महाभारतातली काही नाती ही जरा गुंतागुंतीची होती असा म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बलराम म्हणजे कृष्णाचा मोठा भाऊ. त्याची मुलगी वत्सला. ती उपवर झाली होती. तिच्यासाठी वर शोधण्याचे काम चालू होते. बलरामाला त्याची बायको रेवती हिने दुर्योधनाच्या पुत्राचे नाव सुचवले. दुर्योधनाचा पुत्र म्हणजे लक्ष्मण. दुर्योधनाचा पुत्र म्हणजे अगदी त्याच्या सारखाच होता. खूप महत्वाकांक्षी, शक्तिशाली आणि नम्र. एकीकडे वत्सला आणि लक्ष्मण यांच्या लग्नासाठीची लगबग चालू होती. दुसरीकडे मात्र वत्सलाला अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू आवडू लागला होता. अभिमान्युहि वत्सलेकडे आकर्षित होत होता. त्यांच्यातले प्रेम नुकतेच खुलत होते, तेंव्हा वत्सलेच्या कानावर तिच्या आणि लक्ष्मणच्या लग्नाच्या गोष्टी आला होत्या. “प्रिया, मी लक्ष्मणाशी विवाह करू इच्छित नाही. मला आपल्या बरोबर हे जीवन व्यतीत करायचे आहे.” असे म्हणून वत्सला अभिमन्यूच्या बाहुत कोसळली. तिच्या मऊ गालांवरून खाली ओघळणारे अश्रुंचे थेंब अभिमन्यूच्या बलदंड छातीवर पडले. अभिमन्यूने तिची हनुवटी वर केली. तिच्या रडून लाल झालेल्या डोळ्यांत पाहत तो म्हणाला, “ वत्सले, तू मुळीच चिंता करू नकोस, मी तुझा विवाह इतर कुणाशीही होऊ देणार नाही. आपले प्रेम अभेद्य आहे. मी एक युक्ती सांगतो.” असे म्हणून तो वत्सलेच्या कानात काहीतरी कुजबुजला तसा तिचा चेहरा फुलला. वत्सला आता निश्चिंत होऊन राजमहाली परतली.
अभिमन्यू आपल्या योजना बनवत होता. एकीकडे बलरामाच्या महालात वत्सला आणि लक्षमण यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरला. त्यांच्या लग्नाचा दिवस उगडला. आज बलरामाचा महाल एखाद्या नवविवाहितेप्रमाणे नटवण्यात आला होता. महाद्वारावर हत्ती फुलांचा वर्षाव करण्यासाठी नेमले होते. आत प्रवेश करताच समोर एक कारंज होते. ज्यामध्ये अत्तर वाहत होते. झेंडूंच्या फुलांच्या पायघड्या महालाच्या प्रवेश द्वारापर्यंत पसरण्यात आल्या होत्या. मार्गाच्या दोन्ही बाजूला दास-दासी फुलांच्या पाकळ्या आणि अत्तराचा वर्षाव करत होते. दुर्योधन आणि लक्ष्मण आपापल्या हत्तींवर स्वार होते. आज लक्ष्मणाचा चेहरा एखाद्या रत्नाप्रमाणे तेजपुंज वाटत होता. ह्यांच्या मागे एक हत्तींचा ताफा रत्नजडित भांडी, आभूषणे, मोहरा, उंची वस्त्रे हे सगळे होते. भानुमाती आणि गांधारी आपल्या पालखीमध्ये होत्या. त्यांच्याकडे वत्सलेला देण्यासाठी आणलेले पिढीजात दागिने आणि उंची अत्तरे आणली होती. सगळे प्रवेशद्वाराशी पोहोचले. बलरामाची पत्नी रेवती आपल्या दासींना घेऊन लक्ष्मणाचे औक्षण करायला आली. लक्ष्मणाची नजर वत्सलेला शोधात होती. “अशी सहजासहजी नवरी दिसायची नाही” उल्मुक म्हणाला. त्याच्या बोलण्याने सगळेच हसू लागले.सर्वांनी सभामंडपात प्रवेश केला. भव्य अश्या मंडपात एके ठिकाणी गायन, वादन आणि नृत्य चालु होते. एकीकडे यजमानांना आणि वर पक्षाला बसायला रेशमी वस्त्रे असलेली बैठका होत्या. धृतराष्ट्र, दुर्योधन आणि लक्ष्मणासाठी रत्नजडीत सिंहासने ठेवलेली होती. गांधारी आणि भानुमती साठी वेगळा कक्ष होता जेथून त्या संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेऊ शकत होत्या. या सोहळ्याचे कृष्णालाही आमंत्रण दिले होते.
