व्यक्तीत्व आणि व्यक्तीमत्व या दोन वेगवेगळ्या संकल्पना यात व्यक्तीत्व सजीवाचे अस्तित्व तर व्यक्तीमत्व माणसाचे शील व चारित्र्य दर्शवते. व्यक्ती च्या चारित्र्यात संयम, त्याग, करुणा ,प्रामाणिकपणा या सर्वाचा विकास होतो तो त्याच्या कुटुंबापासूनच, यात आई, वडिल ,भावंड ,इतर नातेसंबधातील व्यक्तींच्या वर्तनाचा परिणाम व्यक्तीमत्वावर होतो कुटुंबातच व्यक्तीमत्वाचा घाट तयार होतो तिथेच खरे व्यक्तीमत्व फुलते बहरते मानवी जीवनात कुटुंबाचे स्थान अतिशय महत्वाचे ठरते.आयुष्याची सुरुवात आणि शेवट हे किनारे तो कुटुंबाच्या साक्षीनेच गाठतो. जीवनाच्या मधल्या प्रवासात घडणाऱ्या चांगल्या वाईट प्रसंगात कुटुंबातील उत्तम सुसंवादामुळेच उभे राहण्याची ताकद मिळते.
माणूस म्हणजे नुसते पोट नाही त्याला मन भाव भावना आहेत मनाला आनंद देणारे क्षण त्याला कुटुंबापासूनच मिळतात. कौटुंबिक प्रेम , जिव्हाळा , आपल्या अंगच्या कलागुणांचे कौतुक होणे त्याची दखल घेतली जाणे हे सुखी जीवनाचे आधारस्तंभच घरातील सदस्यांमधे निकोपता पारदर्शकता असेल तर हे शक्य होते.
एकमेकांना समजून घेणारे प्रोत्साहना ची थाप देणारे चुकीच्या गोष्टींना समर्थन न देता कान उघाडणी करणारे आपले कुटुंब . आपला आत्मा प्रत्येक क्षणांचे साक्षीदार.....
..मग त्यात बोटाला धरुन चालायला शिकवणारी आई आजही चालताना आयुष्यातल्या एखाद्या निसरड्या वाटेवर अजून तेवढाच तसाच आधार देते .काळ बदलला तरी तिचा आपलेपणा तोच आहे आईचे स्थान अनन्यसाधारण तिच्याशिवाय आपले अस्तित्व शून्यच ...
आईप्रमाणेच सतत कणखरपणे आधार देणारे वडील नकळत आपल्या पुढील जीवनाची पुंजी जमा करतात कर्तव्याची परिसीमा असणारे बाबा आयुष्यात आपला रोल अजूनच मजबूत बनवतात .त्यांच्या मनातील प्रेम त्यांच्या शब्दात नाही तर डोळ्यात पाहता येते दुसरा आधारस्तंभ...
इतरही नाती आपल्याला अनेक गोष्टींमधे मदत करतात प्रोत्साहन देतात आपल्या आयुष्याची जडणघडण करतात नव्हे त्यांनी ती करावी असे आग्रही असायला ही हरकत नाही ....आपल्या ढासळत्या काळात देखील आपल्या पाठीशी उभे राहते ते कुटुंबच...पण आजकाल या गोष्टी फारच दुर्मिळ होत चालल्यात सुसंवाद नव्हे केवळ एक जीवघेणा सोपस्कार होत चालल्यात .
कुटुंब आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांचे साक्षीदार असते .पहिल्यांदा पिता होण्याचा आनंद , पहिल्या नोकरीचा आनंद, सप्तपदीच्या वेळेस प्रथम सहचारी चारिणीचा हात हातात घेतो तो या कुटुंबाच्या साक्षीनेच हे सर्व कुटुंबातील सदस्यांच्या साक्षीनेच घडते
कौटुंबिक वातावरण चांगले लाभले तर यशाचे शिखर गाठणे सोपे जाते ." मी कोणासाठी तरी आहे " माझे कुणीतरी आहे " ही भावनाच दहा हत्तींचे बळ देते .पण नात्यात पारदर्शकता सुसंवाद असेल तर प्रेमाची देवाणघेवाण सहज शक्य होते.
कुटुंबातील पेरलेले प्रेमाचे बीज आधाराचे मोती बनून फुलते व त्याचा जीवनरुपी हार आयुष्यभर आपल्याला साथ देत राहतो .प्रत्येक नात्याची किंमत कळणे मात्र गरजेचे...मग ते आई-मुलाचे, पती-पत्नीचे, नणंद-भावजय, सासू-सून असो जसे फुलाचे सुंगधाशी नाते तशीच ही सर्व नाती प्रेमाच्या सुगंधाने दरवळत राहतील निकोपता असेल तर सुंदर गजरा तयार होईल त्यातील सुगंध आपल्याला सतत प्रेरणा देत जगण्याचे बळ देत राहील.
शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय हो आपण कुणासाठी जगतो आपल्या कुटुंबासाठीच ना! कुटुंबाचा अविभाज्य सहभाग आपल्या आयुष्यात आहे ही जाणीव ही खूप आधार देते मात्र पुन्हा तेच नात्यात पारदर्शकता हवीच...नात्यात जरी कटुता असेल तरी तुमच्या वृत्तीत शुद्धता हवीच दुजाभाव नसावा तरच हा नात्यांच्या प्रेमाचा सुगंधरुपी गजरा सतत मोहरत राहील ...
नाती फुलासारखी असतात त्यातील समतोलही साधता यायला हवा.घट्ट धरुन ठेवली तर कोमेजून जातील सैल सोडली तर उडून जातील.हळूवारपणे जपली तर आयुष्यभर साथ देतील पण त्यातही काही नाती शहरासारखी गजबजलेली असतात गरज असेल तरच समोर येणारी नाहीतर खिडकीतून मजा बघणारी अशी नाती आत्मविश्वास कमी करतात. नाती जपण्याची जबाबदारी कुटुंबातील नात्यातील प्रत्येक व्यक्ती ची ठरते तरच कुटुंब आपला खरा आधार बनतील .कुटुंब कस्तुरीसारखी भूमिका बजावतात त्याचा सुगंध दरवळत राहतो....कुटुंबच आपले खरे आश्रय स्थान ...!!!
एकत्र कुटुंब पद्धतीत एका नात्याला अनेक पर्याय उपलब्ध असल्याने एखाद्या नात्यात कटुता घेतली जाते त्याचा परिणाम व्यक्ती च्या संपूर्ण जीवनावर नकळत होवू शकतो हे कुटुंबातील व्यक्तींना कळत नाही कुणाच्या तरी दुःखाचे भागीदार होवू नये ही कधी कधी नकारात्मक बाजू ही कुटुंबातील विसंवादामुळे निर्माण होते ह्याचा विचार ही सकारात्मकता दाखवून सुसंवादाने व्हायला हवा तरच कुटुंबसंस्थेवरचा विश्वास वृद्धींगत होण्यास मदत होईल.
कुटुंब म्हणजे जे .....
*माझ्या आनंदात दुःखात माझ्या बरोबर असते . माझ्या विजयात माझ्या पुढे .माझे कुटुंब माझा विश्वास ..
*कुटुंबाशिवाय मी अपूर्ण आहे तरुण असताना ते माझ्याबरोबर तर एकटे असताना माझ्यापाशी होते माझ्या अंताचे ही माझे कुटुंबच साक्षीदार ..!!!
.कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी त्याचे महत्व जाणीव तर आता या कोरोना महामारीनेही करुन दिली आहे "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या घोषणेनेही ती अधोरेखित केली.असेही म्हणता येईल ...!!
नात्यात कटुता मैत्री त स्वार्थ कर्तव्यात कसूरता असली तरी वृत्तीत शुद्धताच हवी नव्हे असावी हा सदविचार कुटुंब या जाणीवेला बळकटी देतो असेच म्हणता येईल..!!!
माझे कुटुंब माझ्या जगण्याचा खरा आधार .अशीच भावना सगळ्याची असते यात सगळ्यांचे योगदान असतेच असावे ही अपेक्षाच गृहीत' , घरातील मोठ्या व्यक्ती कडून एकमेकांना बांधून ठेवण्याचे काम होणे गरजेचे तरच ते माझे कुटुंब वाटेल खरा आधार नक्कीच वाटेल . हो पण हे ही खरेच सोबत कितीही लोक असले तरी शेवटी संघर्ष स्वतःलाच करावे लागतात म्हणून अडचणीत आधार देणारे कुटुंब पाठीशी आहे ही नुसती पारदर्शक भावना ही मनाला उभारी देतेच हा विश्वास कुटुंब संकल्पनेतून मिळू शकतो तेव्हा कधीकधी स्वतः लाच भक्कम बनवावे हेच योग्य " सध्या च्या कोरोना काळात एकमेकांना हाच विश्वास देण्याची गरज आहे ती पूर्ण होते ती या कुटुंबातूनच.... कुटुंब या संकल्पनेविषयी मांडण्याचा एक प्रयत्न ....!!!
©मधुरा धायगुडे