गुरुवारी सकाळी सहा वाजता सगळे निघाले. अश्विनीने तिच्या मित्राला आदल्या रात्रीच फोन करुन आठवण करुन दिली होती.
"सुधाकर कपडे घे चार पाच दिवस राहणार आहोत." अश्विनी किचन मधुनच सांगत होती.
"होय....!! अगं माझा हेअरब्रश पाहिलास का?"सुधाकरने विचारलं तेवढ्यात दारावरची बेल वाजली.
"आले बघ ते... चल आवर..झालीय बॅग भरुन तु काय वेगळं करतोयस त्यात तुलाच ठाऊक " अश्विनी म्हणाली.
"चला आवरलं का रे सुधाकरा..??" शंतनुने दारातुनच विचारलं
"हो.. हो.. चला.. कुलुप..." सुधाकरचं वाक्य पुर्ण होण्याच्या आधीच अश्विनीने हात दाखवला.
"लावते.. लावते.."
सगळे निघाले. त्यांचा प्रवास चालु झाला. प्रवासात मिता आणि अश्विनी अविरत गप्पा मारत होत्या. अगदी बीज कलरपासुन ते लायलॅक पर्यंत सगळ्यावर चर्चा करुन झाली. फार्महाऊस जवळ पोहोचले. त्यांनी आऊटहाऊस मध्ये सामान ठेवलं आणि फ्रेश झाले. अश्विनी आणि मिता आधीच फार्महाऊस मध्ये पोहोचल्या होत्या अश्विनीचा मित्र विशालही पोहोचला होता. सुधाकर आणि शंतनु पण आत घरात आले. विशालने वरच्या खोली पासुन स्वच्छता करायला घेतली होती.
"हे बघ अश्विनी वरच्या रुम मधले वॉलपेपर. अगं वेडं की काय म्हणायचं काय या माणसाला...?? सिलींगला पण लावलाय वॉलपेपर. पण काहीही म्हण काम भारी केलंय.. सुटता सुटत नाहिये भिंतीवरुन..!" जरा तक्रारीच्या सुरातच विशाल म्हणाला.
"हे कसले नंबर आहेत त्यावर??" सुधाकरने विचारले.
"काय माहिती बहुतेक तेंव्हाचे प्रोडक्ट नंबर असतील." विशाल म्हणाला.
"काय रे कसले नंबर ?" असं म्हणत शंतनुने त्यातला एक वॉलपेपर उचलला.
"अरे नाव पण आहे यावर."
"चल काही ही काय?" मिता म्हणाली.
"कुणीतरी चांगला इंटीरियर डिझायनर दिसतोय. कस्टमाईज केलंय सगळं" अश्विनी म्हणाली.
तिने आपल्या मोबाईलवर गुगल केलं. तिला वाटलं की इतका चांगला इंटीरियर डिझाईनर असेल तर तिला बरंच काही शिकायला मिळेल.
"अरे हे बघ काय सुधाकर.... मिता, शंतनु हे बघा काय..! हा माणुस इंटीरियर डिझायनर नाही... हा तर टिचर होता.. " अश्विनी म्हणाली.
"होता म्हणजे..??" मिताने विचारलं.
"हरवला ग नंतर तो कुठेतरी..! अशी बातमी आहे." अश्विनी म्हणाली.
"अरे तु कसा काय ईथे..??" विशालने दाराकडे पहात म्हणाला.
"गस्त घालायला आलोय.. म्हातारी राहतात रे इथे चायला बघायला याव लागतंय..!" विशालचा एक मित्र दारात उभा होता. मस्त दणकट शरिरयष्टीचा, सावळा. दाढी मिश्या अश्या की पोलिसाचा वेश नसेल तर कुणी साऊथ मुव्हीतला व्हिलनच वाटेल. त्याचं नाव राजेश. तो विशालचा लोणावळ्यातला मित्र होता.
"हा बंगला त्या डॉक्टर साहेबांचा ना.. एक नंबर माणुस बघा.. नेहमी चहा पाजायचा.. नेहमी कोण ना कोण असायचंच बघ मित्रमंडळी.. मोठा गोतावळा होता वाटंत..!" राजेश म्हणाला.
"हा माझा मित्र राजेश.. इथे पोलिस आहे...!" विशालने राजेशची ओळख करुन दिली.
"हे काय करताय रिनवेशन का??" त्याने विचारलं
"मी आपला सहजच विचारतो.. नाहितर तुम्ही म्हणाल नुसत्या चौकश्या करतो.. हा हा हा..." त्याने हसत सुधाकरच्या पाठीवर हात मारला..
सुधाकर त्या हलक्या वाराने सुद्धा वाकला..!
"काही हरकत नाही दादा आम्हाला पण बरंच झालं कुणीतरी ओळखीची व्यक्ती इथे सापडली..!" मिता म्हणाली.
"ताई, तुम्ही मला दादा म्हणलात मग आता तुमचं रक्षण म्हणजे माझी जिम्मेदारी... हा माझा नंबर घ्या कधीपण प्रॉल्लेम आला की फक्त कॉल करा..!! चला मी येतो..! भेटु बरं का भाऊजी..!" असं म्हणत त्याने शंतनुला येतो असा हात केला.
राजेश निघुन गेला. आता वरच्या दोनही रुमचा वॉलपेपर काढुन झालेला.
"हे बघ अश्विनी यावर पण नंबर अाहे. भारीच प्रोडक्ट कोड लावलाय. तारखेसारखा वाटतोय."विशाल म्हणाला.
"नाव पण आहे का बघ..!" सुधाकर मस्करीत म्हणाल.
तर खरच त्यावर नाव लिहिलेलं होतं.
"हे गिफ्ट दिलंय वाटंत डॉक्टरांना कुणी तरी....! आत्ता राजेश म्हणाला ना खुप गोतावळा होता. दरवेळी कोणी ना कोणी असायचंच...! गुगल कर ग हे नाव काय येतंय बघु..!!"
गुगल वर जे अश्विनीने पाहिलं त्यामुळे तिच्या पायाखालची जमिनच सरकली. तिने विशालला राजेशला बोलवायला सांगितलं. राजेशला त्यांनी फोन वर घडलेला प्रकार सांगितला. तो सगळा लवाजमा घेऊन आला. एकीकडे सगळे पोलिस आणि दुसरी कडे फॉरेन्सिक वाले.
"काय सांगता डॉक्टर? माणुस...??" राजेश आश्चर्यचकित होऊन म्हणाला.
"काय माणुस?? काय झालं..??" शंतनुने विचारलं.
"साहेब तुमचे वॉलपेपर एका उत्तम प्रकारच्या लेदर पासुन बनवलेले आहेत... माणसाची कातडी...!!!"
"आत्तापर्यंत हरवलेल्या बारा माणसांच्या डी. एन. ए. शी हे मॅच झाले आहेत." राजेशने पुढे खुलासा केला.
"साहेब, बागेत सांगाडे सापडलेत...!!" एक कॉनस्टेबल म्हणाला
मिताने एकदा घर परत पाहिलं....!
सारं घर भरलं होतं वॉलपेपरनी... भिंती... सिलींग... किचनचे खाने... बेडचे कव्हर... मगाशी ती ज्या खुर्चीवर बसलेली ती सुद्धा... सगळं...!