सुधाकर आणि अश्विनीची हे जोडपं ठाण्यात राहतं. सुधाकर ठाण्यात एका कंपनीत मेंटेनंन्स ईंजिनीयर आहे.सुधा इंटीरियर डेकोरेशनची कामं करते. एक दिवस संध्याकाळी सुधाकर घरी येत असतो. त्याला रस्तात एका होर्डिंगवर जाहिरात दिसते.
"फक्त पंचेचाळीस लाखात लोणावळ्यात स्वतःचं घर..! च्यायला ही लोकं पंचेचाळीस लाख असे म्हणतात जसं कुणी खिशातचं घेउन फिरतं... फक्त पंचेचाळीस म्हणे..!".
ही जाहिरात वाचुन त्याच्या मनात एक विचार येऊन गेला.
"अगदी पंचेचाळीस लाख नाही पण पंधरा-वीस लाखात एखादं फार्महाऊस मिळालं तर बघितलं पाहिजे.असंही विकेंडला कुठेतरी जाऊन पैसे खर्च करायचे ते आपल्याच घरासाठी केले तर काय बिघडणार आहे...?? ही कल्पना अश्विनीला सांगायला हवी."
असा विचार करत असताना सिग्नल सुटला आणि त्याने आपली गाडी शुभारंभ सोसायटीकडे वळवली. आपल्या नेहमीच्या जागी गाडी लावली. गाडीतुन डबा, लॅपटॉप बॅग, मोबाईल सगळं घेतलं का? असं त्याने अापल्या खिशाला चाचपडुन चेक केलं.
"अरेच्चा पाकीट राहिलं"
असं म्हणुन तो गाडीकडे वळला. त्याच्या लक्षात आलं की कुणीतरी त्याच्या मागे उभं आहे.
त्याने दचकुन मागे पाहिलं
"अरे शंतनु, घाबरवलंस मला.आज तु लवकर??" सुधाकर म्हणाला.
शंतनु एक्साईट होऊन म्हणाला, "अरे आज सुट्टी घेतली होती जरा फार्महाऊस बुक करायला जायचं होतं. माझं व्हॅलेंटाइन गिफ्ट आहे मीताला."
सुधाकर आणि शंतनु बोलत बोलत लिफ्ट पर्यंत पोहोचले.
"भारीच मग..! कितिला पडतं रे आणि मेंटेनंन्स वगैरेचं काय??" सुधाकर जरा इंटरेस्ट दाखवुन म्हणाला.
लिफ्ट आली त्यांनी दरवाजा उघडला आणि दोघांनी आपापले मजले दाबले.
"फार नाही रे.. मी जे पाहिलंय ना ते तीस एक लाखांचं आहे बघ. त्याच्या आजुबाजुला बरीच फार्महाऊस अाहेत. आमच्या बाजुला सुनील शेट्टीचं फार्महाऊस आहे."
शंतनुने जरा फुशारकी मारली. सुधाकरचा मजला आला.
"मी येतो. चल उद्या भेटुन बोलुच." "अरे तुम्हाला सुट्टी असेल तर चला उद्या आमच्या बरोबर लोणावळ्याला आमचं फार्महाऊस बघायला. शिवाय मीता म्हणत होती तिला अश्विनी कडुन इंटीरियर करुन घ्यायचं आहे."
शंतनुने लिफ्टच्या दारांच्यामध्ये हात घातला होता. सुधाकरच्या उत्तराची वाट बघत त्याने लिफ्ट थांबवुन धरली होती.
"मी अश्विनीशी बोलुन तुला व्हाटस्अॅप करतो."
हे ऐकुन शंतनुने लिफ्टचा दरवाजा बंद केला आणि
"भेटु मग चल गुड नाईट" असे म्हणे पर्यंत लिफ्ट वर गेली.