लग्नघटिका समीप आली होती. रेवतीने आपल्या दासींना वत्सलेला आणायला पाठवले. दासी वत्सलेच्या कक्षात गेल्या त्यांना ती कुठेच दिसली नाही. त्या तिला इकडे तिकडे शोधू लागल्या. हि बातमी राणी रेवती आणि बलरामाला कशी सांगायची या विवंचनेत असताना एका दासीचे लक्ष कक्षाच्या उजवीकडे असलेल्या गच्चीत गेले. तिथे राजकन्या वत्सला त्यांना पाठमोरी उभी होती. “क्षमा असावी राजकुमारी आपणाला महाराणींनी बोलावले आहे. मुहूर्ताची घटिका समीप आली आहे.” त्यांना आपल्या हातानी थांबण्याचा इशारा देत वत्सला उत्तरली, “माझ्या सदनातला आज शेवटचा दिवस आहे. मला या घटीकेला हे आकाश आणि आजूबाजूचा परिसर पाहून घेउद्या. हा पक्षांचा कुंजरव मी इथून निघून गेले कि पुन्हा कधी ऐकू येईल ते माहिती नाही.” “आपण निश्चिंत व्हा राजकुमारी, राजपुत्र आपणाला भेटण्यास आतुर आहेत असे दिसत होते. ते आपली छान काळजी घेतील.” असे म्हणून वत्सलेची खास दासी हसली. वत्सलेने सुस्कार सोडत दासींबरोबर चालायला सुरुवात केली.वत्सला नखशिकांत नटली होती. तिच्या गोऱ्या तनुवर लाल रंगाची साडी शोभून दिसत होती. जशी ती एक एक पायरी उतरत होती तसा लक्ष्मणाचा जीव तिचा चेहरा पाहण्यासाठी आतूर होत होता.लक्ष्मणासाठी त्याच्या आजूबाजूचे सारे आवाज आणि घडणारे प्रसंग जणु एक क्षण स्थिरावले होते. त्याला फक्त वत्सला दिसत होती आणि तिच्या पैजणांचा आवाज येत होता. त्याच्या बहिणीने मारलेल्या कोपरखळीने तो भानावर आला. वत्सला त्याच्या शेजारी येऊन हळूच बसली. तिची नाजूक काय त्याला जाणवत होती. लक्ष्मणाचे सारे लक्ष तिच्या मेहेंदी काढलेल्या गोऱ्यापान हातांकडे होते. तिचा चेहरा झाकला असल्याने अजूनही त्याला तिचे रूप पाहता आले नव्हते. शेवटी एका विधीसाठी त्याला तिचा हात हातात घेण्यासाठी सांगितला. प्रथम तिने आपला हात हलवला देखील नाही. नंतर रेवतीने वत्सलेचा हात आपल्या हातात घेतला आणि तो लक्ष्मणाच्या हातात दिला. लक्ष्मणाने तिचा नाजूक हात आपल्या बलशाली हातात पकडला. त्याची पकड मजबूत आहे हे तिला कळले. विधी चालू असताना लक्ष्मणाला त्याच्या हातात काहीतरी जाणवले. त्याने पहिले तर वत्सलेचा नाजूक गोरा हात आता काळा आणि पुरुषी दिसू लागला होता. त्याने पटकन आपली नजर तिच्या चेहऱ्याकडे वळवली. आता नाजूक वत्सलेचा एक आक्राळ विक्राळ राक्षस झाला होता. त्याचा आकार वाढत गेला आणि जाता जाता त्याने मंडप तोडला होता. राक्षसाची उंची सभामंडपाला टेकली होती. हे सारे पाहून सगळेजण थक्क झाले. हे सारे पाहून दुर्योधनाला राग आवरला नाही. लक्ष्मणाला क्षणभर कळलेच नाही. जसा तो भानावर आला तसे त्याने आपला फेटा, उपरणे काढून फेकून दिले आणि बलरामाला म्हणाला, “ राजन, मी आपला आदर करतो याची उपेक्षा करू नये. आपल्या सदनात हे काय घडले याची मला माहिती हवी आहे. आपण आमचा अपमान केलात.” “हा... हा... हा... शोध आता वत्सलेला ती काही तुम्हाला सापडणार नाही.” तो दैत्य म्हणाला. “तू कोण आहेस आणि माझी पुत्री कुठे आहे??” रेवती म्हणाली. “वत्सला गेली आपल्या प्रियकरा बरोबर. तुम्ही शोधा मी जातो हा.. हा... हा... .” असे म्हणून तो दैत्य एका धुरामध्ये गायब झाला.
वधूची अदलाबदली
वरपक्षाची माणसे आली आहेत असे वत्सलाने आपल्या कक्षातून पहिले होते. अभिमन्यूने सांगितल्याप्रमाणे तिने सर्व तयारी करून ठेवली होती. अभिमन्यू तिच्या कक्षात आला. त्याने आपला रथ मागच्या बाजूस थांबवला होता. “तयार आहेस ना प्रिये? मी तुला वचन दिल्याप्रमाणे आलो आहे.” असे म्हणत त्याने तिला आपल्या रथात बसवले. त्याने आपला मोर्चा वत्सलेच्या कक्षात वळवला. आता तिथे घटोत्कच आला होता. घटोत्कच म्हणजे भीम आणि राक्षशी हिडींबा हिचा पुत्र. अभिमन्यूचा भाऊ. घटोत्कचाने वत्सलेचे रूप घेतले आणि तो तेथे बसून राहिला. “भ्राताश्री मी आपला शतशः आभारी आहे. आपले हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही.” “जा अभिमन्यू जा. वत्सलेला नीट घेऊन जा. मी थोडी गंमत करतो इथे.” घटोत्कच उद्गारला. त्याने वत्सलेचे रूप घेतेले. पुढे सगळी कथा घडली.
लक्ष्मणाची प्रतिज्ञा.
घटोत्कच सभामंडपातून गायब झाला होता. संपूर्ण महालात आक्रोशाचे वातावरण पसरले. दुर्योधन आंनी धृतराष्ट्र चिडलेल्या मुद्रेत बलरामाशी बोलत होते. रेवती हुंदके देऊन रडत होती. भानुमती आणि गांधारी तिला समजावत होत्या. लक्ष्मणाकडे कुणाचेच लक्ष नव्हते. लक्ष्मणाने स्वतःला सावरले. आता त्याला या प्रकारचा राग आला होता. त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली होती.त्याचे डोळे रक्तरंजित झाले होते. तो आपल्या आसनावरून उठला. त्याने आपल्या मुठी वळल्या. तो झपझप पावले टाकत. अग्निकुंडापाशी गेला. त्याने कट्यार काढली आणि डाव्याहाताचा अंगठा पुढे केला. काही क्षणातच अग्निकुंडात त्याच्या रक्ताचे थेंब पडू लागले. “हे अग्निदेव, मी आपणाला माझे रक्त अर्पण करतो . आज या महालात माझा अपमान झाला आहे. मी दुर्योधन पुत्र कौरव लक्ष्मणकुमार पंचामहाभूते आणि कुलदेवतांना स्मरण करून प्रतिज्ञा करतो कि ज्या लग्नमंडपात माझा अपमान झाला जेथे मला नाकारण्यात आले त्या लग्नपद्धतीला मी त्यागतो. मी आता आजन्म अविवाहित राहीन.” त्याचे शब्द थांबले आणि अवकाशात गडगडाट झाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर भय आणि चिंता असे मिश्रभाव होते. लक्ष्मणाने रागातच तो महाल सोडला आणि रथ घेऊन तिथून निघून गेला.
कृष्णाचा उपाय
बलरामाच्या महालात हा प्रसंग घडत असताना कृष्ण तिथेच होता. दुर्योधनाने झालेल्या प्रकार बद्दल कृष्ण आणि बलरामकडे जाब मागितला. तेंव्हा कृष्ण स्मित हास्य करून बोलला, “दुर्योधना, तुला राग येणार नसेल तर मी एक सुचवू इच्छितो. तुझ्या पुत्राच्या भाग्यात लग्नयोग नव्हता परंतु तु अनुमती दिलीस तर तुझी पुत्री याच घरात लग्न होऊन येईल.” “माझ्या पुत्रीला किंवा पुत्राला तुमच्या दयेची गरज नाही. मी त्यांचा विवाह या कुळात करणार नाही.” दुर्योधन गर्जला. “मी तुझ्या पुत्रीसाठी माझा आणि जाम्बवतीचा पुत्र साम्ब यांचा पर्याय सुचवू इच्छितो.” कृष्णाने सांगितले. लक्ष्मण तिथून निघून गेला होता. भानुमतीने दुर्योधना सांगितले कि पुत्राच्या प्रतिज्ञेमुळे मुलीच्या आयुष्याचा बळी जाऊ नये म्हणून कृष्ण जे सुचवतो आहे त्याचा विचार करावा. दुर्योधनाने कृष्णाचे मागणे मान्य केले.