हि कथा तेंव्हाची आहे जेव्हा कौरव महाभारताचे युद्ध हरत होते.दुर्योधन एके रात्री गंगापुत्र भीष्मांच्या कक्षेत गेला. त्यादिवशी दुर्योधन थोडा रागात दिसत होता. भीष्मांनी त्याला आसनस्थ होण्यासाठी सांगितले. युद्ध सुरु झाल्यापासून कौरवांची बाजू थोडी डावी पडत होती. कौरवांकडे शूरवीर आणि धाडसी योद्धे होते तरी दिवसाच्या समाप्तीला कुरुक्षेत्रावर कौरवांचे सैन्य धारातीर्थी पडत होते. या सगळ्याचा विचार करून तो आज भीष्मांना याचा जाब विचारायला आला होता. हे सगळे कळूनही भीष्म स्थितप्रज्ञ मुद्रेत बसले होते.दुर्योधन म्हणाला, “पितामः आज पर्यंत तुम्ही कौरवांच्या बाजूने लढलात परंतु मला असे वाटत नाही कि तुम्ही यथाशक्ती युद्ध करताय. तुम्ही मनावर घेतले तर पांडवांचा मृत्यू अटळ आहे. तुम्ही केवळ पांडवांच्या प्रेमापोटी आपल्या राजाशी प्रतारणा करताय.” आपल्यावर झालेले हे आरोप भीष्मांना मान्य नव्हते हे त्यांच्या एका कटाक्षातून कळले. भीष्मांची मुद्रा बदलली आतापर्यंत स्थितप्रज्ञ वाटणारे भीष्म रौद्र वाटू लागले. भीष्म आपल्या आसनावरून उठले.त्यांनी आपला तळपाय आपटला. आग मस्तकात गेली होती. त्यांच्या डोळ्यातून ठिणग्या पडत होत्या. त्यांच्या भात्यातून ५ सुवर्णशर बाहेर काढले. त्यांनी खर्जात मंत्रोच्चारण केले. “हेच ते पाच सुवर्नाशर जे या पांडवांचा काळ ठरतील.” असे म्हणून त्यांनी ते बाण आकाशाच्या दिशेने धरले आणि अवकाश जणु दुभंगले होते असा कर्णकर्कश्य ध्वनी उठला. दुर्योधनाचा भीष्मांवर विश्वास नव्हता. त्याने त्या पाच सुवर्णशरांचा ताबा मागितला. “पितामहः आपले पांडवांसाठीचे प्रेम पाहता आपली हिंमत होणार नाही हे नक्की आहे त्यामुळे हे पाच सुवर्णशर मला द्यावेत हि मी विनंती करतो.हे मी आपणाला युद्धभूमीत हे देईन. याने आपले मतपरिवर्तन होणार नाही.”
एक जुनी आठवण
खूप वर्षांपूर्वी जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हाची एक गोष्ट आहे. दुर्योधन एके दिवशी पांडव ज्या वनात होते त्या वनात शिकारीसाठी आलेला होता. तेव्हा त्याने एका तलावाच्या काठी आपला तळ ठोकला. त्या तलावात पाणी नितळ होते. विविध प्रकारच्या कमळांनी भरला होता. दुर्योधन या तलावात स्नानासाठी उतरला. त्याचवेळी तेथे स्वर्गातून काही गंधर्व राजपुत्र याच तलावात विहारासाठी आले होते. दुर्योधनाचा गर्व त्याला नेहमीच विनाशाच्या वाटेवर नेत असे. केवळ याच गर्वाच्या आहारी जाऊन त्याने गंधर्व पुत्राला हरवण्यासाठी द्वंद्व केले. परंतु त्याचा हा डाव फसला. त्याला गंधर्व राजपुत्राकडून पराभुत होताना पाहून तेथे अर्जुन आला. अर्जुनाने त्याला गंधर्वाच्या तावडीतून सोडवले. दुर्योधन वरमला. दुर्योधनाने आपला क्षत्रिय धर्म पाळण्यासाठी अर्जुनाला वर मागायला सांगितले. “राजन आपला सन्मान करून मी असे सुचवू इच्छितो कि जेव्हा मला पुढे कधी या वरची गरज भासेल तेव्हा मी आपणास सांगेन.”
अर्जुनाला भेट
कुरुक्षेत्रावर अंधाराने अधिराज्य करायला सुरुवात केली होती. ती युद्धाची एक रात्र होती. कृष्णाने अर्जुनाला त्याच्या वरची आठवण करून दिली. “हे पार्थ, आपल्याला एक महान युद्ध जिंकण्यासाठी अनेक लहान युद्धे जिंकावी लागतात. त्यातलेच हे एक आहे.” असे म्हणून त्याने अर्जुनाला दुर्योधनाकडे जाऊन वरची पूर्तता करण्यास सांगितले. अर्जुन दुर्योधनाच्या कक्षात गेला. “भ्राताश्री दुर्योधन,मी आपला वर मागायला आलो आहे. मला ते पाच सुवर्णशर सुपुर्द करावे.आपला जीव वाचवल्याबद्दल तुम्ही मला वर देऊ केला होता परंतु मी तो तेव्हा न मागता वेळ आल्यावर मागेन असे म्हणालो होतो. हिच ती वेळ." दुर्योधनाला नाईलाजास्तव ते पाच सुवर्णशर अर्जुनाला दयावे लागले. हताश दुर्योधन भिष्मांकडे गेला. " पितामः मला अजुन पाच सुवर्णशर हवेत. ते शर अर्जुनाने दगा करुन माझ्याकडुन बळकावले आहेत." दुर्योधनाची केविलवाणी चर्या पाहुन भिष्मांना दया न येता हसुच अाले. "राजन ते आता शक्य नाही" असे म्हणुन भिष्म हसले. यावेळी दुर्योधनाच्या गर्वाने फक्त त्यालाच नाही , तर संपुर्ण कौरावांना विनाशाकडे झुकवले होते.