प्रतिमा त्या इंट्रोगेशन रूममध्ये गेली.
“आत येऊ का सर...??” तावडेंनी विचारलं
“या, बसा मिसेस देशपांडे. सांगा तुम्ही आधी कधी असं झालं होतं का? तुमचा काय मत आहे? आम्हाला ऋषिकेशबद्दल सगळं कळलं आहे. काहीही लपवू नका. या आरती वाघ ऋषिकेशला सोडवण्यासाठी तुमची मदत करतील. ” कदमांनी हात दाखवून बसायला सांगितलं.
“हो का? नमस्कार मी प्रतिमा देशपांडे. तसंतर ऋषी आधीपासूनच खूप शांत मुलगा आहे. लहानपणापासून त्याला माईंनी सांभाळलं होतं. मी आमच्या लग्नाआधीपासूनच चारकोपच्या ऑफिसमध्ये कामाला आहे. माझा जॉब सकाळी दहा पासून असतो त्यामुळे मला कधी मुलांना शाळेत सोडायला वेळच मिळाला नाही. हे सगळं काम माई करायच्या.” तिने पाण्याचा ग्लास उचलला. जरा रुमालाने त्याच्या कडा पुसल्या आणि पाणी प्यायली.
“माझ्या लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी मी प्रेग्नंट राहिलेले. माझ्या माहेरी सगळेच जॉब करतात. त्यामुळे माझी काळजी घ्यायला कोणीही नव्हतं. मी पाचव्या महिन्यापर्यंत जॉबला जात होते. पण त्यानंतर घरकाम आणि जॉब एकत्र सांभाळणं कठीण झालं होत. मकरंद उन्हाळ्याला दापोलीला गेलेले तेंव्हा त्यांनी येताना माईला आणला होतं.” प्रतिमा सगळं सांगत होती.
“म्हणजे एकवीस वर्ष झाली. त्यांचा नातं मिस्टर देशपांडेशी कसं होतं?” आरतीने विचारलं
“हो. एकवीस बावीस वर्ष झाली. त्यांना माझ्या मदतीसाठी मकरंदनेच आणलं होतं. त्या असतील तर मुलांची नीट काळजी घेतील, चांगले संस्कार करतील, घर सांभाळतील, जेवणाचं बघतील हे सगळं डोक्यात ठेवूनच आणलेलं. असाही त्यांना पंचविसाव्या वर्षीच नवऱ्याने घरी पाठवलं होतं. त्यांना मुलं होणार नव्हती त्यामुळे त्या आमच्या मुलांना प्रेमाने सांभाळतील इतकाच माझा विचार होता. मुलांना त्यांच्या लळा आहे. एकत्र राहतात, खातात, लहानपणी त्या ऋषिकेश आणि ऋचाला बागेत फिरायला न्यायच्या. खूप केलंय त्यांनी मुलांचं. मला नाही वाटत ऋषिकेश किंवा आमच्या घरातले कोणीही त्यांना मारेल.” प्रतिमाने आपलं मत सांगून टाकलं.
“कधी बाचाबाची, भांडणं झाली होती का त्यांच्याशी? देशपांडे म्हणाले होते कि त्याला रिमांड होममध्ये टाकलं होतं. त्याचं कारण काय? त्यांना काहीच माहिती नाही... असं कसं शक्य आहे.??” कदमांनी विचारलं.
“हो. शाळेत. पण तेंव्हा मला सुट्टी मिळाली नव्हती त्यामुळे मी माईना सांगितलेलं. त्या गेल्या होत्या शाळेत. त्यांनी मुख्याध्यापक बाईंना माझं कन्सेंट लेटर दिलं. पण त्याने ऋषिकेशच्या आयुष्याची पाच वर्ष गेली. ऋषिकेशच्या आयुष्यात माई खूप महत्वाच्या होत्या. त्या नेहमी त्याला रिमांड होममध्ये भेटायला जायच्या. ऋचापण जायची कधी कधी. मला वेळ नसतो आणि मकरंद ऋषिकेशशी अटॅच नाहीत. त्यामुळे तो माईला मारू शकतो हे मला अशक्य वाटतं.” प्रतिमाने काही खुलासे केले.
“तुम्ही बरच काही सांगितलंत. मी बघते काय होऊ शकेल का ते..” आरती वाघ म्हणाली.
“तुम्ही कधी विचारलं का त्याला...? कसं वाटलं रिमांड होममध्ये ? त्याने काय केलं तिथे?” डॉ.रेगे काळजीपोटी बोलले.
“हो. मी विचारलं. तो शांत होता. तसं तो आधीपासूनच थोडा अबोल आहे. असं काही वेगळं वाटलं नाही. तो माईशी जास्त क्लोज होता. त्यामुळे मी फार त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ केली नाही. मी नेहमीच माझ्या मुलांना स्पेस दिली आहे.” प्रतिमा स्वतःला ग्लोरिफाय करतेय असं दिसल्यावर कदमांनी तिचा जवाब थांबवला.
“तुम्ही या आता. आज इतकेच पुरेसे आहे. तुमच्या मुलीला नंतर बोलावतो.” कदमांनी प्रतिमाला जायला सांगितले.
प्रतिमा बाहेर आली. ती आणि मकरंद घरी निघून गेले. इकडे या खोलीत डॉ. रेगे आणि कदमांची चर्चा चालू झाली.
“काय अजब कुटुंब आहे...! बायको काय करते नवऱ्याला माहिती नाही..! नवरा काय करतो बायको ला माहिती नाही...! मुलं काय करतात पालकांना माहिती नाही...! स्पेस देणं म्हणजे काय??? नवीनच फॅड निघालंय डॉक्टर...!!” कदम काळजीरुपात म्हणाले.
“उद्या ऋचाशी बोलून कळेल. हा ऋषिकेश काय रसायन आहे??” आरती डॉक्टर रेगेंना म्हणाली.
खोलीत अंधार केला. बाहेरून कुलूप लाऊन शिंदेंनी खोली बंद केली. त्या खोलीचा अंधार या केसमध्ये येणाऱ्या खुलास्या इतकाच अंधारमय होता.