह्यांना पदच्युत केले. पण ह्यांच्या ओळखी बऱ्याच होत्या आणि वरिष्ठ मंडळींना हांच्याविषयी बरीच सहानुभूती होती. पण ह्यांच्याकडे भांडवल नव्हते. भारतांत काही धंदे असे आहेत जिथे पाय ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला किमान १० सरकारी हाफिसातून परमिशन हव्या असतात आणि हे सर्व मिळवण्यासाठी ५ वर्षे सहज निघून जातात. पण एकदा आपण आंत पोचलात कि मग तुम्हाला १००% नफा आणि तो सुद्धा काहीही काम न करता (काम तुम्ही आऊटसोर्स करून निव्वळ दलाली खाऊ शकता). उदाहरण म्हणजे APMC मंडईतील पोर्टर. ह्याला लायसन्स आहे म्हणून हा पैसे खातो प्रत्यक्षांत माल उचलणारे लोक वेगळे. तर हि जी व्यक्ती होती तिने बरीच मेहनत करून काही केंद्रीय सरकारी परमिशन घेतली होती. आता फक्त राज्य सरकारकडे परवाना घेणे जरुरीचे होते आणि त्यासाठी साधारण ५० लाख रुपये खर्च होता (वकील,सरकारी अधिकाऱ्यांची लांच, स्थावर संपत्ती इत्यादी) ह्या ५० लाख पैकी साधारण २५ लाख डिपॉझिट म्हणून राहणार होते. ह्या व्यक्तीने आधीच ३ वर्षे खर्च केली होती आणि ह्याच्या फाईलला वरिष्ठ अधिकारी १००% पास करणार होते. त्यामुळे एकदा परमिशन मिळाले कि तीच कंपनी कुणा उद्योगपतीला आम्ही ३ पट पैश्यांत सहज विकू शकलो असतो. नाहीतर वर्षाला किमान ५-१० लाख रुपये फायदा तरी सहज झाला असता. मी ह्या माणसाची ओळख रवीशी करून दिली. आणि रवी जितके पैसे टाकेल त्या प्रत्येक रुपयाला मी मॅच करेन असे आश्वासन सुद्धा दिले. ह्या व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि कनेक्शन्स आणि आमचा पैसा असे समीकरण होते. त्याशिवाय हि व्यक्ती आपला रिटायरमेंट सेविंग्स ह्यांत टाकत असल्याने ती खूप मोठी रिस्क सुद्धा घेत होती आणि हे मी सर्व रवी साठी करत होते.

पण पहिल्या मिटिंग मध्ये ज्या धंद्यावर बोलणे सुरु झाले ते रवीने काही मिनिटांत दुसऱ्या धंद्याच्या "आयडिया' वर नेले. मग रवी "आपण सहकारी बँक काढू" अशी आयडिया घेऊन आला. त्यांनंतर सहकारी बँक चालवता चालवता आपण फर्निचर भाड्याने देण्याचा धंदा करू वगैरे बराच भरकटला. मी अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला तरी मग रवी काही ऐकत नाही म्हट्लायवर मिटिंग बंद झाली आणि मला पश्चात्ताप झाला. शेवटी रवीने पैसे टाकले नाहीत पण रवीच्या एका मित्राने ३० लाखांचा लाखांचा चेक दिला आणि लायसन वगैरे मिळवून त्यांनी कंपनी एका गुजराती व्यापाऱ्याला विकली. बसल्या जागी ५० लाखांचे साधारण अडीच कोटी झाले. मी रवीला ह्या धंद्यांत गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला पण त्याचे म्हणणे "फक्त परमिशन पाहिजे तर हा कशाला पाहिजे आम्हाला ? आम्हीच फॉर्म वगैरे भरून करू ना ?"

फालतू सल्ले देऊन आपणच विद्वान अशी मंडळी गावांतच नाही तर सगळीकडे आहे. फक्त काय गावांत भीड मुरवत ठेवून अश्या लोकांना त्यांची जागा दाखवणे जड जाते. त्यामुळे अश्या लोकांना सहन करीत जगावे लागते. पण अश्या लोकांशी जर तुम्हाला वाद घालायचा असेल तर जिथे ह्यांचे तोंड आहे तिथे ह्यांना पैसे गुंतवायला सांगा, ह्यांची शेपूट आपोआप खाली जाते. अपवाद फक्त तेंव्हा जेंव्हा ह्यांचे पद ह्यांना अमर्याद सत्ता देते म्हणजे घरांत, सासू, वडील, आजोबा, गांवांत सरपंच, शिक्षक, मुख्याध्यापक अशी मंडळी ह्या टाईपची निघाली कि मग लोकांचे आयुष्य बरबाद करून ठेवतात.

तुम्हाला अश्या लोकांचा अनुभव आहे का ?

आपली उत्तरे आम्हाला इमेल द्वारे सांगा किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा.

https://t.me/joinchat/D4l9sxX81CZJgVM7da_Vjw

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel