दिवाणखान्यातील खुर्चीवर बसल्या बसल्या नजर सहजच बाल्कनीतल्या नुकतीच पालवी फुटलेल्या झाडाकडे गेली. आकाशातून पडणाऱ्या त्या पाऊस थेंबामुळे ती चिंब भिजत होती आभाळ भरुन आलं होत मृग नक्षत्र नुकतच सुरु झालं होत सगळी सृष्टी पावसाने मोहरली होती हे बघून सहजच विचार आला काय सौंदर्य असेल ना या निसर्गाचे.....वर्षानुवर्षे न थकता अविरत ते चक्र अव्याहत चालू आहे . जगरहाटीच्या नियमाप्रामाणे प्रत्येक दिवसाचे एक वेगळे सौंदर्य ....दिवस संपतात वर्षे संपतात निसर्गाने घालून दिलेल्या पाऊलवाटेने सौंदर्य टिपत टिपत आयुष्य पुढे चालते ते बघणा-याच्या नजरेत असते ....मग सौंदर्य म्हणजे केवळ डोळ्याला वाटणारी सुंदरता ...अगदीच असे नसेल जो मनाने सुंदर असेल तो थोड्याअंशी सुंदरतेच्या परिभाषा आपल्या दृष्टी नुसार पूर्ण करत असेल...
कुणाला काळ्याशार पाषाणात सौंदर्य दिसेल तर कुणाला पांढऱ्या शुभ्र नभात सौंदर्य दिसेल यासाठी मनाची कोमलता हवीच मृदु स्वभाव ती जास्त पटकन टिपत असेल.
सौंदर्य संकल्पना मांडणं खरतर अवघड यात ब-याच विरोधी शक्यता असतील...
कुणाला फुलातील तर कुणाला काट्यातील सौंदर्य आवडेल तर हळव्या मनाला प्रथम त्या झाडावरील फुलांचा रंग भावेल ते सौंदर्य तो टिपेल...कुणाला सूर्याचा प्रखरपणा तर कुणाला चंद्राची शितलता, एखाद्या ला सावळ्या कांतीतील कोरीव रेखीवपणा तर एखाद्या ला गौरवर्णीय नितळता हे ज्याच्या त्याच्या भावविश्वावर अवलंबून आहे शेवटी काय सौंदर्य प्रत्येक गोष्टीतच असते कोणीही किंवा कोणतीही गोष्ट निरर्थक नसतेच. निसर्गाने दिलेली अशी काही शक्ती आहे जिने समानतेच्या गुणधर्मांना मान्यता दिली मग त्या कोणत्याही स्वरुपातील असू देत.
सौंदर्य एक दुवा निसर्ग आणि व्यक्ती मधील अंतर पार करणारा ..
सौंदर्य सहजता ,सौंदर्य मोहकता, सौंदर्य मार्दवता तर
सौंदर्य म्हणजे दुःख देखील....दुःखातही सौंदर्य टिपता येतेच. सौंदर्य आत्म्याचा आवाज, सौंदर्य सात्विकता, सौंदर्य प्रग्लभता अशी एक नाही अनेक बिरुदे लावता येतील.
जीवन वाटते तितके सोपे नाही पण आजूबाजूला डोळसपणे पाहिले कि त्यातील सौंदर्य ची जाणीव जादू लक्षात येते.
चमत्कार पृथ्वीवरील सौंदर्य टिपताना देखील घडू शकतात हे पटते. निसर्गदत्त प्रत्येक गोष्ट परिपूर्ण आहे केवळ पैशामधे सधनता नसून निसर्गातील सौंदर्यातही ती आहेच ते समाधान मिळते मग समाधान म्हणजे देखील सौंदर्य च ....!!!
हसावे हसवावे , शिकावे शिकवावे आजकाल शिकवलेले फारसे रुचत नाही पण त्यातही ज्याचे त्याचे मनाचे सौंदर्य च आनंद द्यावा घ्यावा पुढे चालावे चालतच राहवे अशी जाणीव मनाला होणे म्हणजे देखील सौंदर्य च कि.....!!!
केवळ शारिरीक सुंदरता सौंदर्याच्या व्याख्येची पूर्तता करत नसावी तर बोलण्यातील मोहकता, आवाजातील माधुर्य, डोळ्यातील चमक,चेहऱ्याची सात्विकता,केसांची सतेजता,चालण्यातील लकब अन् स्वभावातील विनम्रता ही सर्व निरामय सौंदर्ययाची परिपूर्णता परिपक्व विचाराने येते हेच तर सौंदर्य त्याची जोपासना करणं म्हणजे जगणं....!!
उदासिनतेत निराशेचे सौंदर्य तर आनंदात आशेचे सौंदर्य लपलेले असते.सुखात सौंदर्य सहज टिपता येते तर दुःखात त्याच सौंदर्याचा खरा अनुभव घेता येतो.
मानवी मनाच्या प्रत्येक भावनिक विश्वाचे वेगळे सौंदर्य आणि याच सकारात्मकतेने आपण आपले अस्तित्व टिकून आहे. गर्द अशा निसर्गात , कधी अंधारात ,कधी लख्ख प्रकाशात पाऊलवाट काढत सौंदर्य टिपत स्वतः ला सिद्ध करत जगरहाटीच्या वहिवाटेला न्याय देत अगदी कोणत्याही अपवादाशिवाय....जगण्याचा सोहळा चालू आहे.
सौंदर्य बघताना या सर्व बाबींचा विचार नकार मनात होकार हृदयात घेवून वाटचाल केली तर मानसिक शारिरीक सौंदर्य खुलवेल.
जळी स्थळी काष्टी पाषाणी सौंदर्य भरलेले आहे याची जाणीव होणे म्हणजे भगवांतालाही जवळ करण्यासारखेच आहे प्रत्येक गोष्टी त सकारात्मकता पाहता येणं म्हणजे देखील सौदंर्य च....!!
माणूस म्हणजे अशा अनेक भावनिक परिशब्दांंच कोंदण लाभलेला एक दागिनाच... फक्त तसा विचार हवा.
मग कसं जगायचं हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन त्याचाही आदर यातही ज्याचे त्याचे सौंदर्य च...!!
मी संवादावर बोलले च उत्तम संवाद तर अबोलतेतही सौंदर्य च..
सौंदर्य टिपण्याचा सहजच सुचलेला हा प्रयत्न ...!!
व्यक्ती सापेक्षता
© मधुरा धायगुडे