ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं लोकांचे राज्य होतं . त्यात अनेक विचारांची माणसं आनंदाने राहत होती सगळं मंगल छान होतं एके दिवशी काय झालं एक छोटासा विषाणू या पृथ्वीवर अवतरला अन् अचानक या आनंदी लोकांवर अन्याय करु लागला सगळ मंगल हळूहळू अमंगल व्हायला लागलं जनता काळजीत पडू लागली रोजचं जगणंच अवघड व्हायला लागलं हा विषाणू कुठून कसा आला यावर
प्रमाद होवू लागला इकडे काही जणांनी विचार केला याला घालवण्यासाठी काय करावे बरे....!! असा विचार करु लागले अन् एक दुवा मिळाला अचानक असंख्य दिव्यांचा लखलखाट करुन अंधाराच्या शांततेत प्रकाशाकडे घेवून जाणारा एखाद्या मार्ग दिसतो का यासाठी सगळ्यांनी दिव्यांकडे प्रार्थना केली अन् या कोरोनानामक राक्षसाला आमच्या आयुष्यातून जावू देत अशी विनंती केली...नैराश्यावर मात करण्यासाठी ची ही आगळीक..
दुसरे दिवशी काहींनी निंदा केली,तर काहींनी घरांतून या विषाणुला घालवून देणेचा रोजचा नेम केला रोज दिवे घांसावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, कापूराने हवा शुद्ध करावी पुढे असं करत दिव्यांची अवस आली अंवसेच्या दिवशीं अचानक कुठेतरी धुसर वाट दिसू लागली विज्ञाने प्रकाशाची वाट धरुन या विषाणुजन्य प्रादुर्भावातून माणसांची सुटका करण्याचे ठरवले . थोडी आशा दिसू लागली . एक चमत्कार घडेल पुन्हा सगळे न्यू नार्मल नव्हे तर नार्मल होईल असे वाटू लागेल अशी आशा दिसू लागली इकडे सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचें घरीं आज आपली पूजा कशी होईल,वगैरे चौकशी करु लागले सर्वांनी आपाआपल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली. घरचा दिवा सांगूं लागला. बाबांनो, काय सांगू ? पण मुख्य दिवा सांगू लागला
यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीं नाहीं. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचो माझा थाटमाट जास्ती व्हायचा, त्याला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं. असं होण्याचं कारण काय ? मग तो सांगूं लागला. बाबांनो, काय सांगूं ? मी ह्या पृथ्वीवरील गांवच्या घरचा दिवा.पण कुठल्यातरी धास्तीने ग्रासलेला गावकरी दिसतोय म्हणून मला हे दिवस आले. दर वर्षी माझी मनोभावं पूजा करणाऱ्याला मी प्रसन्न होतोच जिथं असेल तिथं खुशाल असो ! असं म्हणून सगळ्यांना आशीर्वाद देतो तसा आज ही सगळ्यांना आशिर्वाद देण्यासाठीच आलोय खरा पण थोडा उत्साह कमी दिसतोय
घडलेला प्रकार सगळ्या दिव्यांनी श्रवण केला. यात कुणाचाच अपराध नाहीं अशी त्याची खात्री झाली. झाल्या गोष्टीची दखल घेवून सगळ्यांना स्वस्थता लाभू देत सर्व मंगल होवू देत असा आशिर्वाद देवू यात असेच ठरले
अखेर दिव्यांचा अखंड लखलखीत ज्योतींनी आशिर्वाद दिला अन् या विषाणूला पळवून लावण्यासाठी वैज्ञानिकांच्या रुपात देवदूत पाठवला त्याला बघून घाबरलेला विषाणू सैरभर पळायला लागला ...मात्र त्यचा अहंकार बोलला .लगेच का मी शरण जावू म्हणत इकडेतिकडे पळतच राहिला खरा ....पण त्यालाही आता कळले फार दिवस काही आपण ह्या मानवांना आपल्या कवेत घेवू शकणार नाही बुद्धी च दान लाभलेला तो आपल्या पेक्षाही सशक्त आहे आणि आता लसीच्या रुपातील सशस्त्रधारी मानव मला पळवुन लावणार लवकरच जसा सुखाला दुःखाचा दिवसाला अंधाराचा तसचं काहीसं कोणतीच गोष्ट फार काळ टिकून राहू शकत नाही ..काळ नव्हे योग्य वेळच यावर औषध आता मला जायलाच हवे ...हे त्याचे त्यालाच कळले असावे ...
सार्या घरांतील लोक सुखानं रामराज्य करूं लागतील . दिपकांनो असा विश्वास आज आपण या भूतलावर निर्माण करु यात आणि हे संकट टाळूयात आमच्या तुमच्या वरचे हे कोरोनाचे सावट टळो ! ही सांठा उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
©मधुरा धायगुडे